जन खुळे म्हणति तर अपण खुळे !
त्यांचें अपुलें कधिं न जुळे ! ध्रु०
त्यांचा अपुला मार्ग निराळा,
दिक्कालांचा त्यांना आळा;
प्रणयी आठवि का दिक्काला ?
पाळ आपुली खिरे पळें. १
हपापले जन वस्त्राभरणा;
विटलों मधल्या देहावरणा;
वस्त्रें रत्नें काय आपणां ?
दों जीवांतिल पटचि गळे. २
जिवा-जिवांतिल भान सुखाचें
आड सुखा त्यांच्या येण्याचें,
तेंच हरपलें अपुलें साचें !
पार सुखास न त्याचमुळें. ३
कमलदलस्थितजलबिंदू गे,
दल हललें, जुळलें ते दोघे;
माझ्या तुझिया या संयोगें
आकृतिचा गे बांध गळे. ४