कामधेनूस वंदन
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
॥ श्री गणेशायनम:॥ श्री कुलदेवताय नम : ॥
॥ श्री स्वधर्म कामधेनूस वंदन ॥
अत्यंत जिव्हाळ्याने सांगता सांगता मंगल उपदेशाचे अंति माऊली जाणीवपूर्वक सांगतात -
तो वरी स्वधर्म अनुष्ठान । तेच ज्ञानोत्तर भक्तिलक्षण ।
स्वस्थतेचे दर्शन । शाश्वत, सिद्ध ॥
म्हणजेच ज्ञानपूर्व व ज्ञानोत्तर दोन्ही अवस्थेत स्वधर्म जगणे आवश्यक आहे कारण या विशेष आचारणातून शाश्वत आणि सिद्ध अशा स्वस्थतेचे दर्शन घडेल व असे जीवन आपणही जगावे अशी प्रेरणा इतरांनाही मिळेल. ऐहिक व परमार्थिक जीवनांगे समृद्ध व संतुलित होणार असतील तर समाज अशा उपकारक साधनांना हृदयात का बरे स्थान देणार नाही? माऊलींच्या प्रेरणेने या प्रकरणाद्वारे मी 'स्वधर्म-कामधेनू ' हे भाग्यदालन सर्वांसाठी खुले करीत आहे. कित्येक गोष्टी आपल्यासमोर प्रकाशित असतात पण दृष्टीदोषामुळे दोषदृष्टिमुळे व त्याविषयी अंत:करणात आस्था नसल्याने आपणास त्या गोष्टी दिसू शकत नाहीत, वस्तुत. हे भाग्यदालन ७०० वर्षांपासून उघडेच आहे. स्वधर्म म्हणजे जीवन जगत असताना आपले आचरण कसे असावे, वैश्विक नियमांचे पालन इ. विषयांचे स्पष्ट मार्गदर्शन होय. हा स्वधर्म सार्यांसाठी एकच एक नसून तो चार गटांना चार प्रकारचा आहे. गुणधर्मानुसार त्यात भेद भासला तरी माऊलींच्या सांगण्यानुसार परिणाम एकच आहे व तो म्हणजे इच्छापूर्तिद्वारा भोगभरित होणे व मोक्षसिद्धता. स्वधर्म पालन व साधना यांनी कैवल्यपदही गवसू शकते. भेद भासला तरी श्रेष्ठत्व-गौणत्व असे काही नाही. स्वधर्म हा वर्णावर अवलंबून आहे. तीन राशींच्या गटाला एक वर्ण असतो. वर्ण व रास ही जन्म, ठिकाण जन्म दिनांक व जन्म वेळ यावरून ठरतात. जन्म कोणत्या घरात झाला यावर वर्ण ठरत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण व प्रस्थापित होत आलेल्या जाती यात भिन्नत्व आहे. ब्राह्मणाच्या घरात ब्राह्मण, क्षत्रियांच्या घरात क्षत्रिय, वैश्याच्या घरात वैश्य व शुद्रांच्या घरात शूद्र जन्मावा असा वैश्विक साम्राज्यात दंडक नाही. अगदी एका कुटुंबात ही चारही वर्णाच्या व्यक्ती असू शकतात. या जगातील सर्व देशात, सर्व धर्मपंथात, सर्व जातीत, स्त्री व पुरुषातही चारही वर्णाच्या व्यक्ती असतात. भारतीय ज्योतिषशास्त्राचा यास आधार आहे. हे एकदा सर्वांनी शांत डोक्याने जाणीवपूर्वक समजून घेतले त्याचा पडताळा पाहिला तर कोणाची दिशाभूल होणार नाही. जात, धर्म व धर्मनिरपेक्षता यांचे आधारे होणारे गलिच्छ राजकारण संपुष्टात येऊ शकेल. या तत्वज्ञानाचा दुसरा फायदा असा की कळत-नकळत होणारा वर्णसंकर थांबविता येतो. उदाहरणार्थ एखाद्या पालकाने मुलास पैसा व त्याची बुद्धिमत्ता या आधारे डॉक्टर होण्यास भाग पाडले व तो जर वैश्यगटातील असला तर यथावकाश त्याची वैश्य म्हणजे व्यापार वृत्ती वर डोके काढून वैद्यकीय सेवा या पवित्र गोष्टीचा तो व्यापार करून टाकेल. म्हणून वर्णाप्रमाणे योग्य कामधंदा निवडला तरच आर्थिक लाभ व कामात रस वाटणे (job Satisfaction) या दोन्ही गोष्टी साधल्या जाऊ शकतील. हा विषय खरोखर लिहून न संपणारा असा व्यापक आहे. प्रत्येकाने हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत व तत्वांचा अंगिकार करीत या ज्ञानाद्वारे विकास साधून समाजात जीते-जागते उदाहरण म्हणून वावरले पाहिजे. अशाप्रकारे समाजाला योग्य विचारसरणी मिळाल्यावर डाव्या किंवा उजव्या विचारसरणीची गरज काय ?
चातुर्वर्ण्य मया सृष्ट गुणकर्मविभागश: ।
तस्य कर्तारमपि मां विध्दयकर्तारमव्ययम ॥
असे भगवान स्पष्टपणे सांगतात तर साम्यवादाला डोक्यावर घेण्याचे कारणच काय ? साम्यवादाला त्याच्या जन्मभूमीतच मूठमाती मिळायची वेळ आलेली सर्व जग बघत आहे. तसेच चंगळसंस्कृतीचेही दुष्परिणाम प्रकर्षाने प्रकट होऊ लागले आहेत. तेव्हा स्वधर्माला अंगिकारायला निदान भारतीयांना तरी अडचण भासायला नको. आंतरजातीय विवाहाची ओढाताणही अनावश्यक ठरेल.
परिवर्तनाशिवाय प्रगती होत नाही, सहकार्याशिवाय प्रगती होत नाही. तसेच स्वधर्माशिवाय संतुलित प्रगती साधणार नाही. हे लोकांच्या लक्षात येवू लागले व स्वधर्माचा अंगिकार करणार्यांचे संख्याबळ वाढीस लागेल. स्वधर्माचे सुपरिणाम व्यापकपणे तिसर्या पिढीत व्यक्त झालेले दिसतील. गीतेवर व ज्ञानेश्वरीवर गेल्या सातशे वर्षात अफाट सांगितलं व लिहिलं गेलंय पण जात वेगळी वर्ण वेगळा हे ठामपणे सांगण्याचे, या अति आवश्यक बाबीचा प्रचार करण्याचे कदाचित राहून गेले. स्वधर्माचे नेमकेपण नीटपणे व्यक्त केले गेले नाही असेच एकूण समाजस्थिती बघून वाटते.
एक मात्र नक्की की 'ओम हा गुरु' या पुस्तकाद्वारे श्री गणोरे महाराजांनी एक सुंदर विश्लेषण समाजास दिले व फार मोठी उणिव भरून निघाली. मी स्वत:ला या विश्लेषणाच्या प्रचारकांपैकी एक असे समजतो.
'स्वधर्म कामधेनू' हे या पुस्तकातील प्रकरण म्हणजे माऊली गणोरेबाबांना विनम्र अभिवादनच होय. एका मोठ्या ध्येयाच्या पूर्तिचे समाधानही ! स्वधर्म हे प्रकरण ज्ञानेश्वरीत अध्याय क्र. ३ ओवी क्र-७७ ते १३७ येथे असून त्या अध्यायात पुढेही काही ठिकाणी तसेच चौथ्या व अठराव्या अध्यायातही स्वधर्माबाबत सुंदर उल्लेख आहेत, अगदी पसायदानातही हा धागा गुंफलेला दिसतो.
सर्व वाचकांच्या सोयीसाठी व या भाग्योदय पुस्तकाच्या समृद्धीसाठी सदर ओव्यांच्या समावेश केलेला आहे. आत्तापर्यंतच्या साधलेल्या सुंदर विवेचनाच्या पार्श्वभूमीवर या ओव्यांचे वाचन आपल्या अंत:करणास अतीव समाधान देईल याची मला खात्री वाटते. या प्रसंगी ज्ञानेश्वरीतील एका ओवीची आठवण करून द्यावीशी वाटते. ती ओवी म्हणजे-
ऐसियेचि श्रोता । अनुभवावी हे कथा ।
अति हळुवारपण चिता । आणोनिया ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023
TOP