ओवी क्र. ११ ते २८
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान, । या क्रियायोगाविण ।
कैसे येईल आत्मभान । सांग बाळा ॥११॥
तप म्हणजे सहन करणे । स्मितहास्यात वावरणे ।
खंत, द्वेष, ईर्षा टाकणे । जाण बाळा ॥१२॥
तप म्हणजे प्रेम करणे । तप म्हणजे प्रेम वाढविणे ।
तप म्हणजे क्षमा करणे । जाण बाळा ॥१३॥
तप म्हणजे कष्ट करणे । चारही पुरुषार्थ बळकट करणे ।
यशापयश विसरणे । जाण बाळा ॥१४॥
तप म्हणजे टाळणे दोष दर्शन । तप म्हणजे टाळणे क्षोभ होण ।
तप म्हणजे टाकणे चडफडणं । जाण बाळा ॥१५॥
तप म्हणजे तन-बळ वाढविण । मनबळही वाढविण ।
तप म्हणजे धैर्य वाढविणं । जाण बाळा ॥१६॥
स्वाध्याय म्हणजे बघणे तन । स्वाध्याय म्हणजे बघणे मन ।
निरखणे अंत:करण । जाण बाळा ॥१७॥
प्रपंचात नेटकेपण । हे ही स्वाध्याय लक्षण ।
सहज सुंदर आचरण । जाण बाळा ॥१८॥
ज्या राज्यात आपले राहणे । तेथीचा कायदा जाणणे ।
कायद्याने व्यवहार करणे । जाण बाळा ॥ १९ ॥
(राज्य म्हणजे राज्य, देश, कार्यक्षेत्र इ.)
पुरुषाचे यशात । पत्नीचा वाटा बहुत ।
जाणणे तिचेही मत । स्वाध्यायच ॥२०॥
पत्नीस समजणे अडाणी । गाणे स्वत:चीच गाणी ।
तप-स्वाध्याय विरोधी करणी । जाण बाळा ॥२१॥
परोपकार, सेवा, तर्पण । यशाशक्य करणे दान ।
परि विसरावे कर्तेपण । जाण बाळा ॥२२॥
ज्या राशी तत्वात देह-जन्म । त्याचे जाणून मर्म ।
पाळावे सर्व विश्व नियम । प्रेमाने बाळा ॥२३॥
ऐसा हा समग्र स्वाध्याय । बहु स्वहिताय ।
साधण्या मनोलय । सहजपणे ॥२४॥
तप आणि स्वाध्याय । इतकेचि हाती जाण ।
यश, अपयश वा अन्य । ईश्वराधीन ॥२५॥
प्रेमाने घेणे नाम । करताना सर्व काम ।
इच्छेचे नामोनिशाण । नसावे चित्ती ॥ २६॥
हेच ईश्वरप्रणिधान । ईश्वरनिष्ठ होणे जाण ।
ईश अस्तित्वाचे भान । ठेवणे सदोदित ॥२७॥
संतजनांचे दर्शन घेणं । यशाशक्य सत्संग करणं ।
हे ही ईश्वरप्रणिधान । जाण सतशिष्या ॥२८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023
TOP