श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जयजयाजी आनंदकंदा । भक्ताभीष्टप्रवरदा । नमन माझे तुझिया पादा । असो सर्वदा विनायका ॥१॥
पूर्वाध्यायी कथानुवाद । हाचि कथिला विशद । देवीप्रसादे आनंद । देवांतक पावला ॥२॥
आता ऐका सावधान । गणेशकथा परमपावन । रौद्रकेतू पुत्रालागुन । बोले वचन शूरस्वभरे ॥३॥
ते ऐकोनिया काशीपती । बोलता जाहला विनायकाप्रती । काय म्हणावे भक्तपती । शयनप्रीती करिसी कैसे ॥४॥
तव स्मरणमात्रे संसारमाया । देवाधिदेवा जाती विलया । तो तू दानवास्त्रे मोहोनिया । निद्रिस्थ कैसा जाहलासी ॥५॥
ऐसे ऐकतांचि अदितीसुत । जागृत होवोनि उठोन बैसत । चाप सज्जवोनिया त्वरित । योजी मनात अस्त्र तेव्हा ॥६॥
पतंगास्त्र आणि घंटास्त्र । सोडिता जाहला कश्यपपुत्र । घंटा वाजती चित्रविचित्र । तेणे जागृत जाहली सेना ॥७॥
देवसेना होता जागृत । युद्धास सर्सावले दनुजसुत । पतंगास्त्र जपता पक्षी बहुत । झेपावले तयांवरी ॥८॥
अनेक लक्ष अनेक जातीचे । पक्षी मारिती सैन्य परांचे । पक्षवाते वृंद वीरांचे । आकाशपंथे उडविती ॥९॥
पक्षियांचे पक्षिवात पवने । धुरोळा उडोनिया नयने । झांकोनि विव्हल अंतःकरणे । दैत्य पडती रणांगणी ॥१०॥
चंचुपुटे पक्षीगण । करिती दैत्य सेनेचे खंडण । अश्वखरउष्ट्रवारण । सोडिले प्राण तयांनी ॥११॥
दानव सेनेत हाहाःकार । पाखरांणी संहारिले असुर । देव करिती जयजयकार । रौद्रकेतूकुमर गजबजला ॥१२॥
देवांतक चिंतातुर । करोनि अस्त्राचा विचार । खड्गास्त्र खडतर । सोडी सत्वर अभिमंत्रुनी ॥१३॥
जेव्हा दानव अस्त्र सोडीत । तेव्हा नादे क्षोणी कांपत । खड्गे जाहली असंख्यात । प्रळय करीत चालिली ॥१४॥
अस्त्रापासोनि वन्ही उसळे । तेणे जळती सिद्धीज दळे । त्या खड्गानी पक्षी सगळे । झाले तेव्हा छिन्नभिन्न ॥१५॥
खड्गे स्वये येऊनि आपण । संव्हारिती देवगण । कोणाचे तुटले कर चरण । जंघा कान खंडले ॥१६॥
सिद्धीपासोन जाहली वाहिनी । ती संव्हारिली खड्गानी । नदी चालिली रक्तवाहिनी । उदधीसि भेटावया ॥१७॥
ऐसे पाहता गणपती । परम क्षोभला तेव्हा चित्ती । वज्रास्त्र सोडी त्वरितगती । तेणे जगती कापतसे ॥१८॥
वज्रास्त्रे खंडिन खड्गे सकल । स्वनादे सेना करोन विकल । त्याही संस्कारिले दैत्यबल । कापे जग तेधवा ॥१९॥
ऐसे होता देवांतक । रौद्रास्त्र सोडी देख । त्या नादे सकळिक । कापे जग तेधवा ॥२०॥
देवसेनेत हाहाःकार । जाहला करिता तेव्हा महावीर । प्राण सोडिती सत्वर । लंबोदर स्मरोनिया ॥२१॥
रौद्रास्त्रापासोन क्रूरकर्मा । उत्पन्न जाहला पुरुषसत्तमा । तो देखोन देवोत्तमा । ग्रासावया धावतसे ॥२२॥
ऐसे पाहता अदितिनंदन । ब्रह्मास्त्र सोडी अभिमंत्रुन । क्रूरकर्मा पुरुष त्यापासून । जाहला उत्पन्न भयानक ॥२३॥
तो पुरुष गर्जे प्रबळ । तेणे कापे ब्रह्मांडगोळ । दोघे भिडती आकाशी सबळ । दाविती बळ परस्परा ॥२४॥
दोघे करिती मल्लयुद्ध । गुप्त जाहले तेव्हा प्रबुद्ध । विनायक करी सिंहनाद । दानववृंद कापे रणी ॥२५॥
आपले अस्त्र विनायके । नाशियेले अतिकौतुके । ऐसे पाहोन देवांतके । अस्त्र निके योजियेले ॥२६॥
अभिमंत्रोनि अस्त्र सोडिता । शक्ती उत्पन्न जाहली तत्वता । विनायकावरी शक्ती येता । अष्टसिद्धी धावल्या पै ॥२७॥
त्याणी धरोनि शक्तीप्रती । आणिता पळाली शीघ्रगती । तिचे केश धरोनि दैत्यपती । फिरविता कदा न फिरे पै ॥२८॥
अणिमा धावोनि मुष्टिघाते । ताडिती जाहली दैत्येशाते । गरिम लघिमा वशिमा दैत्याते । पादपहारे ताडिती रणी ॥२९॥
दैत्येंद्र त्याते वेगे धरून । करू पाहे अस्फालन । तव त्या गेल्या निष्टुन । घाय मारूनि तयासी ॥३०॥
विभूती आणि प्राकाम्या धावल्या । दानवेंद्रावरी कोसळल्या । लत्ताप्रहार मारित्या जाहल्या । मूर्च्छित पडला दैत्यपती ॥३१॥
मूर्च्छा सांवरोनि देवांतक । धावे मारित प्रळय हाक । तेणे येऊनि विनायक । मुष्टिघाते ताडियेला ॥३२॥
तेणे किंचित मूर्छा येऊनि । निचेष्टित पडे कैवल्यदानी । क्षणे सावध होउनी । चारी आयुधे संवरीत ॥३३॥
घेऊनिया आयुधे तेव्हा चार । त्याही ताडिला देवे असुर । दैत्यदेह वज्रसार । न होय चुर किंचित पै ॥३४॥
व्यर्थ जाता शस्त्रघात । विनायक मनी चिंताक्रांत । देवांतक शर वर्षत । विनायक तोडित तयांसी ॥३५॥
घोरांदर युद्ध मांडले । तव दिनमान सरोन गेले । रात्र दाटली तमोमेळे । कृत्रिम लाविले दीप तेव्हा ॥३६॥
चंद्रज्योती पाजलल्या अद्भुत । त्याचे प्रकाशे वीर झुंजती समस्त । तव रौद्रकेतू येऊनि त्वरित । माया निर्मित विचित्र पै ॥३७॥
मायामय अदिती निर्मिली । रौद्रकेतूने रणी आणिली । वस्त्राभरणे परम शोभली । रडू लागली रणांगणी ॥३८॥
अदिती करी आक्रोश रणी । तीते पाहे अंकुशपाणी । म्हणे प्रालब्धे कैसी करणी । विपरीत केली पै ॥३९॥
अदिती म्हणे विनायका । पराक्रमी म्हणविसी निका । तुझे समोर माझी बाळका । करिती दशा दैत्य कसे ॥४०॥
शोक करि अदिती रणी । तव कंचुकी फाडिली दैत्यानी । तिचे वस्त्र आसुडोनी । नग्न मानिनी केली पै ॥४१॥
पाहता मातेचे विटंबन । विनायक करी रुदन । म्हणे माझे झालेपण । व्यर्थ जाहले आज कैसे ॥४२॥
माझे मायेची गेली अबरू । विष भक्षोनिया मरू । अथवा शरीर विदारू । किंवा चिरू उदराते ॥४३॥
पाहोनि विनायकाचा शोक । रडे रणी नरनायक । काशीपती करे देख । ताडी भाळी निष्ठुरपणे ॥४४॥
दैत्यमायेने मोह पावला देव । तव आकाशवाणी गर्जे अभिन्नव । दैत्यमाया देवाधिदेव । या प्रसंगी न जाणे कैसा ॥४५॥
ऐसी ऐकोनि आकाशवाणी । सावध जाहला परशुपाणी । अदृश्य जाहली अदिती रमणी । देव मनी विचार करी ॥४६॥
शिवदत्तवर देवांतकाशी । प्रातःकाळा वाचोन शस्त्रे तुजशी । न लागतील गा तेजोराशी । हे गजाननास समजले ॥४७॥
तव प्रभातकाळ जाहला प्राप्त । देवांतक पाहे अदितीसुत । तव तो गजवदन दीसत । भयभीत जाहला मनी ॥४८॥
गजास्य पाहता विनायक । भ्रांत जाहला देवांतक । तयासिम्हणे विश्वव्यापक । शिववर देख विचार मनी ॥४९॥
सावध होवोनि दैत्यपती । दोही दंत धरोनि हाती । हालवी तसे गणेशाप्रती । न मानोनि चित्ती भयाते ॥५०॥
तव गजवदने काय केले । त्याचे मस्तकी दांत रोविले । तेणे मस्तक भिन्न जाहले । शरीर चुरले दैत्याचे ॥५१॥
देवांतकाचे शरीरातून । ज्योती निघाली दैदीप्यमान । ती विनायकदेही शिरून । लीन जाहली क्षणमात्रे ॥५२॥
तीन योजने देहाकृती । दैत्य प्रेत पडले क्षिती । जयजयकारे देव गर्जती । पुष्पे वर्षती घनदाट ॥५३॥
दुंदुभी वाजविती असुर । नाचती अप्सरा सुंदर । देवी स्तविला लंबोदर । आनंदनिर्भर होवोनिया ॥५४॥
दिशा जाहल्या तेव्हा प्रसन्न । सुखस्पर्शी वाहे पवन । औषधी जाहल्या रसापन्न । फलसंपन्न वृक्ष जाहले ॥५५॥
स्वाहास्वधावषट्कार । उच्चारू लागले ऋषीश्वर । ह्रषीकेशी नाम सत्वर । ठेविते जाहले विनायका ॥५६॥
ऐकता देवांतकाचे निधन । भूपती आले धाऊन । त्याही स्तवोनि गजानन । धरणीधर नाम ठेविले ॥५७॥
काशीपती धावूनि लवलाही । शीर ठेवी गणेशापायी । सिंहारूढ ते समयी । धर्मदत्त जावई जाहला ॥५८॥
लागले वाद्यांचे गजर । चामरे ढाळिती सेवक नर । आतपत्रे शिरी अपार । धरिते जाहले तेधवा ॥५९॥
ऐसा महोत्साह करित । घेऊनिया अदितीसुत । नगरामाजी प्रवेशत । काशीपती तेधवा ॥६०॥
नगर शृंगारिले आसमास । राये फोडोनिया भांडारास । सुखी केले द्विजवरांस । देत वस्त्रे सेवकजना ॥६१॥
राये उत्साह केला परम । बाळे धावली दर्शनकाम । त्यास भेटे सर्वोत्तम । अतिप्रीती करोनिया ॥६२॥
राजा होवोन भद्रासनारूढ । अमात्यांस बोले वाक्य सदृढ । विप्रांची सरली आता नड । लग्न पुत्राचे करू वेगी ॥६३॥
मागध देशींचा भूपती । घेऊनिया सकल संपत्ती । सरदारकन्या घेऊनि निगुती । त्या नगरी येता जाहला ॥६४॥
तेथे जाहला विवाहसंभ्रम । राजा जाहला पूर्णकाम । मग रथ आणोनिया उत्तम । वरी बैसवी विनायकाशी ॥६५॥
गावात फुटली तेव्हा वार्ता । विनायक जातो येथून आता । ऐसे नागरिकजन ऐकता । धावले तत्वता खिन्नपणे ॥६६॥
विनायकाचे निजगडी । धावते जाहले कडोविकडी । ललनास जाहली तांतडी । लागवेगी धाविन्नल्या त्या ॥६७॥
करोनि विनायकासि नमन । बाळके करिती दीर्घरुदन । कोणी त्याचे पाय धरून । स्फुंदस्फुंदोनि रडताती ॥६८॥
कोणी त्याचे धरोनि पाणी । बोलती मुले दीनवाणी । आम्हसि टाकोनि मोदकपाणी । जाऊ नको सर्वथा ॥६९॥
कोणी म्हणती अदितीकुमरा । चाले जेवी आमुचे घरा । कोणी त्याचे कट्योदरा । कवळोनिया रडताती ॥७०॥
लेकुरे म्हणती सुखसमुद्रा । कैसा जातोस विपेंद्रा । तुझी ठसली ह्रदयी मुद्रा । तेणे भद्रा पावलो ॥७१॥
लावोनिया आम्हास लळा । कैसा जातोस अदितीबाळा । आमची तु जीवनकळा । बा प्रेमळा जाहलाशी ॥७२॥
तू वेदांसि अगोचर । परी आमुचे भाग्य त्याहूनि थोर । म्हणोनि तू बाळमित्र साचार । लंबोदर जाहलासि ॥७३॥
आम्हास दीन करोनिया । नको जाऊ गणराया । म्हणोन लेकुरे लागती पाया । स्फुंदोनिय तेधवा ॥७४॥
मुलांहूनि इतर जन । भावे म्हणती देवालागुन । तू पूर्ण ब्रह्मसनातन । कश्यपनंदन जाहलासी ॥७५॥
एक तुझे दर्शनासाठी । योगी होती परमकष्टी । दर्शने कृतार्थ परमेष्ठी । तो यादृष्टी पाहिला आम्ही ॥७६॥
तूते पाहता सुमुखा । आम्ही विसरलो संसारदुःखा । तो आमचा तू प्राणसखा । जातोस कैसा टाकोनिया ॥७७॥
एके रथी देव आणी भूपती । आरूढोनिया शीघ्रगती । चालले तेव्हा गोपुरावरती । नागरिक युवती आरूढल्या ॥७८॥
टाकोनिया प्रपंच व्यापार । ललना दर्शनी जाहल्या सादर । त्या म्हणती परस्पर । अदितीकुमर जातो गे ॥७९॥
याचे पाहोन गे वदनाते । तुष्टी होतसे नयनाते । तो हा डोळस टाकोन आम्हाते । निष्ठुरपणे जातो गे ॥८०॥
कामिनी पाहती प्रेमनिर्भर । त्यांचे नयनी वाहे नीर । लाजा वर्षोनिया सुंदर । ध्यान सत्वर केले त्याही ॥८१॥
गावाबाहेर रथ पातला । मागे धावे बालकमेळा । रडोनि करिती कोल्हाळा । हलकल्लोला माजवित ॥८२॥
आक्रंदोनि मुले रडती । कोणी रथापुढे आडवे पडती । कोणी ह्रदयी ताडण करिती । कपाळ फोडिती धरणीतळी ॥८३॥
कोणी शोके पडली मूर्च्छित । ऐसे पाहता अदितीसुत । रथाखाली उतरोन त्वरित । आलिंगित तयाते ॥८४॥
पाहोनि त्यांचा प्रेमभाव । ह्रदयी गहिवरला देव । तयासि म्हणे सिद्धिबुद्धीधव । शोक सर्व टांकारे ॥८५॥
विश्वास धरा माझे वचनी । सर्वाभूती मजवाचुनी । दुसरे नसे अन्य कोणी । हेचि नयनीदेखारे ॥८६॥
तुमचे ह्रदयी निरंतर । मीच आहे विश्वेश्वर । माझी मूर्ती करोन साचार । भावोपचार अर्पा तिसी ॥८७॥
तेणे न पावाल कधी संकट । मी आहे तुम्हा निकट । संसारी सुख भोगोनि चोखट । मुक्ती सुभट पावाल रे ॥८८॥
करोनि लेकुरांचे समाधान । सर्वास म्हणे कश्यपनंदन । तुमचे संगे सुखसंपन्न । आजवरी होतो मी ॥८९॥
आता जातसे आपले स्थळी । लोभ करावा तुम्ही सकळी । जन बोलती तयेवेळी । नेत्री अश्रु आणोनिया ॥९०॥
तुजवाचोनि उदास नगर । भणभणीत वाटे लंबोदर । तू आमचा सुखसागर। कैसा दूर होतोसि रे ॥९१॥
विनायक म्हणे तयांप्रती । प्रासादी स्थापोनि माझी मूर्ती । भजनपूजन करा निश्चिती । मी गणपती रक्षीन तुम्हा ॥९२॥
सर्वांचे करोनि समाधान । सिद्धिबुद्धीसहित भगवान । रथारूढ तेव्हा होऊन । रायासहित चालला ॥९३॥
वनोपवने लंघोनिया । त्वरे पातला कश्यपालया । विनायक आला ऐकोनिया । धावे माया लवलाहे ॥९४॥
दोन ललना समवेत । ती पाहता सुखावत । विनायक तीते नमस्कारित । सिद्धिबुद्धीसहित तेधवा ॥९५॥
पितयासि तैसाच नमी विनायक । त्यासि आलिंगी तेव्हा जनक । सदार कश्यपासी नरनायक । करी नमस्कार प्रेमभरे ॥९६॥
त्याचा करोनि सन्मान । सुखे करविती भोजन । विनायक महिमा तेव्हा जाण । काशीपती सांगतसे ॥९७॥
मग घेऊनि त्याचा निरोप । स्वनगरासि गेला नराधिप । स्वाश्रमी पातला कश्यप । प्रमोद भरित तेधवा ॥९८॥
सिद्धिबुद्धी पाहोनिया सुना । सुख पावली कश्यपांगना । ऐसा परमहर्ष कश्यपमना । सदारनंदना अवलोकिता ॥९९॥
ऐसा आनंदे कितीक दिवस । कश्यपगृही जगन्निवास । प्रमोदे करोनिया वास । आनंदास वाढवी ॥१००॥
मग विचार करी मनी । अवतारकृत्य जाहले येथुनी । आता जावे स्वकीय सदनी । मग सुखदानी काय करी ॥१॥
मातापित्यास करोनि नमन । विनायक बोले मधुर वचन । माते तुवा तप करोन । पुत्रत्व माते मागीतले ॥२॥
तेणे करोनि तुझा कुमर । मी जाहलो सर्वेश्वर । मारोनिया दानव समग्र । भूभार हरण केला मी ॥३॥
आता जातसे स्वधामी । ऐकता अदिति जाहली श्रमी । तीते ज्ञानदेव स्वामी । सांगतसे कृपेने ॥४॥
सर्वांभूती भगवद्भाव । अदितीस भासे सदैव । मग तिचे ह्रदयी देवाधिदेव । राहता जाहला प्रेमभरे ॥५॥
व्यासास म्हणे कमलयोनी । अवतारोनि कैवल्यदानी । भाररहित करोनि अवनी । जाता जाहला स्वधामासी ॥६॥
त्याचे अगाध आहे चरित्र । जे निजभक्ताते सुखपात्र । ते मी कथिले परमपवित्र । पराशरपुत्रा तुजकारणे ॥७॥
ज्याचे करिता भावे स्मरण । संसारदुःख नासे दारुण । त्यावरी तुष्टोन गजकर्ण । पद निर्वाण देतसे ॥८॥
जो करी याचे पठण । त्याचे होय संकटहरण । त्याचे सन्निध धूम्रवर्ण । राहे रक्षण करीत सदा ॥९॥
श्रोते परिसा सावधान । पुढे मयूरेशाचे आख्यान । जे पतितासि पावन । समाधान प्रेमळाचे ॥१०॥
जयजयाजी संकटभंजना । गुणातीता निरंजना । अनाथबंधो सनातना । राहो मनी ध्यास तुझा ॥११॥
स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंडरसभरित । पंचदशोध्याय गोड हा ॥११२॥
श्रीगजाननार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥ अध्याय १५ ॥ ओव्या ॥११२॥
अध्याय पंधरावा समाप्त