श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ।
श्रीगुरुभ्योनमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जयजयाजी गजानना । भवभयगजपंचानना । अज्ञानतिमिरनाशकब्रध्ना । मनोरंजना सुखाब्धे ॥१॥
जेणे तव स्मरण आदरले । तेणे संसारभय सदा जिंकिले । त्यासि तू दाऊनि निजपाउले । संकट हरिले तयाचे ॥२॥
श्रोते परिसा सावधान । कूमकंधरांचा वध करून । विजयी जाहला कश्यपनंदन । भवभंजन जगदात्मा ॥३॥
ऐकोनि कूपकंधराचे निधन । देवांतक नरांतक करिती रुदन । तव पुढे कर जोडून । असुरत्रय म्हणती तया ॥४॥
अंधक आणि अंभोधर । तिसरा तुंगनामे असुर । म्हणती तुझ्या वैरियांचा संहार । आम्ही करणार निश्चये ॥५॥
त्यांची ऐकोनि ऐसी वाणी । त्याते गौरविले वस्त्रभरणी । ते असुर निघाले तेथुनी । आले नगरी काशीपतीच्या ॥६॥
असुरमाया अतिदुर्धर । अंधके पाडिला अंधकार । दिवसा लोपविला दिनकर । निशा घोर दाटली हो ॥७॥
जन दीपिका प्रज्वाळुनी । कार्ये करिती कष्टे करुनी । जिवलग कंठी मिठी घालुनी । रमती कामिनी आनंदे ॥८॥
चोरांस वाटला अत्यंत तोष । कर्मठांचा हरपला हर्ष । म्हणती मांडला प्रळय विशेष । प्रकाश निःशेष हरपला ॥९॥
अंभोसुरे माया केली । पर्जन्यवृष्टी वर्षू लागली । तेणे पीडा अत्यंत घडली । जनालागी तेधवा ॥१०॥
गजशुंडावत मेघ प्रचंड । वायू सुटला अतिउदंड । वृक्ष उन्मळोनि अखंड । नगरावरी कोसळती ॥११॥
कडकडोनी पडती चपला । जनासि प्रळय वोढवला । माय न वोळखे पुत्राला । स्त्रिया पतीला नोळखती ॥१२॥
नगरी जाहला हाहाःकार । रुदन करिती नारीनर । आठवोनिया सर्वेश्वर । धावा करिती मरणभये ॥१३॥
ऐसा महोत्पात पाहून । कृपेने द्रवला भगवान । मग एक विस्तीर्ण वट उत्पन्न । करूनि द्विजरूप धरियेले ॥१४॥
वटावरी होवोनि पक्षी । असुरांची तेव्हा माया लक्षी । आपण बैसोनिया वृक्षी । पक्ष पसरी अत्यद्भूत ॥१५॥
पक्षवाते झडपोनिया । मेघ उडवी निरसी माया । प्रकाश पडला तेणे राया । सावधान पाहतसे ॥१६॥
तव वटारूढ पक्षी देखिला । राजा प्रजांसह वृक्षातळी आला । म्हणे हा भगवंते पाठविला । रक्षणाला आमुचे की ॥१७॥
स्वकीय माया नाश पावता । असुर धावले दोघे तत्वता । पर्वतप्राय शरीरता । जाहला पाहाता पक्षी त्याची ॥१८॥
तुंग होवोनि विस्तीर्ण पर्वत । सपक्ष नगरावरी झेपावत । हे पाहोनिया पक्षिनाथ । काय करिता जाहला ॥१९॥
अंधक आणि अंभोसुर । याते चरणी धरोनि सत्वर । चंचुपुटे पर्वत थोर । धरोनिया उडाला ॥२०॥
गगनी पक्षी घाली फेरे । तेणे दैत्य जाहले घाबरे । अंग करपले दिनकर करे । गेले पुरे प्राण त्यांचे ॥२१॥
प्रेते असुरांची पृथ्वीवरी । टाकिता जाहला भक्तकैवारी । तेणे वनोपवने चुर्ण सत्वरी । होती झाली तेधवा ॥२२॥
असुरांचा करोनि नाश । गुप्त जाहला तेव्हा जगदीश । पुन्हा धरोनि महोत्कट वेष । बालकांमाजी क्रीडतसे ॥२३॥
मृत्यु पावता ते असुर दुर्धर । पुष्पे वर्षती सुरवर । विनायकाचा स्तव अपार। करिते जाहले कौतुके ॥२४॥
राजा पावोनि परमानंद । पूजिता जाहला आनंदकंद । नाहीच जाहला कोठे जलद । जन प्रमोद पावले ॥२५॥
अंभोसुराचे उडाले मस्तक । ते त्याचे सदनी पडले देख । ते पाहोनिया परमदुःख । पितृजननी पावली ॥२६॥
पाहोनिया पुत्राचे शिर । राक्षसी करी शोक थोर । म्हणे जेणे सकळ सुरवर । क्षणमात्रे जिंकिले ॥२७॥
देवांतक आणि नरांतक । राज्यी स्थापिले जेणे देख । तो आजि कैसा मरणोन्मुख । जाहला कौतुक हेच जगी ॥२८॥
आठवोनिया त्याचे गुण । राक्षसी शोक करी दारुण । ह्रदयी हाणोनिया पाषाण । शोकार्णवी निचेष्टित पडे ॥२९॥
तिशी म्हणती सखीजन । व्यर्थ का करिसी रुदन । याचे उत्तरकार्य करून । करी सार्थक चतुरे गे ॥३०॥
त्यांची ऐकता ऐसी वाणी । उठोन बैसली राक्षसराणी । ते मस्तक तैलात टाकुनी । कपटाचारे राहाटली ॥३१॥
म्हणे याचा जेणे वध केला । त्याचा सुड पाहिजे घेतला । तुम्ही रक्षण करा या शिराला । अतिप्रयत्ने करोनिया ॥३२॥
तेथून राक्षसी निघाली । अदितीरूप तेव्हा नटली । काशीपतीचे नगरी आली । ती देखिली राजपत्नीने ॥३३॥
कपटवेषे जाहली रमणी । तीते अवलोकिता कामिक जनी । म्हणती ऐसी दुजी कामिनी । न देखो नयनी सृष्टिमध्ये ॥३४॥
तीते पाहोनि राजकांता । पुढे सामोरी धावली तत्वता । कर धरोनि ती कपटी वनिता । नेती जाहली अभ्यंतरी ॥३५॥
राजपत्नी म्हणे वो साजणी । महत्पुण्ये पाहिले तूते तरुणी । विनायकाचे प्रसंगी करुनी । माझे सदनी येणे तुझे ॥३६॥
धन्यधन्य तू देवमाता । काय वर्णावे तुझे सुता । विनायक जाहला रक्षिता । नानासंकटी आम्हाप्रती ॥३७॥
विनायक नव्हे सखे मानव । तुझे उदरी देवाधिदेव । पावोनिया पुत्रत्व भाव । सुतवैभव दावितो तूते ॥३८॥
येरी म्हणे वो राजकांते । आता आणोनि भेटवी त्याते । न साहवे त्याचे वियोगाते । म्हणोनि येथे पातले ॥३९॥
विनायकासि पाचारुनी । म्हणती वाट पाहे तुझी जननी । महोत्कट बालकांसह येउनी । पाहे नयनी कपटी माता ॥४०॥
विनायक येऊनि धावत । तिचे कंठी मिठी घालित । ह्रदयी तिणे आलिंगिला सुत । प्रेम अद्भुत न साहे तिशी ॥४१॥
अदिती म्हणे विनायका । निष्ठुर कैसा रे तू बालका । मजवाचोनिया राहिलासि निका । मज पारखा होवोनिया ॥४२॥
तुझे वियोगाची न साहे बाधा । म्हणोनि सोडोनि गृहधंदा । भेटू पातले रे आनंदकंदा । प्राणमर्यादा सोडोनिया ॥४३॥
प्रेमाश्रु सुटले नयनी । मग विषभरित लाडू त्यासि देउनी । वारंवार त्यासि आलिंगोनी । रगडू पाहे विनायका ॥४४॥
येरू तिशी देऊनि आलिंगन । चुरोन टाकी तिची मान । तेणे मूर्च्छा दाटली तिजलागुन । निद्रार्णवी पहुडली ॥४५॥
तल्पकावरी करी शयन । पुढे पहुडला कश्यपनंदन । तिणे वटारोनिया नयन । सोडिले प्राण तेधवा ॥४६॥
जन म्हणती रे बाळका । माता मृत्यु पावले विनायका । येरू हासोनिया देखा । ऊठता जाहला तिजपासुनि ॥४७॥
तव असंभाव्य पसरले प्रेत । राजा आला तेथे धावत । म्हणती चुकला मोठा अनर्थ । कपटार्थ न कळला इचा ॥४८॥
मग तिची खंडे करुनी । जन जाळिते जाहले नेउनी । पुष्पे वर्षती सुधापानी । विनायकावरी आनंदे ॥४९॥
मिळोनिया नागरिकजन । येऊनि विनविती रायालागुन । म्हणती आमचे घरी कश्यपनंदन । पूजार्थ पाठवोन देईजे ॥५०॥
तव तेथे पातले । सनकसनंदन वैष्णव भले । ते येता राये देखिले । मग धरिले चरण त्यांचे ॥५१॥
अर्चोनिया पूजोपचार । राजा विनवी जोडोनि कर । आजि केले पवित्र घर । पदरजे आपुलिया ॥५२॥
ते म्हणती गा नरनायक । तुझे घरी क्रीडतो विश्वव्यापक । ते पाहु आलो कौतुक । कश्यपतोक भेटवी आम्हा ॥५३॥
मग राये पाचारिले विनायकाशी । तो घेऊनि संगे बाळकाशी । भक्षित पातला मोदकोशी । माखिले अंगासि क्षीरोदन ॥५४॥
ऐसे पाहोनिया विपरित । ऋषि म्हणती हा ब्राह्मण सुत । अनाचारी राजान्न भक्षित । शुचिर्भूत असेना ॥५५॥
ऐसे ऐकता त्याचे वचन । विनायक बोले सुहास्य वदन । तुम्ही त्यागोनिया स्वर्गस्थान । काय म्हणोनि येथे आला ॥५६॥
तव पातले नागरिक जन । ते विनविती तयालागुन । तू येवोनिया आमचे सदन । हे भगवान पवित्र करी ॥५७॥
त्या नगरी एक ब्राह्मण । शुक्लवृत्तिने करी पोषण । तेणे पाचारोनि अंगनारत्न । आनंदोन सांगे तिशी ॥५८॥
ग्रामस्थ जनांचे घरोघरी । पूजार्थ येतो वीरजारी । तुवा राखावी तयारी । करीन पूजा मी त्याची ॥५९॥
वल्लभाची आज्ञा ऐकून । पतिव्रता बोले मधुर वचन । आपण दरिद्री साहित्यहीन । तया लागोन काय द्यावे ॥६०॥
षड्रस अन्ने घरोघरी । पूजा करिती राजोपचारी । तो येथे कैसा संतोषेल वीरजारी । आमचे घरी आजि पै ॥६१॥
ऋषि म्हणे वो मानिनी । हे वर्म तू न जाणसी मनी । विदुरा घरी कैवल्यदानी । प्रीती करोनि जेविला गे ॥६२॥
दुर्योधनपूजा राजोपचारे । त्यागोनिया सर्वेश्वरे । कण्या भक्षोनिया विदुरघरे । धन्य साचार केली तेणे ॥६३॥
देव एक भावाचा भुकेला । आणखी नावडे गे तयाला । निजभक्तांपासी सदा गुंतला । वश जाहला भाविकांशी ॥६४॥
जो एक चराचर व्यापक । तो हा जाणे विनायक । त्याचे पूजन सखे सार्थक । होय अलोलिक संसारी ॥६५॥
ऐसी उपदेशूनिया स्वकीय ललना । पाचारोनि आणिले कश्यपनंदना । देऊनिया तृणासना । पाद्याचमना समर्पिले ॥६६॥
भावचंदन सुमन माळा । तेणे घातल्या प्रभूचे गळा । धूपदीपन ये वेळा । अर्पिता जाहला प्रीतीने ॥६७॥
पुढे मांडोनिया पर्ण । द्रवीभूत कण्या अर्पण । करिता संतोषला भगवान । भाव पाहोनिया तयाचा ॥६८॥
घटघता कण्याप्राशन । प्रीतीने करोनिया भगवान । त्याचे करी संसारमोचन । कर्मबंधन छेदोनिया ॥६९॥
हस्तमुख प्रक्षाळुनी । शुष्कामलक वरी भक्षुनी । संतृप्त जाहला कैवल्यदानी । हे जनी ऐकोनिया ॥७०॥
जन बोलती परस्परे । आम्ही पाचारितो आदरे । वंचूनिया आमुची घरे । केले साजिरे शुक्लगृह ॥७१॥
आम्ही केली षड्रस अन्ने । ती नावडती याचिया मने । दारिद्र घरी संतोषाने । केले भोजन ययाने ॥७२॥
शुक्लगृही पूजा घेउनी । महोत्कट पातला राजसदनी । तेथे अवघे जन येउनी । विनवोनिया पाचारिती ॥७३॥
देवोनिया ढेकर । जनास म्हणे अदितीकुमर । माझे पूर्ण जाहले उदर । घरोघर जेऊ कैसा ॥७४॥
जन म्हणती देवाधिदेवा । आता आग्रह कदा न करावा । आमचे घरी येऊनि द्यावा । संतोष ठेवा बहुसाल ॥७५॥
रथशिबिकातुरंगगज । दारी दाटले समाज । हे पाहूनिया गणराज । काय करिता जाहला ॥७६॥
धरोनिया असंख्य रूपे । वाहनी आरूढला साक्षेपे । घरोघरी चालता गणाधिपे । सनकसनंदनी अवलोकिले ॥७७॥
विनायकाच्या असंख्य मूर्ती । घरोघरी पुजा घेती । हे पाहोनिया आश्चर्य करिती । सनकसनंदन तेधवा ॥७८॥
म्हणती हा पूर्णावतार । याचे लीलेचा न कळे पार । आम्ही मायामय पामर । हा सर्वेश्वर न जाणू ॥७९॥
होता अवनीवर भार । हा धरोनिया अवतार । पालण करी चराचर । कृपासागर जगदात्मा ॥८०॥
असंख्यात विनायकमूर्ती । पाहाता ब्रह्मानंदी जाहली स्थिती । ऋषि जिकडे पाहती । भासे तिकडे विनायक ॥८१॥
दाहीदिशा भरोनि उरला । चराचरी व्याप्त जाहला । ते पाहती आपणाला । तो स्वये विनायकचि भासती ॥८२॥
जागृतीस्वप्नसुषुप्ती । अवस्थामाजी विनायक पाहती । पुढे उभा गणपती । दोन्ही युवती समवेत ॥८३॥
माथा शोभती दूर्वाकुर । सर्वांगी चर्चिला दिव्य सिंदूर । कटिवेष्टित पादोदर । भालावर अर्धशशी ॥८४॥
उभारोनिया वरदकर । सुहास्य वदने लंबोदर । पाहता ऐसा करुणाकर । ऋषीश्वर आनंदले ॥८५॥
चरणी घालोनि लोटांगण । स्तवने तोषविती गजकर्ण । पुनःपुनः धरिती चरण । मुखी स्मरण विस्तारती ॥८६॥
प्रसन्नमुखे गजानन । वरद बोले अभयवचन । तुम्हास मी येथून । कदा बंधन करीना ॥८७॥
नांदेल अखंड स्वरूपस्थिती । स्मराल सदा मच्चरण चित्ती । ऐसे बोलोनि गणपती । अदृश्यगती पावला ॥८८॥
ऐसे विनायक महिमान । पाहता चकित ऋषीचे मन । अनंतरूपे धरून । घेतसे अर्चन नगरींचे ॥८९॥
घरोघरी आनंदकंद । पूजिता जाहला ब्रह्मानंद । भाग्य जनाचे अमर्याद । वर्णिता न वर्णवे सहस्त्रास्या ॥९०॥
दीनानाथ करुणासिंधू । भवभयपीडा त्रस्तबंधू । निजजनकैरवविधू । मायिका बोधून न कळे त्याचा ॥९१॥
धन्यधन्य तो काशीपती । ज्याचे मंदिरी परब्रह्मस्थिती । न कळे त्याची सुकृतगती । जेणे गणपती वश केला ॥९२॥
श्रोते परिसा सावधान । पुढे शमीपूजा महिमान । व्यासास सांगे कमलासन । आनंदवर्धन गणेशकथा ॥९३॥
जयजयाजी विश्वपाळका । निजजनमायापाशच्छेदका । करुणार्णवा अघहारका । विनायका तू जगत्पती ॥९४॥
स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । अष्टमोध्याय गोड हा ॥९५॥
अध्याय ॥८॥ ओव्या ॥९५॥
अध्याय आठवा समाप्त