नववधू प्रिया, मी बावरते;
लाजतें, पुढे सरतें, फिरते. ध्रु०
कळे मला तूं प्राण-सखा जरि,
कळे तूंच आधार सुखा जरि,
तुजवांचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरतें. १
मला येथला लागला लळा,
सासरिं निघतां दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडितां कसें मन चरचरतें ! २
जीव मनींच्या मनीं तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळें
पळत निघावें तुजजवळ पळें
परि काय करूं ? उरिं भरभरतें. ३
चित्र तुझे घेऊनि उरावरि
हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करिं,
तूं बोलावितां परि थरथरतें. ४
अतां तूंच भयलाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरें घर तें ! ५