चल जळो ज्ञानविज्ञान गड्या !
लखलाभ होउ पंडितमन्या. ध्रु०
फाड पटाला, फोड घटाला,
अजुनि न ये त्यांचा कंटाळा;
जपलें प्राणाहुनि मी ज्याला,
उधळ हिरे मोत्यें सखया ! १
देति शिव्या पंडित मद्याला,
गटगट पिउं पेल्यावरि पेला,
दिली तिलांजलि सुज्ञपणाला,
हसतिल हसोत ते उभयां ! २
कडकड मोडिल गगनमांडवा
फाडुनि उधळिल दिशांस अथवा,
अशा वादळा सोड भैरवा,
बंद तटातट तोड सख्या. ३
काय जागणें ? कसलें निजणें ?
टाक फाडुनी सारीं स्वप्नें ?
चिंध्या चिंध्या करुनि उधळणें !
काळशिरीं चल नाचाया ! ४
तूं राजा मी राणी कांता,
भीड लाज मग कशास आतां ?
होउनि केवळ निसंग नाथा,
रंगिं रंग मिसळीं सदया. ५