मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय ३२

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय ३२

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

श्रोते परिसा सावधान । पूर्वाध्यायीं सिंदूरमर्दन ।

करुनियां गजानन । राजा वरेण्य मुक्त करी ॥१॥

ऐसें ऐकतां व्यासमुनी । पुसे कमलासनालागुनी ।

संशय येतो माझे मनीं । ऐक कानीं अब्जासना ॥२॥

गजासुराचें मुख तयाशी । ऐसें कोठें तूंच सांगशी ।

येथें सुत पार्वतीशी । जाहला म्हणशीं गजमुख ॥३॥

ऐसें ऐकतां व्यासवचन । धाता सांगे हास्य करुन ।

ऐक आतां चित्त लावून । यांतील वर्म सांगतों जें ॥४॥

कोठें शंभूवत्क्रापासुन । कश्चित् शंकरक्रोधाहून ।

जाहला म्हणती भक्त पावन । तेंही कथन सत्य असे ॥५॥

कोठें गौरी मलोद्भव । अवतरला देवाधिदेव ।

क्वचिदंबा तेजोद्भव । गणेशराव प्रगटला ॥६॥

कोठें द्विमुख षडानन । क्वचित्पंचमुख भगवान ।

चतुर्भुज षड्‌भुजजाण । दशबाहू कोठेंही ॥७॥

क्वचित् विधीहरिहर चिन्हें । अवतार दाविले गजाननें ।

हेंही ऐकिलें तूं कानें । सत्य मानणें सकल तुवां ॥८॥

कोठें विधिपासोन विश्व जाहलें । कोठें नारायणापासोन कथिलें ।

क्वचित् शक्तीपासोन उद्भवलें । सूर्यें केलें कोठें असे ॥९॥

कोठें सृष्टरुद्रसंभव । कोठें गणेशापासोन उद्भव ।

हें आहे सत्य सर्व । तूंही सदैव मानी ऐसें ॥१०॥

एकच आहे आदिपुरुष । त्याणें घेतले पांच वेष ।

जैसीं नट सोगें दावी विशेष । वस्त्रालंकार पालटोनी ॥११॥

पंचायतनामाजीं भेद मानी । तो भोगी नरकालागुनी ।

यास्तव तुवां संशय त्यजुनी । प्रमोद मनीं वागवावा ॥१२॥

कृतयुगीं कश्यपात्मज । विनायक जाहला गणराज ।

त्रेतीं आणि द्वापारीं विश्वबीज । पार्वत्यात्मज जाहला ॥१३॥

कलियुगीं गजकर्ण । होऊनियां धूम्रवर्ण ।

करील भूभार हरण । जगत्कारण परमात्मा ॥१४॥

ऐसें ऐकतां व्यासमुनी । प्रश्न करी विधिलागुनी ।

धूम्रवर्ण मोक्षदानी । काय म्हणूनि होईल ॥१५॥

विधि म्हणे ऐक आतां । कलियुगांतील जनवार्ता ।

लोक पावतील मलीनता । पुण्यदुष्काळ पडेल पैं ॥१६॥

वर्णामाजी उत्तमवर्ण । होतील रहिताचार ब्राह्मण ।

न करितील तपयज्ञदान । वेदाध्ययन कदांही ॥१७॥

सदां पापबुद्धीचे वाह । दुष्ट जातीचा परिग्रह ।

घेऊन घालवितील अह । परस्त्रीसह विलासी ॥१८॥

करितील पराची निंदा । स्वदोष न सांगतील कदां ।

भलताच करितील धंदा । वेदमर्यादा सोडोनियां ॥१९॥

आतां ऐके जनराहटी । सत्कर्मकरितां होतील कष्टी ।

लागतील कुकर्माच्या पाठीं । घालितील संकटीं सज्जनातें ॥२०॥

करितील जरीं देवतार्चन । तेथें बोलतील असत्य वचन ।

दांभिकें करितील स्नानदान । कर्ममलिन करितील सदां ॥२१॥

क्रिया सोडोन पदोपदीं । न पाहती स्वकर्म विधी ।

असत्याची परमावधी । करितील विधी भलताची ॥२२॥

वृद्धमर्यादा लौकिकाचार । याचा करुनि विचार ।

पदोपदीं बुद्धी चार । वागविती साचार प्रेमभरें ॥२३॥

मातापितरांसी करोनि द्रोह । प्रेमें वसवितील श्वसुरगृह ।

न करतील सद्विद्येचा संग्रह । पावतील मोह पदोपदीं ॥२४॥

दांभिकें करोनि होतील साधू । शिष्यांचीं गृहें भोंदतील भोंदू ।

पाहतां परांगना मुखविधू । ज्ञानसमंधू दावतील ॥२५॥

मूर्खाचा घेतील उपदेश । दुष्टाचा पाळतील आदेश ।

करतील निर्बळाचा नाश । घालितील पाश सत्कर्मरता ॥२६॥

करितील रे विश्वासघात । वाहती ते असत्यशपथ ।

तेणें पावतील दरिद्र बहुत । होती महंत घरोघरीं ॥२७॥

शूद्र पढतील वेदांस । विप्र होतील चांडाळदास ।

भक्षितील अभक्ष्यभक्ष मांस । मित्र समयास न पावे ॥२८॥

सोडोन गणेश हरादिदेव । भूतें प्रेतें पूजितील सर्व ।

पाहोन पराचें वैभव । धरितील हांव तद्धरणीं ॥२९॥

साधूची करितील निंदा । भोंदूचे सेवितील पाय सदां ।

सदाचारास चैन कदां । पडू नेदिती जन कोठें ॥३०॥

राजे होतील चांडाल । स्ववंशदत्तवृत्ति हरितील ।

न्यायअन्याय न पाहतील । भिडा ऐकतील वनितांच्या ॥३१॥

मदांधमूर्खपदाधिकारी । ते होतील प्रजापकारी ।

महापातकें घरोघरीं । त्यांची परी काय वर्णू ॥३२॥

लक्ष्मी वसेल हीन कुळीं । पर्जन्य न पडेल यथा काळीं ।

धान्यें न पिकतील महीतळीं । निरस औषधी होतील सदां ॥३३॥

रोग प्रबळ होतील । दुःखीच राहतील सकल ।

तीर्थमाहात्म्यें गुप्त होतील । सदां राहतील क्षेत्रयात्रा ॥३४॥

स्त्रिया त्यागोन स्वपतीशीं । स्वेच्छ रमतील भलत्याशीं ।

बाटवितील वर्णसंकराशीं । गर्भपातासि करतील रे ॥३५॥

साहवेसातवे वर्षीं प्रसूत । स्त्रिया होतील बा बहुत ।

आयुष्य षोडशवर्षां आंत । सरोन मृत जन होती ॥३६॥

म्लेंच्छ माजतील प्रबळ । ते जनांस भ्रष्टवितील ।

आचारसंपन्न पळतील । ते राहतील गिरिकंदिरीं ॥३७॥

लोप होवोनि सच्छास्त्राचा । आचार वाढेल नास्तिकाचा ।

करितील वध गोब्राह्मणाचा । धाक सुनाचा सासूप्रती ॥३८॥

स्वाहास्वधावषट्‌कार । राहतां उपोषित होतील सुर ।

ऐसा वर्ततां हाहाःकार । करील लंबोदर काय मग ॥३९॥

होवोनियां धूम्रवर्ण । नील तुरंगावर आरोहण ।

करुनियां खड्‌धारण । ग्लेंच्छ कंदन करील पैं ॥४०॥

आचारभ्रष्ट जाहले जन । त्या सर्वांचें करील हनन ।

विप्र सदाचारसंपन्न । आणोन स्थापील अवनीवरी ॥४१॥

त्याचा पाळोन शिक्षाविधी । लोक वर्ततील जगीं त्रिशुद्धी ।

कुकर्माचार समंधीं । नाहींच होतील अवनीवरी ॥४२॥

तेथून सत्ययुगाची प्रवृत्ती । होतां गुप्त होईल गणपती ।

चार अवतारांची ख्याती । यथा निगुती कथियेली ॥४३॥

ज्याचा वेदां न कळे पार । योगियां लागीं अगोचर ।

भाविकांसि असे गोचर । प्रयत्‍न इतर व्यर्थ तेथें ॥४४॥

ज्याची ऐकती कथा मधुर । वाटे अमृताहूनि अमृततर ।

सेवन करणार जे कां नर । भवसमुद्र पार पडतील ते ॥४५॥

ऐसें ऐकतां सत्यवतीसुत । विधीस घाली दंडवत ।

तूं माझी भ्रांति त्वरित । हरोन स्वस्थ केलें पैं ॥४६॥

ऐकता गणेशकथा सुधा । तृप्ती नसे कर्णासि कदां ।

हरपोनि गेली भ्रांतिबाधा । कथाविविध ऐकोनियां ॥४७॥

विधि म्हणे सत्यवतीसुता । निर्मल करी तपासि आतां ।

गणेश करील प्रसन्नता । तेणें धन्यता पावशील ॥४८॥

तथास्तु म्हणोनियां व्यास । नमस्कार करोनि विधीस ।

गेला तो तपोवनास । पुरश्चरणास करीतसे ॥४९॥

सांग होतां पुरश्चरण । प्रसन्न जाहला गजकर्ण ।

माग म्हणे वर दान । ऐकोन व्यास आनंदला ॥५०॥

दंडवत पडे भूमीवरी । संतोषला भक्त कैवारी ।

व्यास बोले जोडल्याकरीं । धन्य संसारीं मी जाहलों ॥५१॥

अखिल कारणाचें कारण । चिदानंद तूं गजकर्ण ।

मज द्यावया वरदान । आलासि धाऊन भक्तपती ॥५२॥

मज मागणें हेंचि आतां । तुझी असावी प्रसन्नता ।

मदमोहगर्वममता । माझे चित्ता नसो कदां ॥५३॥

भ्रांति जावोनियां त्वत्पादभक्ती । सदैव असावी माझे चित्तीं ।

जरीं प्रसन्न तूं गणपती । हृदयीं वस्ती करीं माझे ॥५४॥

ऐकतां बोले गजानन । आतां आहे तुजला प्रसन्न ।

तूं होशील सर्वपावन । ज्ञानवान सदोदित ॥५५॥

अगम्य वाटेल गुणकीर्ती । श्रीमेधाधृतीशांती ।

सदां सर्वदां तूंतें सेविती । आतां भ्रांती नुरे कदां ॥५६॥

अष्टादश पुराणाचा । वक्त होसी तूंच साचा ।

तुला पूर्वीं मत्स्मरणाचा । विसर पडला होता कीं ॥५७॥

तेणें पडली होती भ्रांती । सेवन करितां कथा निगुती ।

जाहलासि तूं गा सुमती । पावलासि ख्याती जगतातें ॥५८॥

ऐसें सांगोन गजानन । त्याचे हृदयीं जाहला लीन ।

व्यास दिसे देदिप्यमान । सहस्त्रकिरण अपर जैसा ॥५९॥

सिद्धक्षेत्रीं गणेशमूर्ती । व्यासें स्थापिली प्रसन्नचित्तीं ।

तिचें दर्शन जे घेती । ते तरती भवसागरीं ॥६०॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत ॥

क्रीडाखंड रसभरित ॥ द्वात्रिंशोध्याय गोड हा ॥अध्याय॥३२॥ओव्या॥६१॥

अध्याय बत्तिसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP