पंजरीं पांखरूं फडफडतें,
आदळी पंख, शिर आपटतें. ध्रु०
वर्तमान, तुझि अजस्त्र कारा,
कुठुनि निघाया न दिसे थारा,
बाहेरिल नच फिरके वारा,
आंतलय आंत मन हें कुढतें. १
भविष्याचिया दूर कडांवरि,
सखे घुमविती मंजुळ बांसरि,
अंधुक मंदचि येति लकेरी,
भडभडे ऊर, मन तडफडतें. २
रे अजात अज्ञात सखे जन !
जेव्हां तुमची होय आठवण
विसरे मन भिंतीचें वेष्टण
शिर भिंतीवर निघतां फुटतें. ३
ह्रदयाच्या माझ्या आकाशीं
आंतिल सूर्याचिया प्रकाशीं
तुमच्या छाया पडतां त्यांशीं
कुजबुजे, रमे मन, बडबडतें. ४
या कुजबुजिच्या अंधुक ताना
शतकांतुनि का रिघतिल काना ?
डोलवाल का सांगा माना,
का स्मराल मन जें धडपडतें ? ५