जन म्हणति सांवळीं तुज सगळे.
करुणार्ह बिचारे ते अंधळे ! ध्रु०
नवमीची गे रात्र सांवळी.
चंद्रकोर बिजवरा कपाळीं,
शालूवरि तार्यांची जाळी,
ज्या मोहवी न त्या काय कळे ? १
त्याच रात्रिच्या अगाध उदरीं
तेजोनिधि वडव्यापरि सागरिं
प्रगटतांच तो दशदिशांतरि
कोंदुनी प्रभा त्रिभुवन उजळे. २
अगाध सुंदर यमुना काळी,
तटीं गर्द झाडांच्या ओळी,
वेडा झाला तो वनमाळी,
उजळिते मनोमल शाम जळें. ३
काळा काळा मेघ सुंदरी,
भाग्यहीन जो मोहे न परी,
धनधान्याची समृद्धि उदरीं
मरतील बापडे जरी न वळे. ४
तरंग झुलती, विचार फुलती,
हास्य-अश्रु तव मनिं दरवळती,
बाग पटांतरिं फुले गोड ती,
पट गळतां सेवूं गोड फळें. ५
नील कमलिनी माझी सुंदरि,
जन्मजन्मिं लाभो मज ती तरि,
केवि बघति मतिमंद पटांतरिं,
दृष्टीच जयांची भरे मळें ? ६