मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय १६

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय १६

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जय श्रीकल्याणमूर्ती । भक्ताभीष्टदा गणपती । तुझी न कळे अनंतकीर्ती । वेदांसही जगद्वंद्या ॥१॥

श्रोते परिसा कथानुसंधान । कश्यपात्मज गजवदन । देवांतकनरांतकाते वधून । जाता जाहला निजलोकी ॥२॥

पुढे धात्यास म्हणे व्यास । सांगे आणखी गणेशकथेस । विधाता म्हणे जगन्निवास । शिवगृही अवतरला ॥३॥

सिंधुनामा दैत्यमाजला । यदर्थ मयूरेश अवतार जाहला । ती कथा सविस्तर तुजला । सांगतो की यथामती ॥४॥

मिधिल देशींचा भूपती । चक्रपाणीनामे चक्रवर्ती । शांतदांतपुण्यकीर्ती । तेणे जगती वश केली ॥५॥

लावण्ये जैसा अपरमदन । त्याचे चमूस गणील कोण । साक्षात कमला येऊन । स्थिर राहिली ज्याचे गृही ॥६॥

सांब आणि सुबोधन । ज्याचे चतुर दोन प्रधान । ते जीविताशा सोडुन । स्वामिकार्यी रत सदा ॥७॥

त्याची रम्य विलासिनी । नामे जाणे चारुहासिनी । महापतिव्रता ती मानिनी । पतीस मनी प्रिय सदा ॥८॥

तिचे सवे तो भूपती । क्रीडता गेले दिवस किती । प्रतिवर्षी होय संतती । परी मरती उपजता ॥९॥

तेणे दुःखे नरनायक । उबगला संसारी देख । न वाटे राज्यकौतुक । सदा दुःख वाटतसे ॥१०॥

राजा पाचारोनिया प्रकृती । दुःख सांगे तयांप्रती । म्हणे नाही माते संतती । सदा चित्ती दुःख तेणे ॥११॥

तुम्ही सांभाळा राज्यभार । मी वना जातो साचार । जरी पावेन दिव्यकुमर । तरी पुन्हा येईन मी ॥१२॥

ऐसी ऐकून राजवाणी । दुःख करिजे प्रजाजनी । तव तेथे शौनकमुनी । दैवयोगे पातला ॥१३॥

तयास पाहूनिया भूपती । नमने पूजने तयांप्रती । तोषऊनिया तयास चित्ती । दुःख निवेदी आपले ॥१४॥

त्रिकालज्ञानी तो मुनिवर । आश्वासोनि म्हणे कुमर । तुज होईल गा साचार । धरी धीर दिवस काही ॥१५॥

भानुसप्तमी पासोन व्रत । करी मासावधीपर्यंत । तेणे तू पावशील सुत । अपरिमित पराक्रमे ॥१६॥

सांगोनिया व्रतविधान । ऋषि गेला मग तेथुन । राजा भानु सप्तमी पाहुन । व्रतविधान आरंभिले ॥१७॥

चारुहासिनी समवेत । ब्रह्मचर्य पाळोनि व्रत । सुवर्ण कलशी तेव्हा स्थापित । रविबिंब विधाने ॥१८॥

लक्षसंख्या नमस्कार । घाली तयास नरवीर । तितक्या धेनू सवत्स सत्वर । प्रतिविप्रांसि देतसे ॥१९॥

लक्षानुलक्ष द्विजभोजन । वस्त्रालंकार दे तयालागुन । तेणे तुष्टला तेव्हा ब्रध्न । झाला प्रसन्न तयावरी ॥२०॥

चारुहासिनी निद्रिस्थ असता । तिचे पतिरूपे तो सविता । तिणे पाहोनिया तत्वता । रति मागे तयासि सती ॥२१॥

ऋतूमती चारुहासिनी । म्हणे स्वप्नी तयास कामिनी । रति द्यावी मजलागुनी । येच क्षणी प्राणेशा ॥२२॥

जरी तू न देशी आता रती । तरी प्राण देहत्याग करिती । ऐसी स्मरविव्हल ती सती । भोगिती जाहली तयाते ॥२३॥

प्रातःकाळी होऊनि जागृत । पतीसि तेव्हा हर्षे बोलत । निद्रेमाजी प्राणनाथ । तुवा भोगिले मजलागी ॥२४॥

तुम्ही असता हो व्रतस्थ । हे कैसे केले विपरीत । ऐकोन राजा हास्य करित । म्हणे विपरीत बोलसी तू ॥२५॥

मी उपोशणे जाहलो कृश । मन्मथासि न शिवे मानस । तुष्टला असेल तो दिनेश । त्याचे कृत्य असेल हे ॥२६॥

आता होईल तुजला सुत । मासवधि पर्यंत । सांग केले तेणे व्रत । मग करित उद्यापन ॥२७॥

गर्भिणी जाहली राजकामिनी । तेज तिचे न लक्षवे नयनी । आनंद वाटे तीते मनी । म्हणे जनी धन्य मी ॥२८॥

परि सतेज ते रविवीर्य । तेणे दाहे तिचा काय । शीतळ केले बहुत उपाय । परी दाह शमेना ॥२९॥

सख्यांसहित चारुहासिनी । समुद्रतीरी जेव्हा जाउनी । गर्भ टाकी समुद्र जीवनी । मग परतोनि जाय घरा ॥३०॥

गर्भ वाढे सिंधु जीवनी । सांग होता शोषी पाणी । बाळभावे तेव्हा गर्जुनी । कापवी मेदिनी थरथरा ॥३१॥

उदधी भये कापे चळचळ । म्हणे हा विक्राळ बाळ । मग विप्रवेषे तत्काळ । आणिता जाहला भूपतीसी ॥३२॥

रायास म्हणे सरित्पती । गर्भ टाकोनि गेली तुझी युवती । तो मी हा देतसे तुजप्रती । अति प्रीती पाळा तुम्ही ॥३३॥

ऐसी ऐकोन त्याची वाणी । धावोन आली राजराणी । बाळ घेवोनिया तेक्षणी । स्तनपान करवितसे ॥३४॥

रायासि जाहला परमानंद । तेणे उत्साह केला विशद । सुखी केले याचकवृंद । धनमाने करोनिया ॥३५॥

जातकर्मादि संस्कार । करिता जाहला नरवीर । बाळ वाढे जैसा रोहिणीवर । शुक्लपक्षी प्रतिदिनी ॥३६॥

चौदा विद्या चौसष्टकळा । राये शिकविल्या निजबाळा । घेऊनिया बाळांचा मेळा । सिंधू खेळे निजछंदे ॥३७॥

खेळता बाळका माझारी । द्रुमपर्वत चूर्ण करी । हे पाहता मातापितरी । परमाल्हाद मनिजे ॥३८॥

पवनसंगे अग्निप्रबळ । तैसा जाहला विशाळबाळ । तपालागी निघे तत्काळ । एकांतवनी प्रवेशला ॥३९॥

वामपायी उभा राहून । सव्य हस्त ह्रदयी घेऊन । मने मन आकळुन । आराधना करीतसे ॥४०॥

शरीरी वाढली वारुळे । दोन सहस्त्र वर्षे तप केले । तेणे आराध्य दैवत कळवळले । उतावळे धावतसे ॥४१॥

सविता होऊन सुप्रसन्न । माग म्हणे वरदान । ऐसे ऐकोन रविवचन । समाधान पावला ॥४२॥

सिंधू बोले सद्गदवाणी । प्रसन्न जाहलासि जरी तरणी । तरी मज न जिंको कोणी । सदा रणी विजय असो ॥४३॥

प्राणिमात्रापासोनि भय । अमरापासोनि अपाय । कदा नसो देवराय । येव्हडी सोय लावी माझी ॥४४॥

रवि म्हणे राजकुमरा । तुजला दिधले सर्व वरा । त्रैलोक्यींचे राजभारा । चालविसी निजबळे ॥४५॥

परी एक सांगतो ऐक । जो अनंत ब्रह्मांडनायक । तो अवतरता देख । तुज वधील निश्चये ॥४६॥

ऐसी बोलोनि वरदवाणी । अंतर्धान पावला तरणी । तेथून सिंधू ते क्षणी । येता जाहला निजगृही ॥४७॥

करुनि माताजनकासि नमन । सकळ सांगे वर्तमान । ऐकता दोघे आनंदघन । होवोनि नंदन आलिंगिती ॥४८॥

पुत्र पाहूनिया प्रबुद्ध । राज्यभारे केला बद्ध । राजा इच्छूनि नाक शुद्ध । तपोवन पावला ॥४९॥

चारुहासिनी समवेत । स्वर्गी पावला तो महंत । राज्य करिता जाहला सुत । चक्रपाणीचा तेधवा ॥५०॥

तेणे करूनिया द्ग्विजय । मेळविले दैत्यराय । ते वंदिती त्याचे पाय । म्हणती सोय पावलो आम्ही ॥५१॥

प्रचंड आणि कालशुंभ । वृत्रासुर कंद निशुंभ । कदंबासुर शबर तो सुलभ । कमलासुर पराक्रमी ॥५२॥

तयामाजी कमलासुर । त्याचा करोनि जयजयकार । म्हणे तू मोठा बलाढ्यवीर । त्रिपुरामागे जाहलासी ॥५३॥

करी आमचे आता पाळण । तुझी करू आज्ञावंदन । सर्व दैत्य मेळवोन । स्वर्गभुवन वेढिले ॥५४॥

इंद्रास सांगती दूत येऊन । काय बैडलासि आनंदघन । सिंधुनामा दैत्य येऊन । करितो कंदन स्वर्गाचे ॥५५॥

कोपे खवळला ऐकोन मघवा । ऐरावतारूढ होवोनि तेधवा । पाचारोनि सकल देवा । संग्रामासि सरसावला ॥५६॥

देवदैत्यसेना एकवटली । रणवाद्ये वाजू लागली । घोरांदर युद्धधुमाळी । तेव्हा जाहली निकराने ॥५७॥

विजय पावले तेव्हा असुर । पलायन करिते जाहले सुर । इंद्रासनी सिंधुवीर । बैसता जाहला कौतुके ॥५८॥

संपूर्ण देवांचे अधिकारपद । तेथे स्थापिले दैत्यवृंद । इंद्र पावोनिया खेद । वैकुंठासि पावला ॥५९॥

धरा इंदिरासमवेत । तेथे देखोनि अनंत । करोनिया दंडवत । बोले स्फुंदत तयासी ॥६०॥

सिंधुनामा दैत्य प्रबळ । तेणे जिंकिले स्वर्गपाळ । आम्ही पावोन दुःख सकळ । पदकमळा पाहू आलो ॥६१॥

भक्तपालका ह्रषीकेशी । तू हे कैसे न जाणशी । तुजवीन कोणी आम्हाशी । रक्षणासि असेना ॥६२॥

ऐकोन तयाची वाणी । आश्चर्य करी चक्रपाणी । बैसोन गरुडावरी तत्क्षणी । स्वर्गभुवनी पातला ॥६३॥

गरुडाचे पक्षवाते । प्रळय भासला दनुजते । सर्व निघाले युद्धाते । त्याही अनंताते वेढिले ॥६४॥

यमवरुणकुबेर । आदित्यरुद्रअश्विनीकुमर । वायुगुरुपुरंदर । धरोनि धीर उठावले ॥६५॥

युद्ध जाहले अलक्षदृष्टी । हरिने मारिल्या असुरकोटी । दैत्य होवोनिया महाकष्टी । मृत्यु पावती स्वामिकार्यास्तव ॥६६॥

दैत्य पळ जेव्हा सुटला । सिंधु तेव्हा सरसावला । तेणे सकल देवाला । क्षणमात्रे जिंकिले ॥६७॥

पाहोनि त्याचे युद्धलाघव । सिंधुस म्हणे तेव्हा माधव । तुझे पाहून युद्धवैभव । प्रसन्न जाहलो वर माग ॥६८॥

सिंधु बोले सुहास्यवदन । प्रसन्न जाहलासि जगज्जीवन । तरी मागणे हेचि वरदान । ऐक मन लाऊनिया ॥६९॥

गंडकीनामे माझे नगर । तेथे वसावे निरंतर । संगे घेऊनि सकलसुर । सुखरूप असावे ॥७०॥

तथास्तु म्हणोनि मधुसूदन । इंदिरेसह इंदिराजीवन । संगे सकल देव घेऊन । जाऊन तेथे राहिला ॥७१॥

जगती जाहली निर्वैर । आनंद पावले तेव्हा असुर । हरीस म्हणे पुरंदर । काय केले तुवा हे ॥७२॥

घेऊनिया आम्हासी । कारागृही कैसा बसशी । विष्णू म्हणे इंद्राशी । याचे काळासि प्रतीक्षितो ॥७३॥

जेव्हा तयास पाठमोरा । काळ होईल पुरंदरा । तेव्हा निर्दाळीन रे असुरा । पदी सुरा स्थापीन मी ॥७४॥

ऐसे ऐकता हरीचे वचन । उगा राहिला पुलोमजाजीवन । दैत्ये मांडिले धर्मकंदन । करिती हनन धेनूचे ॥७५॥

स्वाहास्वधावषट्‌कार । बंद केले उर्वीवर । देव प्रतिमा फोडोनि सत्वर । साधुनर गांजियेले ॥७६॥

प्रतिमा सिंधू असुराची । पूजा करविती बळे त्याची । मते वाढली नास्तिकाची । भजने भक्तांची राहिली ॥७७॥

दुष्कृतांचा संजय जाहला । दिगंती धर्म पळोनि गेला । उलो पाहे तेव्हा इला । भार तिला न साहे ॥७८॥

एकवटोन सकळ सुर । करिते जाहले बहुत विचार । त्यामाजी गुरू विचारचतुर । बोले उत्तर देवांसी ॥७९॥

जो चराचर विश्वपती । अनंतनामा अनंतकीर्ती । प्रसन्न होता गणपते । तुम्हाप्रती सोडवील ॥८०॥

हे मानवले सकळ सुरांशी । साधुसाधु म्हणती तयाशी । माघकृष्ण अंगारकीशी । विनायकासि अर्चिती ॥८१॥

पाहोन त्यांची विनयभक्ती । प्रसन्न जाहला गणपती । सिंहारूढ आयुधे हाती । भाली मिरवे अर्धशशी ॥८२॥

कर्णी कुंडले तेजाळ । दोंद विलसे विशाळ । सुहास्य शोभे मुखकमळ । देव प्रेमळ पाहती तया ॥८३॥

पदी घालोनिया त्याचे मिठी । म्हणती रक्ष आता जगजेठी । तू उपेक्षिलिया पाठी । आम्हासि कोण सांग दुजे ॥८४॥

देव पाहूनि दीनवदन । अभय देत गजानन । शिवमंदिरी मी अवतरोन । पदी स्थापिन तुम्हाते ॥८५॥

ऐसी वदोन वरदवाणी । गुप्त जाहला अंकुशपाणी । देव तेव्हा आनंदोनी । नाम वदनी स्मरती त्याचे ॥८६॥

कश्यपादी ऋषींचे चय । दंडकारण्यी वसती निर्भय । तेथे पातला भस्मकाय । शंकर तेव्हा आनंदे ॥८७॥

पाहोनिया ऋषिगण । धावोनि वंदिती त्याचे चरण । तयास म्हणे भस्मधारण । बरेपण या स्थानी दिसे ॥८८॥

येथे द्यावी आम्हासि जागा । ते म्हणती भवभयभंगा । सर्वास ठाव तू गौरीरंगा । तुजशी जागा कोण देईल ॥८९॥

तुझे ठाई ब्रह्मांडकोटी । किती वसती धूर्जटी । तुझे स्मरता नाम कंठी । त्याची तुटी जन्ममरणी ॥९०॥

गणगंगागौरीसहित । शंकर तेथे येऊन राहत । सदा धरोनि ध्यानी चित्त । तप करीत सायासे ॥९१॥

गौरी म्हणे गा मोक्षदानी । सदा गुंतलेत तुम्ही ध्यानी । हे आश्चर्य मजलागुनी । नित्य मनी वाटतसे ॥९२॥

तूच सर्वांची ध्येयमूर्ती । सर्व जगता निखिलगती । तूते अहोरात्र ध्याती । विधी श्रीपती देव सदा ॥९३॥

शंकर तीते अंकी घेऊन । देता जाहला आलिंगन । म्हणे प्रिये मी सुप्रसन्न । तुझ्या बोले जाहलो ॥९४॥

जो त्रिगुणमय गुणेश । भक्त म्हणती ज्यास गणेश । जो अनंत ब्रह्मांडाचा ईश । वेदा पार न कळे कदा ॥९५॥

ज्याने मायेने विश्व जाहले । उदकावरी जेणे धरिले । पुन्हा कितीक वेळा गेले । तेथे मुरले गुणमय ॥९६॥

त्यासि ध्यातो प्रिये सदा । ऐकोन गौरी पावली प्रमिदा । धरोनिया शिवपदा । म्हणे मज करी प्रत्यक्ष तो ॥९७॥

शिव म्हणे वो चारुहासिनी । कैसे कळेल तपावाचुनी । येरू म्हणे मजलागुनी । तपाविधानी प्रबुद्ध करा ॥९८॥

पाहोनि तिचा भक्तिभाव । एकाक्षर हा मंत्रराव । तिचे कर्णी उपदेशी शिव । म्हणे आता जप करी ॥९९॥

करिता द्वादश वर्षे तप । प्रसन्न होऊनि गणाधिप । तुज देईल साक्षेप । गणेश तो दयाळू ॥१००॥

मग ती एकांत वनी । जाऊनि बैसली भवानी । गणेशध्यानी चित्त लाउनी । सदा मनी जप करी ॥१॥

द्वादशवर्षे अनशन । शरीर काष्ठवत गेले होऊन । गणेशी निश्चल मन लाऊन । जप करी सर्वदा ॥२॥

पाहूनि तिची तपस्थिती । ह्रदयी कळवळला भक्तपती । येवोनिया त्रिगुणमयी मूर्ती । पुढे उभा राहिला ॥३॥

मध्ये मुख विलसे विष्णूचे । दक्षिणभागी शंकराचे । वामभागी कमळासनाचे । शोभती साचे गुणत्रय ॥४॥

त्रिगुणमय गणेशमूर्ती । अंगी कोटी रविदीप्ती । षड्‌भुज तो पुण्यकीर्ती । एकाएकी प्रगटला ॥५॥

पाहून त्याची सोज्जवळमूर्ती । चित्ती घाबरली पार्वती । हे पाहोनि मंगलमूर्ती । सर्व मंगलेसी बोलत ॥६॥

तुझे तप पाहोनि शिवे । माझे ह्रदयी सुख पावे । जे मागणे ते जीवेभावे । माग आता मजपासी ॥७॥

गौरी म्हणे गा त्रिगुणेशा । माझी पुरवी हीच आशा । पुत्रभावे जगदीशा । दाहीदिशा कीर्तीभरी ॥८॥

हेच मागणे जीवेभावे । ते तुवा आता पुरवावे । तथास्तु म्हणिजे देवे । आनंदमय होवोनिया ॥९॥

अंबा म्हणे तू पुराणपुरुष । परी माझा भाव हाचि विशेष । पुत्रस्नेहे भक्ति अशेष । घडेल माते स्वामिया ॥११०॥

तथास्तु म्हणोनि त्रिगणेशमूर्ती । अंतर्धानाची धरिता गती । गौरी आनंदमय चित्ती । त्रिगुणेशमूर्ती स्थापितसे ॥११॥

मग येऊनि पतिचरण । प्रेमे धरोनि वर्तमान । सांगता आल्हादले मन । शंकराचे तेधवा ॥१२॥

प्रेमे देऊनि आलिंगन । अंकी तीते बैसऊन । शिव जाहला आनंदघन । म्हणे भगवान तुज पावला ॥१३॥

शिवा म्हणे शंकरालागी । तुमचे वसते मी अर्धांगी । निज प्रत्यक्षता मजलागी । कृपा करोनि दिल्ही तुवा ॥१४॥

श्रोते पुढे करा श्रवण । पार्वतीगृही गजकर्ण । वरद चतुर्थीस अवतरोन । सिंधुर दैत्यास वधील हो ॥१५॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । षोडशोध्याय गोड हा ॥१६॥

अध्याय १६ ॥ ओव्या ११६ ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP