मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
कुणी कोडें माझें उकलिल का ?

कुणी कोडें माझें उकलिल का ?

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


कुणि कोडें माझें उकलिल का ?

कुणि शास्त्री रहस्य कळविल का ? ध्रु०

ह्र्दयिं तुझ्या सखि, दीप पाजळे,

प्रभा मुखावरि माझ्या उजळे;

नव रत्‍नें तूं तुज भूषविलें,

मन्मन खुललें आंतिल कां ? १

गुलाब माझ्या ह्र्दयीं फूलला,

रंग तुझ्या गालांवर खुलला;

कांटा माझ्या पायीं रुतला,

शूल तुझ्या उरिं कोमल कां ? २

माझ्या शिरिं ढग निळा डवरला,

तुझ्या नयनिं पाउस खळखळला;

शरच्चंद्र या ह्रदयिं उगवला,

प्रभा तुझ्या उरिं शीतल कां ? ३

मद्याचा मी प्यालों प्याला,

प्रिये, तयाचा मद तुज आला;

कुणीं जखडिलें दोन जिवांला

मंत्रबंधनीं केवळ ? कां ? ४


कवी - भा. रा. तांबे

जाति - प्रणयप्रभा

राग - कालिंगडा

ठिकाण - प्रतापगढ

दिनांक - ५ सप्टेंबर १९२०

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP