श्रीगणेशाय नमः । श्रीदिगंबराय नमः ।
व्यास म्हणे विरंचीलागुनी । कदंबतीर्थ महिमा कथुनी । स्वर्गी गेलिया नारदमुनी । रुक्मांगदे काय केले ॥१॥
ऐकोनि त्याचे प्रश्नोत्तर । कथिता जाहला सावित्रीवर । रुक्मांगद होऊन हर्षनिर्भर । गमनविचार करीत जो ॥२॥
तव चातुरंगसेना पातली । तिणे रुक्मांगद तनू देखिली । म्हणती दशा काय जाहली । मूर्ती नासली कोण्या कर्मे ॥३॥
कनकाऐसी स्वरूपकांती । त्याची जाहली कवण गती । मग रायाते विचारिती । सेनापती ते काळी ॥४॥
रुक्मांगद म्हणे वनी श्रमलो । म्हणोनि ऋष्याश्रमी प्रवेशलो । ऋषिपत्नीसि बोललो । उदक द्यावे मज माये ॥५॥
कामातुर होऊनिया अबळा । मग ती पडे माझे गळा । झिटकारिली मी ते वेळा । तेणे बाळा क्रोधावली ॥६॥
तिणे रोष मज शापिले । तेणे शरीर कुष्ठी जाहले । मग देखिली नारदाची पाउले । तेणे कथिले कदंबतीर्थ ॥७॥
मज आहे तेथे जाणे । तुम्ही करा मजसवे येणे । तीर्थमाजी स्नान करणे । मग पावणे गणेशपदा ॥८॥
मग चातुरंगसेनेसमवेत । राजा पावला कदंबतीर्थ । विधिविधाने स्नान करित । मग पूजीत विनायका ॥९॥
चिंतामणीचे करूनि पूजन । ब्राह्मणालागी अमित धन । देऊनिया महादान । याचकजन सुखी केले ॥१०॥
तेणे तुष्टला लंबोदर । केले त्याचे दिव्य शरीर । राजा पावला आनंद थोर । परिवारासमवेत पै ॥११॥
तो पातले दिव्य विमान । अप्सरागणी सेव्यमान । राजा त्याते नमस्कारुन । नम्र वचन बोलतसे ॥१२॥
तुम्ही तेजस्वी कोठील कोण । कोठोनि झाले आगमन । संतोष पावले अंतःकरण । पाहूनि चरण तुमचे ॥१३॥
मग बोलती गणेशगण । आमचा स्वामी गजकर्ण । त्याचे तुष्टले अंतःकरण । भक्ती निर्वाण पाहोनि तुझी ॥१४॥
दर्शनासि बोलावितो तुम्हासी । ऐकता आनंद न माये तयासी । काय अधिकार अम्हासी । त्याचे चरणासी पाहावया ॥१५॥
की या तीर्थाचा बडिवार । मजवरी करोनि आदर । पाचारितो लंबोदर । जन्मांतर शुद्ध माझे ॥१६॥
गण म्हणती रायासी । त्वा संपादिले तीर्थविधीसी । आम्ही वंदावे तुझे पदासी । भाविकासी निजभावे ॥१७॥
राजा करोनि त्यांचे पूजन । मग बोले दीनवदन । माझे पितरांसि दर्शन । गजाननाचे करवावे ॥१८॥
गण म्हणती पितृवत्सला । स्नान करोनि पुण्य दे त्याला । तेणे पावतील सद्गतीला । दर्शनाला नेऊ तया ॥१९॥
ऐकोनि गणाचे वचन । मग दर्भाचे पुतळे करून । त्यासमवेत करी स्नान । मंत्र उच्चारून भाविक तो ॥२०॥
मंत्रः । कुशोसिकुशपुत्रोसिब्रह्मणानिर्मितः पुरा । त्वयिस्नातेतुसस्नातोयस्येदंग्रंथिबंधनात ॥१॥
ऐसा मंत्र उच्चारून । दर्भाचे पुतळे करून । स्नाने करिती सकलजन । आपलाले जन उद्धरिती ॥२१॥
रुक्मांगद सेनेसहित । कलत्र पुत्र गणगोत । भीम चारुहासिनीसमवेत । विमानस्थ सर्व जाहले ॥२२॥
अनेक विमानस्थ सकल लोक । पावते जाहले गणेशलोक । पाहोनिया विनायक । अनंत सुख पावले ॥२३॥
व्यास म्हणे कमलासना । मदविव्हल मुकुंद अंगना । तिचे चरित्र करि कथना । प्रसन्नमना ये काळी ॥२४॥
धाता म्हणे पाराशर्या । मुकुंदेची ऐके चर्या । मदने जाळिली तिची काया । दावानले कदली जैशी ॥२५॥
रुक्मांगदाचा स्वरूपठसा । ह्रदयी बिंबला तेणे डोळसा । वारंवार टाकी श्वासोछ्वासा । म्हणे कैसा चांडाळ हा ॥२६॥
त्यालागी जाहली परमपिसी । ब्रह्मांडभरी जाय उदासी । चैन न पडे तयेसी । अग्नी शरीरासी प्रज्वाळिला ॥२७॥
घेता चंदन शीतळवारा । तेणे शरीरी वाटे उबारा । अवलोकिता रोहिणीवरा । प्राण घाबरा होतसे ॥२८॥
मंदीर जाहले कारागार । नयनी वाहे तिचे नीर । पुष्पमाळा भासती विखार । शरीरी स्मर प्रज्वाळला ॥२९॥
नावडे हास्यनृत्यगीत । कथाकौतुके गणगोत । रुक्मांगदी गुंतले चित्त । वाटे प्राणात वोढवला ॥३०॥
न खाववे दिव्यान्न । गोड न लगे तिसी जीवन । पिशाचवत फिरे मन । देहभान तिशी नाही ॥३१॥
कामे ऐसी व्याकुळ पडली । तव किंचित निद्रा तीते लागली । इंद्रे ती वेळ साधिली । तनू धरिली रुक्मांगदाची ॥३२॥
पाठ थापटोन जागी करी । म्हणे तळमळू नको सुंदरी । डोळे उघडोन पाहे येरी । येरू अंकावरी घे तिजला ॥३३॥
मग आनंदोनि वेल्हाळा । मिठी घाली त्याचे गळा । इंद्रे तिचे कुचमंडळा । मर्दिले तेव्हा निःशंक ॥३४॥
करोनि परस्पएर आलिंगन । मुकुंदेचे मुखचुंबन । घेऊनिया सहस्त्रनयन । नीवीबंधन मुक्त करी ॥३५॥
करोनि त्याचे अधरपान । सुरतानंदे जाहली निमग्न । रती होता समाधान । लज्जायमान मग जाहली ॥३६॥
रुक्मांगदवेहे सुराधिप । घेऊनि तिचा निरोप । जाता किंचिद्वियोगताप । पाऊन सुखरूप जाहली ॥३७॥
तिचे मनी हाचि भाव । मी भोगिला रुक्मांगदराव । तेणे स्वस्थ जाहला जीव । इंद्रभाव नेणेची ॥३८॥
इंद्रापासोनि गर्भ राहिला । न जाणोनि तिचे कृत्याला । ऋषि आनंद पावला । मग गर्भाला संस्कार ॥३९॥
नवमास पूर्ण होता । मुकुंदा प्रसवली दिव्य सुता । जातकर्मादि संस्कारता । प्रमोदे ऋषि करीतसे ॥४०॥
करोनि संस्कार नामकर्म । गृत्समद ऐसे नाम । ठेविता जाहला ऋषिसत्तम । पुत्रोत्तम मानोनिया ॥४१॥
शुक्लपक्षीचा चंद्र जैसा । दिवसेंदिवस वाढे तैसा । अंगतेजे सूर्य जैसा । मौजीबंधन संस्कारिला ॥४२॥
गणेशमंत्रे उपदेशिला । वेदशास्त्रार्थी निपुण जाहला । नित्य अर्ची विनायकाला । तेणे पावला परमसिद्धी ॥४३॥
मगध देशींचा भूपती । मागध नामा पुण्यकीर्ती । स्वरूपे जैसा मन्मथमूर्ती । ज्याची ख्याती जगतीतळी ॥४४॥
सुधर्मा नामे त्याची वनिता । शापानुग्रहे समर्थकांता । लावण्यराशी पतिव्रता । नसे साम्यता तियेते ॥४५॥
त्याचे दोन अमात्य सुमती । विद्वान जैसे बृहस्पती । नीतीने राजसेवा करिती । परमप्रीती करोनिया ॥४६॥
राजमंदिरी पितृतिथी । आमंत्रणे केली ऋषींप्रती । अत्रिवसिष्ठादि ब्राह्मणपंक्ती । यथानिगुती बैसऊनिया ॥४७॥
त्यामाजी मुकुंदानंदन । गृसमदनामे तपोधन । राये पाचारिता येऊन । पूजासनी बैसला तो ॥४८॥
अत्रि म्हणे गृत्समदासी । तू आहेस तपोराशी । परि ब्रह्मत्व नाही तुजसी । नाही श्राद्धास योग्य तू ॥४९॥
रुक्मांगदापासून तुझा जन्म । ऐकोन पावला क्रोध परम । म्हणे शापून करीन भस्म । खरे वचन न होता तरी ॥५०॥
जाळील वाटे त्रिभुवनासी । ऐसे वटारिले नयनासी । जन भिवोन पळती त्यासी । पाहोनि सिंहासी मृग जैसे ॥५१॥
ऐसा पावता अपमान । मग खाली घालोनि मान । गृही येऊन म्लानवदन । मुकुंदे लागून पुसत असे ॥५२॥
म्हणे दुष्टे काय केले । ते सांगे का असत्य न बोले । कवणापासून जन्म झाले । माझे वहिले दुर्भगे ॥५३॥
आता बोल का सत्य वचन । ना तरी भस्म करीन शापून । मग ती होऊन म्लानवदन । अधोवदन बोलतसे ॥५४॥
म्हणे रुक्मांगदराजा चक्रवर्ती । स्वरूपे जैसा मन्मथमूर्ती । पाहोनिया माझे चित्ती । कंदर्पोत्पत्ती जाहली ॥५५॥
अनावर झाली चित्तवृत्ती । मग म्या भोगिला तो भूपती । ऐसे ऐकता वचनाप्रती । सक्रोध शापोक्ती वदला तो ॥५६॥
म्हणे दुष्ट कंटकी तू महावनी । फळभारे डवरोनी । नाही उपयोग तुझा जनी । सर्व प्राणी वर्जती तूते ॥५७॥
ऐकोन त्याचे शापवचन । मुकुंदा होऊन कोपायमान । म्हणे दुष्टा तू दैत्य होऊन । भये जन त्रासतील रे ॥५८॥
ऐसा परस्परे शाप होता । बदरी जाहली ती तत्वता । सकळ जंतूने वर्जिता । महावनी राहिली ती ॥५९॥
व्यास म्हणे कमळासन । हे धन्य गृत्समदाख्यान । भावे पठणश्रवणकरिता जन । संकटापासोन तरतील ते ॥६०॥
श्रवणपठणमात्रे स्ववांछित । पावोनि होतील आनंदभरित । त्यावरी तुष्टेल एकदंत । हे निश्चित जाण गा ॥६१॥
जयजयाजी विश्ववंद्या । विश्वभूषण विश्वाद्या । तुझे स्मरणे पावोनि विद्या । नासो अविद्या भक्तांची ॥६२॥
तू महाराज गजवदन । निजभक्तांचे तूच जीवन । त्वच्चरणी माझे मन । अनुदिन राहो की ॥६३॥
करिता तुझे नामस्मरण । होय भक्तांचे संकटहरण । हे तुझे तू राखी भूषण । माझे तारण करी आता ॥६४॥
स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । नवमोध्याय गोड हा ॥६५॥
॥ अध्याय ॥९॥ ओव्या ॥६५॥