कवणे मुलुखा जाशी गे तूं ? कवणे मुलुखा जाशी ? ध्रु०
भार शिरावर, अपार सागर, फुटकी नाव जराशी. १
जनकजननि ते तुझे कवण ते ? कोठिल तूं रहिवाशी ? २
कुठे वतन तें, कुठे सदन तें ? मळे, खळ्यांच्या राशी ? ३
वायु झराझर आळव सुस्वर, ओढि तुझ्या पदराशी. ४
सूर्याचे कर धरुनि तुझे कर आर्जविती रहाण्याशी. ५
या जळलहरी येथिल सुंदरि, आवळिती चरणांशीं. ६
माझें तें घर तुझें गडे कर, लावुनि ऊर उराशी ! ७
गाउनि निज गुज निजविल काळिज माझें श्रांत मनाशी. ८
साहस न करीं अथांग सागरिं एकलि अशी प्रवासीं. ९