मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
अध्याय ६

श्री गणेश प्रताप - अध्याय ६

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसद्‌गुरुभ्यो नमः ।

श्रीक्षेत्रेशाय नमः । जयजयाजी श्रीविकटा । माझे हरी परमसंकटा । संसारी पावलो महत्कष्टा । चरणसंपुष्टा झोंबला तुझे ॥१॥

आता होतील माझे हाल । तरी लागेल तुला बोल । संकटहरण हे नाम विफल । मग होईल जगामाजी ॥२॥

अनन्य तुज जे शरण गेले । ते भवसमुद्री नाही बुडाले । ऐसे प्रत्यक्ष वेद बोले । तेच भले करी आता ॥३॥

तुझे नाव तो चिंतामणी । हे मी ऐकोनिया श्रवणी । स्मरणे रंगविली मी वाणी । कर्मकहाणी चुकवावया ॥४॥

तू दीनानाथ मंगलमूर्ती । मंगल करावे मजप्रती । शरण आलिया न उपेक्षिती । हेचि महंती महत्व पै ॥५॥

तुझा न कळे वेदा पार । तेथे मी काय वर्णीन पामर । सर्व अन्याय क्षमा कर । लंबोदर म्हणोनिया ॥६॥

श्रोती व्हावे सादर आता । उल्हासे कथितो गणेशकथा । श्रवणामात्रे संकटव्यथा । कदा आता नुरे पै ॥७॥

गणेशवर प्रतापेकरून । मधुकैटभ दैत्य मर्दून । विजयी जाहला मधुसूदन । ऐकोनि ऋषि धाविन्नले ॥८॥

करिती नारायणाचा स्तव । तेथे आला ब्रह्मदेव । त्यासि गणेशमहात्म्य सर्व । मग माधव सांगतसे ॥९॥

ऐसे निवटिता दानव । स्वस्थानी पावले सकल देव । स्वस्थ झाले धरा देव । धर्म सर्व प्रवर्तले ॥१०॥

व्यास म्हणे गा कमलासना । गणेशकथा श्रवणे मना । सुख होऊन वाटे नाना । अनुसंधाना परिसावे ॥११॥

ब्रह्मा म्हणे व्यासाप्रती । तू तो सुखाची सुखमूर्ती । प्रश्न करोनि जगाप्रती । धन्य स्थिती वाढविसी ॥१२॥

पाराशर्य महदाख्यान । आता सांगेन तुजलागोन । श्रवणमात्रे भवबंधन । तुटोन मुक्त संसारी ॥१३॥

वैदर्भदेशी कौंडिण्यपुरी । भीम नामा राज्य करी । धर्मपरायण नरकेसरी । उर्वीवरी प्रसिद्ध पै ॥१४॥

सर्व राजे आज्ञाधर । त्यासि देती करभार । सदा तिष्ठती जोडोनि कर । नरवीर तो असे ॥१५॥

दशकोटी ज्याची सेना । चारुहासिनी ज्याची ललना । गुणवती म्हणून अंगना । त्याचे मना मान्य ती ॥१६॥

सुविकसत्पद्मवदना । मृगशावाक्षी चारुलोचना । लावण्यराशी ती अंगना । पतिवचनानुरूप पै ॥१७॥

जे का धर्मपरायण । लक्षानुलक्ष ब्राह्मण । त्यांचे करीतसे पोषण । ब्रह्मपरायण भूप तो ॥१८॥

चारुहासिनी लावण्यराशी । क्रीडाकौतुके रंजवी तिशी । परि न धरि ती गर्भासी । तेणे मानसी खिन्न सदा ॥१९॥

मग राजा उद्विग्नचित्ते । बोलावूनि अमात्याते । भीम राजा सांगे तयाते । म्हणे राज्याते उबगलो ॥२०॥

तुम्ही राखा राज्यभार । वनी जावून मी सदार । माझे की इचे पाप थोर । जन्मांतर वोढवले ॥२१॥

संतती न होय इचे उदरी । तेणे उबगलो राज्यभारी । सुपुत्रावाचोनि संसारी । सुख तरी कायसे ॥२२॥

दीपावाचोनि शून्य मंदिर । चंद्रावाचोनि निशा थोर । कमलावाचोनि कासार । तैसा संसार शून्य माझा ॥२३॥

पतिव्रता लावण्य यौवन । जैसे शून्य पतीवाचुन । जैसे दुःखाचे आयतन । मजलागोन राज्य तैसे ॥२४॥

पुत्रावाचोनि स्वर्गती । नाही नाही वेद बोलती । पितर पावती अधोगती । हव्य न घेती देव कधी ॥२५॥

मनोरंजन आणि सुमंतु । तुम्ही अमात्य बुद्धिमंतु । राज्य चालवा निश्चितु । मज वनात जाणे असे ॥२६॥

ऐसी त्यासि आज्ञा करून । मग केले स्वस्तिवाचन । दाने गौरवोनि याचकजन । तपोवन प्रवेशला ॥२७॥

मागे धावती नागरिकजन । दीर्घस्वरे करिती रुदन । म्हणती आम्हासि नगरी त्यागुन । नृपती दीन करू नको ॥२८॥

ऐसा त्यांचा हलकल्लोळ । ऐकोन उभा राहिला भूपाळ । प्रजा आश्वासी तो दयाळ । नेत्री जळ आणोनिया ॥२९॥

सुमंतु आणि मनोरंजन । तुमचे करितील रंजन । आता मागे जावे परतोन । मजसमान माना दोघे ॥३०॥

राजा म्हणे सुमंताते । राज्य वोपिले तुमचे हाते । स्वधर्मे पाळावे प्रजाते । दया चित्ती करूनिया ॥३१॥

करोनि त्यांचे समाधान । अमात्यांसह प्रजाजन । स्वनगराते पाठऊन । पुढे आपण चालिला ॥३२॥

चारुहासिनीसमवेत । वनोपवने उल्लंघन करीत । पादचारी क्षुत्तृषाक्रांत । श्रम बहुत पावला ॥३३॥

राजकांता परम सुकुमार । तिचे चरणी वाहे रुधिर । तैसाच आक्रमोन धीर । श्रमे सुंदर चालतसे ॥३४॥

ऐसे चालता चरणचाली । त्याते अत्यंत तृषा लागली । तेणे गात्रे विकळ जाहली । जिव्हा पडली शुष्क त्याची ॥३५॥

तव अवलोकिले कासार । कमळे विकासिली सुंदर । वरी रुंजताति भ्रमर । सुंदर नीर शीतळ ते ॥३६॥

भोवते रम्य उपवन । वृक्ष गेले भेदीत गगन । सुमनवल्ली प्रफुल्लघन । मनोरंजन सुवासे ॥३७॥

निर्वैर प्राणी क्रीडा करिती । धेनू व्याघ्र एकत्र चरती । नकुळ पादोदर खेळती । वैरगती टाकोनिया ॥३८॥

बिडाळ आणि मूषक । एकत्र राहती निःशंक । ऐसे अवलोकिता कौतुक । आनंद दुःख हरपले ॥३९॥

चारुहासिनीसमवेत । भीम उदक प्राशन करित । मग आनंदे पुढे चालत । अवलोकित कौतुके ॥४०॥

तव ऐकिला मंत्रघोष । तेणे पावले परम संतोष । म्हणे येथे परमपुरुष । ऋषिविशेष राहती की ॥४१॥

ऐसा चालता नृपोत्तम । तव देखे दिव्याश्रम । विश्वामित्रमुनी तपःकाम । पाहुनी आराम पावला ॥४२॥

चारुहासिनीसमवेत । पदी घाली दंडवत । ऋषि त्याचा धरून हात । मग उठवीत साक्षेपे ॥४३॥

ऋषि म्हणे होईल सुत । वर्तमान सांगे का त्वरित । ऐकोनि जाहला आनंदभरित । नरनाथ तेधवा ॥४४॥

राजा म्हणे ऋषिसत्तम । कौंडिण्यनगरींचा नृपती भीम । चारुहासिनी हिचे नाम । दर्शनकाम पातलो ॥४५॥

देव आराधिले केले नवस । तपे केले अति सायास । परी पुरली नाही आस । तेणे जीवास उबगलो ॥४६॥

आता पावलो भवच्चरण । मनोरथ जाहले तेणे पूर्ण । परी संतती न होण्याचे कारण । कृपा करून शोधावे ॥४७॥

तू त्रिकाळज्ञानी तपोधन । कोणासि पुसावे तुजवाचोन । ऐकून त्याचे करुणावचन । सुहास्यवदन बोले ऋषी ॥४८॥

तुझी कुलदेवता परम । एकदंत जो देवोत्तम । त्यासि सांडोनि व्यर्थ श्रम । नृपोत्तम तुवा केला ॥४९॥

वेदशास्त्रपुराणलौकिकात । जो प्रतिष्ठित एकदंत । जो निजभक्तांसी अर्पित । जे का इच्छित सर्वदा ॥५०॥

मदांधबुद्धि तू दुर्मती । उपेक्षिला तुवा गणपती । तेणे रुष्टला मंगलमूर्ती । म्हणोनि संतती नाही तूते ॥५१॥

ऐक तुझे पूर्वजांची कथा । तुजपासोनि अष्टम पूर्वज होता । भीमराजा जाण तत्वता । कमलाकांता तयासी ॥५२॥

बहुतकाळी तिचे उदरी । जन्म पावला पुत्र दुराचारी । मुका अंध क्षतधारी । पूय शरीरी गळे त्याच्या ॥५३॥

उपजताच सूतिकागारी । दुर्गंधी व्यापिली भारी । माता पाहून रुदन करी । कपाळ करी पिटोनिया ॥५४॥

आक्रोशे कमला विलाप करी । म्हणे दुःख पावले संसारी । कैसी मी ही दुराचारी । लोकांभीतरी निंद्य येणे ॥५५॥

जन्मांतरीचा पापठेवा । मज प्राप्त जाहला येधवा । मज मरण का नये आता देवा । उभय नावा बुडविले ॥५६॥

आता जनाभीतरी । मुख कैसे दाऊ तरी । आक्रोध ऐकोनिया भारी । नगरनारी धाविन्नल्या ॥५७॥

शोक ऐकोनिया कानी । भूपती आला धावोनी । सूतिकागृही प्रवेशोनी । पुत्र नयनी पाहिला ॥५८॥

राजा म्हणे वो सुंदरी । व्यर्थ आता शोक न करी । जन्मांतर पाप निर्धारी । भोगिता तरी दुःख वाटे ॥५९॥

उपाय करीन बहु तयासी । आरोग्य करीन बालकासी । शोक न करी वो मानसी । आता बाळाशी न्हाणी का ॥६०॥

ऐसी ऐकोनि त्याची वाणी । आनंदे बाळक ते न्हाणी । संस्कारविधी ब्राह्मणी । सांगता संस्कारिले तया ॥६१॥

दक्ष असे नाम ठेविले । द्वादशवर्ष प्रतिपाळिले । राये बहु उपाय केले । तपे शोषिले शरीराते ॥६२॥

परी नोहे आरोग्यता । मग वल्लभे पाचारोनि वनिता । म्हणे नगराबाहेर आता । घेऊन सुता तुवा जावे ॥६३॥

पुत्रासमवेत कमला सुंदरी । राये दवडली पुराबाहेरी । कपाळ पिटोनि आक्रोश करी । पुत्र करी धरोनिया ॥६४॥

राजकांता सुकुमार । एकली प्रवेशली वनांतर । अंध गलितकुष्ठी तो कुमर । जन्मांतर भोगीतसे ॥६५॥

चालता कंटक वेधले चरणी । शोके मुर्छित पडे तरुणी । श्वापदे भयंकर महारण्यी । अंतःकरणी भय त्यांचे ॥६६॥

पृष्ठी वाहूनि अंधसुत । वनोपवने उल्लंघित । क्षुधातृषाक्रांत पीडित । होऊन रडत दीन स्वरे ॥६७॥

तिचा ऐकून दीर्घ स्वर । धांवोनि आले तस्कर । हिरोनि नेली भूषणे अंबर । दुःख थोर तेणे जाहले ॥६८॥

तैसीच पुत्रासमवेत ती कमला । चालता पुढे ग्राम लागला । शिवालयी ठेऊन पुत्राला । आपण भिक्षेला निघाली ॥६९॥

मागोनिया भिक्षान्न । केले पुत्रासह भोजन । तेथेच वस्ती करून । दुःखे दिन कंठी सदा ॥७०॥

पुत्रासमवेत एके दिनी । भिक्षेस गेली ती नितंबिनी । अपूर्व झाले तये क्षणी । अगाध करणी गणेशाची ॥७१॥

कोणी गाणपत्य ब्राह्मणोत्तम । त्याचा अंगवायू उत्तम । लागताच उद्धरिला अधम । दिव्य देह जाहला ॥७२॥

दिव्य जाहले कमलेक्षण । शरीर झाले सुलक्षण । क्षते मावळली न लागता क्षण । दुःखकारण हरपले ॥७३॥

एकाएकी दिव्य शरीर । लावण्य जैसा अपर मार । ऐसा अवलोकुनि कुमर । मनी सुंदरी संतोषली ॥७४॥

आलिंगूनिया तनुजासी । तेथेच थारा करून वस्तीसी । भिक्षा मागोनिया उदरासी । करी तृप्तीसी वेल्हाळा ॥७५॥

बाल सुंदर डोळस । पाहाता मोह उपजे जनास । वस्त्राभरणे देऊनि त्यास । नेती घरास कौतुके ॥७६॥

घृत शर्करा पायसान्ने । नित्य तयासि करवीती भोजने । कृपा करिती गजवदने । दुःखायतने मग कैची ॥७७॥

जन म्हणती रे बाळका । नाव काय तुझिया जनका । तुझी माता चंपककलिका । तुज माणिका प्रसवली ॥७८॥

ती तर पुरुषावाचून । येथे राहिली येऊन । सगुणगुणे रूपसंपन्न । दिसे प्रसन्न महासती ॥७९॥

ऐसी ऐकून जनाची गोष्टी । बालक होऊनिया कष्टी । मातेस म्हणे माझे पोटी । दुःखकोटी उभारिल्या ॥८०॥

जन पूसती माझे पित्यासी । काय सांगू आता त्यासी । लाजीरवाणे या वदनासी । केवी जनासी दाखवू ॥८१॥

म्हणोनि बाळ रुदन करी । ऐकोनि हासली ती सुंदरी । बाल घेऊन मांडीवरी । समाधान करी त्याचे ॥८२॥

कर्नाटकदेशी भानुनगरी । वल्लभनामा तेथे राज्य करी । त्याची पट्टमहिषी मी सुंदरी । मजवरी प्रीती त्याची ॥८३॥

त्यापासोन तुझे जनन । उपजताच आससी चक्षुहीन । गलितकुष्ठी कुब्ज गमन । पाहून मन खिन्न त्याचे ॥८४॥

द्वादशवर्षेपर्यंत । तेणे उपाय केले बहूत । तपे तापला अत्यंत । आरोग्य नोहे तुजलागी ॥८५॥

मग तुजसहीत मजकारणे । नगराबाहेरी घातले त्याणे । येथे येता संकटहरणे । केले दिव्य तनू तुजलागी ॥८६॥

पुण्यपुरुषाचे अंगवाते । पावलासि दिव्य देहाते । ऐकोनि ऐसिया वचनाते । हर्षे जनाते निवेदन करी ॥८७॥

जन्मांतर कर्मसंगती । तेणे लाधली गणेशभक्ती । अष्टाक्षरमंत्र विधानोक्ती । तप करी तो बहुसाल ॥८८॥

चरणांगुष्ठी उभे राहुनी । तत्पर सदा विनायकध्यानी । निरंतर वायु भक्षण करूनी । शरीर त्याणे सुकविले ॥८९॥

तपे कष्ट पावता भारी । कृपेने द्रवला भक्तकैवारी । परशांकुश धरूनि करी । प्रगट करी निजरूप ॥९०॥

चतुर्भुज महाकाय । कंठी विराजे पीतकौशय । नूपुरे मंडित ज्याचे पाय । अनेक सूर्यसम तेजे ॥९१॥

रत्‍नजडित भूषणे दंडी । जो निजभक्तांचे सांकडे खंडी । महासर्पे जठर मंडी । मस्तकी मुगुट रवितेजे ॥९२॥

ऐसा महाराज गजवदन । पाहता झाकोळले त्याचे नयन । मग तो द्विजरूप धरून । प्रसन्नवदन उभा असे ॥९३॥

दक्षे पाहूनि मूर्ती गोमटी । त्याचे पदी घालोनि मिठी । लोळतस चरण संपुटी । प्राण कंठी सद्गद ॥९४॥

दक्ष म्हणे महामती । द्विजनायक मंगळमूर्ती । पूर्वील जन्मसुकृतगती । फलप्रातीशी पावली ॥९५॥

तेणे झाले भवद्दर्शन । सकल निधानाचे तू निधान । तूते करिती सकळ वंदन । भवसूदन तूच पै ॥९६॥

तूचि सकळ कारणाचे कारण । लघुस्थूल तू गजकर्ण । तू सकलांचा संकटहरण । जगत्प्राण तूचि पै ॥९७॥

तूचि शंकर कमलासन । तूचि जगी जनार्दन । चराचरगुरू गोप्ताज्ञान । ध्याताध्यान तूचि पै ॥९८॥

तूचि सांख्ययोगशास्त्रश्रुती । तूचि क्षमादयाशांती । अहंकारक्षमदमधृती । कामशांती तूचि पै ॥९९॥

ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र । नभसूर्य तू ताराचंद्र । गणगंधर्वयक्षइंद्र । भद्राभद्र सर्व तूची ॥१००॥

औषधीलतावृक्षकंद । यंत्रतंत्रमंत्रछंद । सकल आनंदाचा आनंद । भूदेववृंद तूचि पै ॥१॥

यच्चकिंचिज्जगत्सर्व । लिंगत्रय त्रिगुणदोषभाव । सर्वव्यापक तूचि देव । न कळे माव वेदांसी ॥२॥

स्तुत्यानुवाद ऐकता यापरी । मग बोले निजभक्तकैवारी । मी तुष्टलो तुजवरी । मनोरथ तरी पुरवावे ॥३॥

मुद्गलनामे भक्त माझा । तो पुरवील मनोरथवोजा । ज्याचिये अंगवाते देह तुझा । आरोग्य जाहला जाणपा ॥४॥

त्यासि जावे तुवा शरण । ऐसे बोलोनिया गजकर्ण । अंतर्धान जाहला न लगता क्षण । गजवदन ते काळी ॥५॥

अंतर्धान पावता एकदंत । दक्ष शोके पडिला मूर्छित । सावध होऊनि शोक करीत । कपाळ पिटीत निजकरे ॥६॥

द्वादशवर्षे करिता यज्ञ । कृपणा हाती लागले धन । ते जैसे नेता हिरोन । दुःखास उणे काय त्याचे ॥७॥

चिंतातुराचे भाग्ये करूनी । हातास लागला चिंतामणि । अकस्मात पडला समुद्रजीवनी । दुःख मनी अगाध त्याचे ॥८॥

तैसा अतिदुःखीत चित्ते । हाका मारी विनायकाते । कोठे जासी टाकोनि माते । अनाथाते दयानिधे ॥९॥

विनायका रे विनायका । म्हणोनि मारी दीर्घ हाका । ह्र्दय पिटोनि करी शोका । भक्त निका गणेशाचा ॥११०॥

आडवाटे घेतसे धाव । मुखे उच्चारी विनायक नाव । काय नाही माझा भाव । म्हणोनि देव उपेक्षितो ॥११॥

द्रुमपाषाणपर्वताते । म्हणे दावा विनायकाते । मृगशार्दूलहर्यक्षाते । निर्भयचित्ते पुसतसे ॥१२॥

मार्गी जाता ब्राह्मणासी । नमन करोनि त्याचे चरणासी । म्हणे सांगा विनायकासी । दयाळासी लवलाहे ॥१३॥

आल्यागेल्या पुसे बालक । कोणी पाहिला काय विनायक । तव देखिला अलोलिक । मुद्गलाश्रम तेधवा ॥१४॥

योगाभ्यासबळे जाण । करी नानाकृती धारण । आराध्यमूर्ती गजकर्ण । गजानन अग्री सदा ॥१५॥

सालंकार दिव्यमूर्ती । पूजा करी अहोराती । अखंड ध्यान वसवी चित्ती । स्वरूपी स्थिती नित्य ज्याची ॥१६॥

ऐसा पाहोनि मुद्गलमुनी । बाल धावे आनंदोनी । दिर्घश्वास टाकोनी । चरण दोन्ही धरी त्याचे ॥१७॥

घालोनिया चरणी मिठी । बाल रडे सद्गदकंठी । त्याते पाहोनि कृपादृष्टी । पुसे वृत्तांत मग तया ॥१८॥

रडे स्फुंदोनि दुःखजाळी । बालक धावे तयाजवळी । रोगवेदना जन्मकाळी । संपूर्ण त्या निवेदित ॥१९॥

ऐसा मी पापाचा पर्वत । हिंडत आलो या नगरात । पावोनि तवांगवात । दिव्यदेही जाहलो ॥१२०॥

येऊनिया दिव्य नेत्र । कमनीय जाहली सर्व गात्र । शब्दश्रावी दोन्ही श्रोत्र । जाहलो पवित्र तव कृपे ॥२१॥

हे अखिल वर्तमान । ऐकिले मातृमुखेकरून । मग धरिला म्या अभिमान । आवरोनि मन ते काळी ॥२२॥

जेणे ऐसी कृपा केली । ती मूर्ती पाहिजे अवलोकिली । मग ती तपे वाळविली । तनू आपली गुरुराया ॥२३॥

ऐसेच मातेने तप केले । तेणे विनायका साकडे जाहले । मग दर्शन देऊनिया बोले । आश्वासिले दीनानाथे ॥२४॥

चतुर्भुज मूर्ती गोमटी । मुक्तमाळा रुळती कंठी । भुजंगे वेष्टित ज्याची कटी । मूषकपृष्ठी बैसलासे ॥२५॥

रत्‍नजडीत मुगुटकुंडले । ते ध्यान अत्यंत शोभले । परशांकुश हाती धरिले । दोंद शोभले विशाल ज्याचे ॥२६॥

हस्ती शूंडाग्री मोदकचय । सुरगण वंदिती ज्याचे पाय । ऐसा तो महाकाय । एकाएकी अवलोकिला ॥२७॥

चंद्रदर्शने सरितापती । आनंद पावे जैसा चित्ती । तैसा अवलोकिता भक्तपती । हर्ष पावलो अपुर्व पै ॥२८॥

त्याचे धरून पदारविंद । यथानुमती स्तुत्यानुवाद । करिता संतोषला । आनंदकंद । अभयप्रद भक्तांचा ॥२९॥

मज बोलिला करुणानिधी । आता टाकी ह्रदय आधी । तुझी जाहली कार्यसिद्धी । सत्वबुद्धी बालका ॥१३०॥

ऐसे बोलोनि गणराज । मग जाहला तो द्विज । तोच तू महाराज । मोक्षबीज करुणाब्धी ॥३१॥

ऐसे देऊनिया दर्शन । अदृश्य जाहला गजानन । तेणे दुःखे आकळून । मूर्छित पडिलो धरणीतळी ॥३२॥

संज्ञा पावोनि ये काळी । मग पावलो तुझे जवळी । तेणे पावलो ह्रदयकमळी । आनंद आता बहुसाल ॥३३॥

तो गजानन तो तू मुद्गल । हेच माझे मनी ठसेल । आता न सोडी मी पाउल । दीनदयाळ गुरुराया ॥३४॥

मग मुद्गल तयासि म्हणे । आता तूते नाही उणे । दर्शन देऊन गजकर्णे । फेडिले पारणे नयनाचे ॥३५॥

धन्य जगी तूचि एक । तुज दृश्य जाहला विनायक । तुझे महिमान सहस्त्रमुख । वर्णिता भागेल निर्धारी ॥३६॥

ज्याचिया एक दर्शनासाठी । आचरलो मी तपाच्या कोटी । शतवर्षे पावलो हिंपुटी । परी दृष्टीस साफल्य नसे ॥३७॥

जे सकळांचे आदिकारण । ज्यासि नाही मायावर्ण । तो हा मंगलमूर्ती गजकर्ण । संकटहरण जगाचा ॥३८॥

ज्याची गुणकीर्ती वर्णिता । वेदा पावली गा धन्यता । त्याचे दर्शनेकरूनि आता । कृतकृत्यता पावलासी ॥३९॥

आम्ही वंदावे तुझे चरण । ऐसा त्याचा गौरव करून । मग दीधले आलिंगन । प्रमोदे मन निमग्न त्याचे ॥१४०॥

मग दक्षकाचे सव्य कानी । एकाक्षरमंत्र सांगे मुनी । अनुष्ठानविधिविधानी । केला ज्ञानी तेधवा ॥४१॥

मुद्गल म्हणे दक्षालागी । मंत्र न टाकी कवणे प्रसंगी । जरी टाकशील तरी जगी । नाश वेगी पावशील ॥४२॥

मंत्रे करिता आराधन । तुझे करितील देव वंदन । धनधान्यलक्ष्मी भोगुन । अंती पावन होसील पै ॥४३॥

इहलोकी सकल भोग । भोगून पावसी अपवर्ग । तूते तुष्टेल सिद्धिबुद्धिसंग । सुंदरांग गणपती ॥४४॥

जयजयाजी मंगलमूर्ती । पुढे बोलवी आपली कीर्ती । तेणे खंडेल अज्ञानगती । स्वरूपस्थिती पावेन मी ॥४५॥

त्वत्प्रसादे हेचि सार्थक । मुखे वदावे कथाकौतुक । मनी चिंतावे स्वरूपसुख । अक्षयपद पावणे ॥४६॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरीत । षष्ठोध्याय गोड हा ॥१४७॥ अध्याय ॥६॥ ओव्या ॥१४७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP