अगाध दुर्मिळ जनीं दिसे मज कांहिं तुझ्या लोचनीं ध्रु०
या डोळ्यांच्या खिडक्यांभीतरि
अफाट अनुपम दिसे माधुरी,
प्रिये जिवलगे, काळिज त्यावरि
टाकिन कुरवंडुनी. १
अथांग भरला अपार सागर,
हेलकावतो अगाध सुंदर,
नाचति रविकर जललहरींवर,
कांपे मन पाहुनी. २
अफाट निर्मल आभाळांतुनि
तारे डौलें निघति पलटणी
तालसुरावर नियमित चरणीं
जणुं तंबुर ऐकुनी. ३
मूर्तिमंत जणुं रागरागिणी
तन्मय झाल्या गोड गायनीं
नाग, हरिण, सुरतरुणि, यक्षिणी
डुलति सखे, परिसुनी. ४
मदनाचा कुणी तरुणि पाळणा
हलवी गाउनि दिव्य गायना
जादूची का ही गे रचना
कीं भासचि हा मनीं ? ५