॥ देवाचिये द्वारी ॥

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


माऊलींचा हरिपाठ प्रसिध्दच आहे. त्यातील अगदी पहिल्या ओळीतच माऊली प्रयोग सांगतात. ''देवाचिये द्वारी उभा क्षण भरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥''  असे क्षणभर उभे राहताच 'हरि मुखे म्हणा' असा त्याचा अभिप्राय आहे. आता देवाचे द्वार कोणते? हा प्रश्न ! कोणी म्हणेल पंढरपुर, कोणी म्हणेल तुळजापूर कोणी म्हणेल गाणगापुर, कोणी म्हणेल काशी इ. यात वादविवाह करण्यासारखे काहीच नाही. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा व श्रद्धेचा विषय आहे. अशा दर्शनाने पुण्यसंचय होऊन, मन आनंदी होऊन अंतर्मुख होते व त्यानंतर मात्र सर्वांसाठी एकच द्वार आहे व ते म्हणजे अंतरीचे हरिद्वार! 'मी' ही जीवंतपणाची, असण्याची जाणीव ज्या ठिकाणी होत असते तेचे हे अंतरीचे हरिद्वार होय. माऊली क्षणभरच उभे राह्यला सांगतात. कारण त्यांना खात्री आहे की, या विशिष्ट क्षणी जे शांती, समाधान, सुख उगवेल त्यांच्या अनुभवानंतर ते द्वार हरिभक्त सोडणारच नाही, मी जिवंत आहे, मी आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणालाच अन्य साधनांची उपकरणांची, उपदेशाची, शिक्षकाची वा देवाचीही गरज भासत नाही. कारण प्रत्येकास तो अनुभव निश्चितपणे व थेट येत असतो. तेथे संशयास जागा नाही. अशी ही अद्भूत जाणीव नेमकी कोठे होते याचा शांतपणे घेतलेला मागोवा म्हणजेच खरी साधना होय. एकरूपता साधण्याचा हाच राजमार्ग आहे. सदर 'अवतरला मंगल उपदेशू' असा मागोवा व एकरूपता काशी साधावी हे नीटपणे शिकवे. ओवी क्र. ७२ ते ८० प्रमाणे रोज एक तास ध्यानप्रयोग केला (कधी डोळे बंद ठेवून व कधी उघडे ठेवून) तर आश्चर्यकारक अनुभव येतील. यामुळे आत्मभानरूपी हरिद्वार सापडेल व योग्य समयी हरिचे दार उघडेल. यापुढे काय? हे सांगायचे नसते, सांगता येत नाही. एका प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करणे म्हणजेही पापच होय. ''अनुभव हीच खूण ज्याची त्याची ॥'' या पवित्र उपदेशाचा आदर करून, अंगिकार करून, स्वानुभूतिसमाधानरूपी गुरुदक्षिणा माऊलींना देऊन कृतार्थ व्हावे,
तदनंतर उर्वरित जीवन म्हणजे,
''तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता'' असे होय.
प्रार्थना करावी..
आशिर्वादासाठी आता याच क्षणी ।
ठेवितो मी माथा, माऊली चरणी ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP