केशवस्वामी - श्लोक संग्रह ७

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.

अती चंड कोदंड घेऊनि पाहे । सुवेळा चळी वोढि काढुनि राहे ॥

हरी प्राण त्या दुर्गुणा रावणाचा । स्मस राम तो नाथ साधु जनाचा ॥३०१॥

आकर्णिता कर्ण सदा निवाले । विलोकिता लोचन तृत्प झाले ॥

आलिंगिता चित्त अपार धाले । त्या स्वामिचे नाव मुखासि आले ॥३०२॥

असोनिया दृश्य लयासि गेले । हे सज्जनी कौतुक थोर केले ॥

झाल्या जगीं सर्व निवांत पाहीं । बोले किती ठाव मतीसि नाहीं ॥३॥

अविकृत निज बोधे सेविता चिदघनासि । चळण वळण नाही सर्वदा सज्जनासी ॥

परम विमळ झाले पावले आत्म धामा । कवि ह्मणे सम भावे भेटले तेचि आह्मा ॥४॥

असे गोपती गोमती माजि पाही । तरी गोमती लागि नेणेचि कांहीं ॥

असे जाणती गोमती त्यासि नाहीं । स्वये गोपती मूर्ति ते याचि देहीं ॥५॥

अति सखा गुरु हा जरि भेटे । सुख निधी त्दृदयीं तरि लोटे ॥

मती गळती मती मग पाहीं । नि जगती परती गति नाहीं ॥६॥

अपार बोधे मृत सिंधु दाटे । मिळोनि तेथें मन चंद्र आटे ॥

ते काळिचा लाभ कसा वदावा । अत्यंत झाला लय दृश्य भावा ॥७॥

अति भ्रमे भ्रमला जन सर्वथा । क्षणभरी न करी गतीची कथा ॥

भव तमी पडला श्रम पावला । निज सखा हरिचा कवि साहिला ॥८॥

अतिशयी ममता धरुनी मनी । जन सदा भजती धन कामिनी ॥

ह्मणउनी पतनी पडती सदा । विसरले गृहिची निजसंपदा ॥९॥

अपार हे दृश्य हरुनि नेले । वेडे मला आत्मसुखेचि केले ॥

त्या स्वामिचा काय प्रताप वानु । दयार्की सीतळ बोध भानु ॥१०॥

अपार हे पुण्य फळासि आले । साधू करी पिंड प्रधान झाले ॥

गेले लया पातक पंचधाहो । झाले सुखी आत्मपदीस दाहो ॥११॥

अंगवात मुनिचा जरी लागे । चित्त आत्म श्रवणी तरी जागे ॥

शुन्य होय ममता मन रोधे । सर्व दुःख निरसे सम बोधे ॥१२॥

दया निधी स्वामि घरसि आला । माया मदा लागि हराश झाला ॥

गेला लया द्वैत दशा विकारी । झालो निजा नंद पदाविकारी ॥१३॥

दया घनाच्या निज वाक्य धारा । चैतन्य गारा स्त्रवती अपारा ॥

संसार वारा अवघा निमाला । आनंद झाला कवि केशवाला ॥१४॥

देवुनिया देव प्रकाश वासी । स्वयंप्रकाशी दिधली मिराशी ॥

केले सदा सर्व सुखा भिलाशी । स्वानंद लाभे भजतो तयासी ॥१५॥

दया क्षमा संग करुनि याहो । दुर्वासना पाश हरुनि याहो ॥

ग्रासुनिया सर्व असर्व भावा । भावा अभावाविण देव घ्यावा ॥१६॥

देवूनि भेटी भव दुःख लोटी । ठेवूनि पोटी जिव भाव घोटी ॥

स्वानंद पेटी उघडूनि तेणे । हे लेवविले सम राम लेणे ॥१७॥

दया निधी संत घरासि येती । नाना विधा दोष हरुनि नेती ॥

हाती चिदा नंद समग्र देती । या कारणें साधक दास होती ॥१८॥

दुर्वासना घाठ सपाट केला । या कारणें आट अचाट गेला ॥

हे दाटले चिन्मय सार देही । गेला लया देह नुरेचि देही ॥१९॥

दया सद्गुरु स्वामिने पूर्ण केली । मृषा कल्पना नासती भ्रांति गेली ॥

सुमित्री तया भूत मात्री घडेहो । अभेदे चिदानंद हाता चढेहो ॥३२०॥

दृश्य भानन दिसे अनुज्यासी । भाग्यवंत ह्मणती मुनि त्यासी ॥

इंद्र चंद्र धरिती पद माथा । तोचि देव कळला मज आता ॥२१॥

दयाळ घाली शिवमाळ ज्यासी । त्रिकाळ नाहीं भवजाळ त्यासी ॥

कराळ तो काळ जिवेचि मारी । झाला सदा आत्त्म पदाधिकारी ॥२२॥

दावूनिया चित्सुख माणिकाला । मागोचि नेंदी मज आणिकाला ॥

त्या सेविता सत्य प्रमाणिकाला । प्रमाण नाहींच मनादिकाला ॥२३॥

चिद्राघवाचे निजनाम घ्यावे । चिद्राघवासी बरवे भजावे ॥

चिद्राघवाच्या मिळणी मिळावे । चिद्राघवाचे निजरुप व्हावे ॥२४॥

चिदात्माचि मी प्रत्यया पुर्ण आले । क्रियाजाळ जंजाळ तेणे निमाले ॥

गळाले मृषा द्वैत नानाविधाहो । सुखेपावलो सन्मयीं संपदाहो ॥२५॥

चित्सागराच्या उदरासि आलो । कुमत्सरा पासुनि मुक्त झालो ॥

यालागि मी अद्वय मच्छ पाही । माझ्या पदी कच्छप मच्छपाही ॥२६॥

चिन्मूर्ति डोळा मज दाखवीली । अपार बोधे घनतृप्त केली ॥

बोलो किती मी माहमा तयाचा । आत्माचि तो प्राणसखा निजाचा ॥२७॥

चिन्मात्री केवळ हे न पाहे । यालागि माथा भवभार वाहे ॥

भोभोमृषा दुःख अपार जाणा । बोले कवीसार अभार कोण्हा ॥२८॥

येउनि वेगी समता वराया । विलोकिता चिन्मय देवराया ॥

जरादि दोषासि विनाश झाला । कवी रवी पूर्ण सुखे निवाला ॥२९॥

यथार्थ जो बोधक साधकासी । मिथ्या पणे संत जनासि त्रासी ॥

ऐसा महाघोर अनर्थकारी । संसार हा सद्गुरुनाथ वारी ॥३३०॥

येवूनिया चिन्मय अंबरासी । म्याप्राप्ति लाहा भव अंबुरासी ॥

यालागि शोकांबर त्याग झाला । हे ठाउके वर्म दिगांबराला ॥३३१॥

येवूनिया सद्गुरु देवराणा । झाला मला मोकळ आजि जाणा ॥

मागे पुढें पूर्ण सदा उभा हो । लोकत्रयीं एक करी प्रभाहो ॥३२॥

यथार्थ जे आत्म पदासि गेलें । ते संत म्या प्राण सखेचि केलें ॥

यालागि मी केवळ ब्रह्म झालो । क्षणक्षणाते गुज काय बोलो ॥३३॥

घाली कंठी सद्गुरु वाक्य गाठी । बोधे कंठी जन्म दुःखासि लोटी ॥

घोटी नित्यानंद सारा अपारा । स्वानंदाचा वोतलातो विचारा ॥३४॥

घेवुनिया मंगळ माळ जाणा । जपे सदा मंगळराणा ॥

लाधे तया मंगळ धामसाचे । निरंतरी मंगळ होय त्याचे ॥३५॥

घटा घोषे गर्जती वेद पाहो । साधू वेशे देवही नांदताहो ॥

निर्धारेसी देवुनि चित्त त्यासी । घेता आता राम तू राम होसी ॥३६॥

घालोनि मंगळ अंजनाते । प्रकाशिले शुद्ध निरंजनाते ॥

दयाळ ते तारक मुर्ति पाहो । पादांबुजी निश्चळ नित्य राहो ॥३७॥

घेवूनि माथा भव गौरवासी । वृथाचि जातो जन रौरवासी ॥

आहे निजानंद निधी करीहो । मृगांबुपाना प्रतिका करीहो ॥३८॥

लवकरि निजरुपालागि दावूनि दृष्टी । लपविलि गुरुराये आजि हे सर्वसृष्टी ॥

ह्मणउनि गुणत्याचे वर्णिता डोल येतो । कवि ह्मणे किती बोलो पूर्ण आनंद होतो ॥३९॥

तारावया सद्गुरु नाथ आला । आता तरीहा सगळाचि घाला ॥

घाला मिठी मंगळ पादचंद्री बैसा चिदानंद मुकुंदभद्री ॥३४०॥

तोडूनि भेद रचना निज वाक्ययोगें । साम्राज्य पूर्ण करवी स्वपदीच वेगें ॥

देऊनि त्यासि बरवे मन सर्वभावे । स्वानंद सार सलिलीच निमग्न होवे ॥३४१॥

त्यजुनिया धन नंदन दारा । मारामार करुनि तुह्मि मारा ॥

संतसंग धरुनी भव वारा । होय रामचरणी तरि थारा ॥४२॥

तोडूनि माया गुणसंग भावा । तात्काळ हा मोक्ष जनासि द्यावा ॥

ऐसा मनी आदर राघवाला । याकारणे सद्गुरु मूर्ति झाला ॥४३॥

तनु भ्रमे धरुनी धन गर्व रे । भवपुरी पडले जन सर्व रे ॥

क्षणभरी न करी शिव पर्व रे । ह्मणवुनी न कळे निज सर्व रे ॥४४॥

तात्कळ नाशी भवशार्वरी रे । हृत्पंकजी पूर्ण प्रभा करी रे ॥

दावी हरी एक निरंतरी रे । तो अंतरी बोध रवी धरी रे ॥४५॥

तरंग जैसे सलिली मिळाले । चिन्मात्र तैसे मुनिराज झाले ॥

झाले पणा लागुनि नेणती ते । अनादि मी चित्सुख जाणती ते ॥४६॥

टाकुनि या माया मय वास पाही । स्थिरावलो सर्वेनि वास पाही ॥

यालागि मी सर्व निवास झालो । विलासलो आत्मपदी निवालो ॥४७॥

ठेवूनिया हस्तक मस्तकी हो । देती हरी जाणुनि हस्तकी हो ॥

करुनिया मानस स्वस्थ आता । त्याचे धरा अक्षय पाय माथा ॥४८॥

ठेवूनिया मानस संत संगी । मी रंगलो सार विचार रंगी ॥

या कारणें भोग भवासि झाला । हृत्पंकजा सर्व निवास आला ॥४९॥

क्षणभरि भव मुक्ता वंदिता सर्व भावे । हरलि सकळ चिंता शोक गेला स्वभावे ॥

परम विमळ बोघें भंगिले भेद पात्रा । शिव मय मति झाली खंडली जन्म यात्रा ॥३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP