श्री गणेशायनमः श्री गुरुभ्योनमः
हरि ॐ तत्सत्
आरुढला प्रेम पदा वरीरे । हृत्पंकजीं संतपदें धरीरे ॥
सच्चित्सुखें राज्य सदा करीरे । त्यामानवातें ह्मणिजे हरीरे ॥१॥
अत्यंत या आजि भवासि आलों । चित्सागराच्या उदरीं रिघालों ॥
झालों सुखी संत दया प्रसादें । यालागि मी निश्चळ आत्मबोधें ॥२॥
आरुढला मंगळ मोक्ष भद्रा । त्याचिंतिता चिन्मय देव इंद्रा ॥
इंद्रादिकां लागुनि धन्य झालों । मीं अच्युतानंत पदासि आलों ॥३॥
हरीनें निजमंदिरा अभिषेककेले । प्रवृत्तीनदी आटली दुःख मेलें ॥
सुखाब्धी मनीं दाटला लाभ झाला । रमानाथ संपूर्ण हातासि आला ॥४॥
हासंभवे लोक समस्त पाही । तेनाशिले कारण संत पायी ॥
यालागिं मी सर्व सुखाब्धि झालों । अनंत होवोनि निवांत ठेलों ॥५॥
त्दृदिस्थ मी केवळ सर्ववासी । आहे चिदानंद अनंत राशी ॥
हा आकळे सार विचार ज्याशीं । नाचे शिरीं घेउनि मोक्षत्यासी ॥६॥
हृदय कमळवासी सद्गुरुनाथ केला । ह्मणवुनि भवमाझा सर्व सांडूनि गेला ॥
परम विमल झालों ज्ञान योगें निवालों । त्रिगुणरहितबोधें सत्पदाशीघ्र आलों ॥७॥
हरीचिंतनि सर्वदा तृत्प झालें । हरी अंतरीं लक्षिता जें निवालें ॥
महा बोध ज्यांच्या नितीमाजि चाले । महाराज ते देखिले दोषगेले ॥८॥
अहो आह्मीं काय आतां करावें । कोठें जावें काय घ्यावें त्यजावें ॥
जेंजें भासेती तुकाराम झाला । ऐसा राम भेटता भेद गेला ॥९॥
हरुनि विषयवल्ली कल्पना भस्म केली । परम गुरुदयाळें भ्रांति चोरुनि नेली ॥
ह्मणवूनि मन माझें पावले तत्त्वसारा । गुणमपि जठरीच्या चूकल्या येरझारा ॥१०॥
हृत्पंकजीं शर्म अखंड पाहे । शर्मी सदावास करुनि राहे ॥
या लागि तो शर्म स्वरुप झाला । शर्मी विनालोक नसे तयाला ॥११॥
हातीं चिदानंद धरुनि देतो । तो भेटतो डोल सुखासिये तो ॥
बोलों किती पार दयानिधीचा । पादां बुजी ठाव नुरे विधीचा ॥१२॥
हरिकरी हृदयीं जरा थार हो । तरि पळे जीव घेउनि मारहो ॥
निजसुखा नदिसे मग पारहो । कवि असें वदला श्रुति सारहो ॥१३॥
हृत्पंकजीं राम समग्र आला । समाधि हा जागृत पूर्ण झाला ॥
गेला लया इंद्रिय गोल पाही । माझ्या मतें आजि भुगोल नाहीं ॥१४॥
हृत्पंकजीं आत्म सुखे निवाला । लोकत्रया माजि दिनेश झाला ॥
तेजों बळे सूर्य शशांक लोपी । भावे भजातो निजदेव रुपी ॥१५॥
हरि कथा करितां मति रोधिली । हरिपदीं रमता अति बोधिली ॥
हरिसुखें भरली तरली भवीं । मिसळली मग केवळ केशवी ॥१६॥
हा देह झाला नभ चित्र ज्यासी । श्रुती ह्मणे पूर्ण पवित्र त्यासी ॥
विचित्र तो सर्वहि लोक पाहे । त्याची कथा ब्रह्म चरित्र आहे ॥१७॥
होऊनिया मुक्त समग्र कामी । झालों सदा निश्चळरामना मीं ॥
घना वलावा सविला रामी । लोकत्रयीं आजि सभाग्य आह्मीं ॥१८॥
हरि रसा विण पानचि नेणें । मृगजळा परि हे जन जाणे ॥
क्षणभरी न पडे भव कामी । तरि ह्मणे नर तो हरी आह्मीं ॥१९॥
हृदय कमळ कोशीं सेविता रामचंद्रा । ह्मणवुनि मज भेटे नित्य विश्रांति भद्रा ॥
सुखमय निजमुद्रा बाणली इंद्रियासी । अभिनव गति माझी जा पुसा योगियांसी ॥२०॥
हृदय पंकज मंदिर वासिनी । सुखमयी जननी श्रम नाशिनी ॥
जनीं वनीं नयनीं अति आदरें । निरखिता न दिसे मज दूसरें ॥२१॥
पदत्रयाचें निज सार शोधी । शोधूनि तेथें मन पूर्ण बोधी ॥
बोधूनि यातें सुख होय आंगे । समाधि लागे मग त्याची मागे ॥२२॥
प्रपंच मिथ्या मय सांगताहो । कमोदरी कांतरी वागता हो ॥
जळो जळो मायि क सांगणें हो । पूर्णासि नाहीं तव मागणे हो ॥२३॥
पतंग कोटी लपति प्रकाशीं । प्रकाशला तो निज तेजराशी ॥
यालागि पाही तम तेज कांहीं । स्वयंप्रकाशी उरलेचि नाहीं ॥२४॥
पतिव्रता पावन शांति नारी । पती तिचा बोध प्रबुद्धभारी ॥
परस्परें संग घडोनि आला । तेंव्हाचि हा गोचर राम झाला ॥२५॥
पतित पावन सद्गुरु जोडला । भव भयानक मंडप मोडला ॥
परम वैभव मंगळ साधलें । सुख रमा पतिचें मज लाधलें ॥२६॥
पश्चात्तापी तोचि मोठा प्रतापी । केला जेणें भस्म संकल्प पापी ।
बोधें न्हाला आत्मबोधें निवाला । विश्रामाचा पूर्ण विश्राम झाला ॥२७॥
प्रकाशुनी सर्व श्रुतीं मुरारी । विशाळ हा काळ भूजंग मारी ॥
तो सद्गुरु स्थावर जंगमारी । विलोकिता अश्रम शून्यचारी ॥२८॥
प्रभाकराचा कर ही न पावे । न पावता मारुतही स्थिरावे ॥
तया पदा संत समर्थ गेले । न बोलता वेद विनोद केले ॥२९॥
प्रकाशिता जी सम वर्णवर्णा । आकर्णिता केवळ तृप्तिकर्णा ॥
नाहीं तयावर्ण नसे विवर्णा । घाली तुह्मा मंगळ माळ पूर्णा ॥३०॥
प्रकाशुनि शाश्वत पूर्ण वस्तू । करी सदा द्वैत तयासि वस्तु ॥
तो सद्गुरु चिन्मय चंद्रमा हो । क्षणो क्षणी आत्मसुखें रमाहो ॥३१॥
मृगांभा परी बाधिता सर्व पाहे । अबाधीत जे वस्तु ते पूर्ण राहे ॥
तयें वस्तुचें नाम विख्यात साधू । श्रुति बोलती हाचि सिद्धांत बोधू ॥३२॥
मी लक्षि तो मंगळ व्योम शामा । यालागि नाहीं मज लागे गोमा ॥
नेमा अनेमा परसाचि झालों । विश्रामधामाप्रति शीघ्र आलों ॥३३॥
मदन भाजन सज्जन जोडी । स्वपद दायक संपत्ति जोडी ॥
गगन ग्रासुनि निश्चळ राहे । अमळ केवळ चिद्घन पाहे ॥३४॥
माता पिता केवळ संत पाही । त्या वेगळा आणिक देव नाहीं ॥
ऐसा मनी निश्चय पूर्ण ज्यासी । झाला सदा चित्सुख लाभ त्यासी ॥३५॥
माया काया घ्यावया मूळकारी । माया वाया अक्षया नंदहारी ॥
माया संगी तो जगीं दुःख भोगी । माया भंगी अद्वया नंद योगी ॥३६॥
मनासि मारुनि निवांत राहे । पदोपदी त्यासि समाधि आहे ॥
एकांत हा सर्व श्रुतीं तयासी । नेणेंचि तो अन्य गंत तरासी ॥३७॥
मनो वासना शीघ्र सारुनि माना । अती आदरे सज्जनालागि माना ॥
सच्चिद्घनानंद कंदा निधाना । नका विसरा सर्व सारा निधाना ॥३८॥
मति अती तरणी जरि आहे । तव हरीचरणीं स्थिर राहे ॥
शिवमणी करणी हरि येई । मुनीकुळीं तरणी मग होई ॥३९॥
मधुवनीं नयनी हरि पाहे । अनुदिनी सुमनांजुळि राहे ॥
सुखघनी सजणी करु थारा । मग कदा नलगे श्रमवारा ॥४०॥
मन करी अमनी जरि थारा । तरि कदा नलगे श्रमवारा ॥
गुज असें श्रवणीं शिव बोले । निजसुखें श्रवणीं मग डोले ॥४१॥
मन करी हरिचा जरी झासा । तरि तुटे रस पंचक फासा ॥
गुणमयी निरसे श्रम नासे । निजसुखें बरवें मग हासे ॥४२॥
मन हरी स्मरणी बहुधालें । अनुदिनी करणी हरि ल्याले ॥
हरिमयी धरणी वरि चाले । निरसितें तरणीमय झाले ॥४३॥
मति सदा वळली शिवपाई । भवरती गळती तरि पाही ॥
निजगती कळतां लवलाही । अतिसुखें फळती मुनिठायी ॥४४॥
मन रमे हरिच्या चरणीं हो । मग कसी विगुते करणी हो ॥
जन मतें धरणी वरि आहे । श्रुति ह्मणे तरणी पर पाहे ॥४५॥
मुळिहुनि त्यजुनी जन लाजरे । भज सदा बरवा गुरुराज रे ॥
तरि सदा त्रिविधा भव काजरे । शिवरसें मन हे मग पाझरे ॥४६॥
म्यां साधुचा आजि दुमाल केला । गळोनिया काम रुमाल गेला ॥
हे घातली शीघ्र उडीच तेथें । क्षराक्षरा लागि अभाव जेथें ॥४७॥
माया नारी बोध खड्गेच मारी । संसारीं या राहिला निर्विकारी ॥
झालीं चारी मंदिरें निश्चयेसी । सर्वात्मा तो जाणिजे संत वंशी ॥४८॥
माया माया काम संकल्प वारी । चिंता वारी शोकबाधा निवारी ॥
नानाकारी भेद वैरी विदारी । सर्वात्मा तो गोपुरीं भक्त तारी ॥४९॥
मारुनीया काम कुनाम कारी । विलोकिता राम समावतारी ॥
दया तया शांति क्षमा रमाया । येती तयालागीं सदा नमाया ॥५०॥