श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जयजयाजी संकटहरणा । पुराणपुरुषा विश्वभूषणा ।
जे स्मरती तुझिया चरणा । जन्ममरना जिंकिती ते ॥१॥
तूंच या ग्रंथाचा कर्ता । तूंच यासि वर देता ।
पठण श्रवण कर्त्यांचिया अर्था । पूर्णकर्ता तूंच पैं ॥२॥
श्रोते परिसा सावधान । केलें गणेशपुराण कथन ।
याचें श्रवणें भवबंधन । करी खंडण जगत्पती ॥३॥
प्राकृत ग्रंथ करवोन । भाविकां हातीं दे गजानन ।
याचें स्पष्ट हेंचि कारण । गजवदन कृपाळू खरा ॥४॥
इक्षुदंडाची मधुरिमा । अशक्त भक्षितां पावती श्रमा ।
तिची शर्करा करितां उत्तमा । भक्षणी सुगमा सुखतर ॥५॥
तैसा संस्कृत पुराणाचा अर्थ । काढितां श्रम पावती अशक्त ।
यदर्थ तुष्टोनि एकदंत । ग्रंथ प्राकृत केला तेणें ॥६॥
एके पुरुषें गंगोदक । सुवर्ण आणि रौप्य कलशीं देख ।
भरिलें जें तें निःशंक । सेवणारसि पावन सारिखेंची ॥७॥
तैसे संस्कृत प्राकृतांतील । भगवद्गुण जे सेवितील ।
ते गणेशपद पावतील । निश्चयेंसि बोल सत्य हे ॥८॥
ग्रंथरुपें भागीरथी । गणेशें धाडिली भक्ताप्रती ।
यामाजी जे स्नान करिती । ते तरती संसारीं ॥९॥
आधिव्याधि भयआपदा । श्रवणकर्त्यासि न होती कदां ।
यदर्थ भक्तजनीं सदां । ग्रंथ संपदा संग्रहावी ॥१०॥
श्रवणपठणें सकलकाम । पूर्ण करिता पुरुषोत्तम ।
यदर्थ हा ग्रंथ उत्तम । भक्तसत्तम पाहोत सदां ॥११॥
जैसें गणेशपुराणीं व्यासें कथिलें । तैसेंच आहे येथें लिहिलें ।
श्रवण करिती गणेशभक्त भले । कळसास आलें निरुपण ॥१२॥
एकविंशति आवर्तन । या ग्रंथाचीं करितां जाण ।
त्याचे सकलकाम गजकर्ण । करितां पूर्ण निश्चयें ॥१३॥
जरीं सकाम कोणी श्रवणपठण । कर्ता त्यासि हेंच विधान ।
क्रीडाखंडाचा पहिला जाण । परिपूर्णता आवर्तनासी ॥१४॥
ऐसी आवर्तनें एकवीस । करितां पावेल मनेप्सितास ।
गणेश त्याचें संकटास । राहूं नेदील निश्चये ॥१५॥
या ग्रंथाचें करील भावेंपूजन । त्यास होईल परमशोभन ।
त्यावरी तुष्टोन गजवदन । करील अवन तयाचें ॥१६॥
अनंतजन्माच्या पापराशी । श्रवणपठनें जातील विलयाशी ।
सुपुत्र जन्मेल त्याचे वंशीं । हें निश्चयेंशी सत्य असे ॥१७॥
उपासनाखंडाचे अध्याय । बेवीस जाणा अप्रमेय ।
क्रीडाखंडाचे चवतीस गुणमय । येकूण छप्पन्न अध्याय हे ॥१८॥
गणेशें माझें करोनि मिस । उत्पन्न केलें भाविकांस ।
पाहतां पाहतां संतोष आसमास । गणेशभक्तांस होईल पैं ॥१९॥
यांत माझे आर्ष बोल । हे नीट करोत ज्ञानी सकल ।
ग्रंथ मानससरोवरीं मराळ । श्रोते तुम्ही साजिरे ॥२०॥
ब्रह्मानंद गुरुप्रसादें करुन । केलें गणेशपुराण कथन ।
ग्रंथरुपें गजानन । करो अवन भाविकांचें ॥२१॥
नातू उपनाम अलोलिक । मुख्य नाम विनायक ।
त्याचे मुखें गणनायक । ग्रंथ अलोलिक पूर्ण करी ॥२२॥
विक्रमशाक एकोणिशेपांच । शालिवाहन सत्राशें सत्तर साच ।
माघशुक्ल चतुर्दशी जैशी पांच । भोमवासर साजिरा ॥२३॥
ते दिवसीं ग्रंथसमाप्ती । करविता जाहला गणपती ।
तेणें माझें जन्मसार्थक निश्चिती । होवोनि तरलों संसारीं ॥२४॥
इति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।
क्रीडाखंड रसभरित । चतुस्त्रिंशोध्याय गोड हा ॥२५॥अध्याय॥३४॥ओव्या॥२५॥
अध्याय चौतिसावा समाप्त