श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदीननाथाय नमः ।
जयजयाजी मंगलधामा । न कळे तुझा अद्भुत महिमा । निजभक्तांवरी तुझा प्रेमा । नाही उपमा तयासी ॥१॥
तू सकलमंगलाचेही मंगल । कार्यकारण तूचि सकळ । विश्व व्यापोनिया निर्मल । सूक्ष्म केवळ चिद्रूपे ॥२॥
चिदानंद तू परात्पर । परमात्मा विश्वसार । भक्ताभिमानी लंबोदर । गुणगंभीर गुणेश तू ॥३॥
जैसे येते तुझिया मना । तैशा रचसी अगम्य रचना । उद्धरावया पतित जना । क्रीडा नाना आचरसी ॥४॥
पूर्वाध्यायी दक्षाप्रती । मुद्गले उपदेशिली मंत्रस्थिती । तेणे पावला परमभक्ती । गणपतीची अनुपम्य ॥५॥
भृगुलागी विनयभावे । सोमकांत म्हणे माझ्या जीवे । आश्चर्य मानले ते ऐकावे । मग सांगावे समाधान पै ॥६॥
अंधकुब्जमूकबधिर । ऐसा जो कमलाकुमर । दुर्गंधियुक्तशरीर । रोगागार प्रत्यक्ष ते ॥७॥
मुद्गलऋषीच्या अंगवाते । तो पावला दिव्य देहाते । प्रत्यक्ष दर्शन दक्षाते । एकदंते दीधले ॥८॥
मुद्गलऋषि तो तपोधन । त्यास कैसे न घडले दर्शन । हे आश्चर्य मजलागुन । ऋषिवर्या वाटते की ॥९॥
सहस्त्र वर्षै करिता तप । त्यासि न भेटला गणाधिप । काय दक्षाचे पुण्य अमूप । तेणे तो दृश्य त्यासी जाहला ॥१०॥
ऐकोनि हर्षला ऋषिसत्तम । म्हणे तुझा हा प्रश्न उत्तम । ऐक त्याचे पूर्वील कर्म । तेणे धर्म समजेल तूते ॥११॥
सिंधुदेशी पल्लीनगरी । विख्यात आहे उर्वीवरी । कल्याणनामे वैश्यनरी । धनाढ्य तरे कुबेरसा ॥१२॥
देवब्राह्मणी रत सदा । नीतीने भोगी निजसंपदा । वदान्य कुशल कार्यसदा । दुःख कदा त्यासी नसे ॥१३॥
त्याची ललना गुणवती । नाम तियेचे इंदुमती । पतिपरायण साध्वी सती । जगी कीर्ति धन्य तियेची ॥१४॥
तिचे पवित्र उदरी सुत । जाहला बल्लाळ नामे विख्यात । शुक्लपक्षी तारकानाथ । वृद्धिंगत तैसा असे ॥१५॥
बळांसमवेत बल्लागुणी । सदा विनटला गणेशचरणी । गणेशभक्ती अंतकरणी । सदा वाणी नाम मुखे ॥१६॥
मेळवोनि बाळकांचा मेळा । ग्रामाबाहेर जावोनि अवलीळा । भजन करी वेळोवेळा । पुढे शिळा मांडोनिया ॥१७॥
गणेश कल्पोनि निजचित्ती । मांडली शिळा अति निगुती । पूजा करी अहोरात्री । ध्यानस्थिती सदा त्याची ॥१८॥
आणोनिया दुर्वांकुरभार । भावे अर्पी पूजाप्रकार । वनपुष्पे पल्लवभार । निरंतर अर्पीतसे ॥१९॥
धूपदीपनैवेद्य भावे । बाळके मानसी कल्पावे । ते गणेशासि अर्पावे । जिवे भावे करूनिया ॥२०॥
घरी न वसे कदाकाळी । सदा राहे देवाजवळी । पराग म्हणोनिया धूळी । भावे उधळी देवावर ॥२१॥
देव भावाचा भुकेला । तेणे गणेश संतोषला । ऐसी पाहोनि बालकलीळा । पिता क्षोभला तयावरी ॥२२॥
वेताटी घेऊनिया करी । येऊनि तो नगराबाहेरी । पुत्र धरोनिया वामकरी । छडी उगारी मारावया ॥२३॥
बाळ चळचळा कापत । स्फुंदस्फुंदोनिया रडत । मग आणोनिया मंदिरात । नीती सांगत तयासी ॥२४॥
म्हणे करी विद्याभ्यास । हित करणे संसारास । भलत्याच छंदे लोटिसी दिवस । तुझे मनास लाज नाही ॥२५॥
हे जरी न ऐकसी । तरी मी तुज बांधीन खांबासी । ताडन करीन गा निश्चयेसी । देत ऐसी भिती त्याते ॥२६॥
ऐसे सांगोनि बाळाते । मग गेला तो गृहकृत्याते । बाळके मिळवोनिया वनाते । जाऊनि भजनाते करीतसे ॥२७॥
वनपुष्पे करूनिया जमा । तेणे पूजीतसे मंगलधामा । भक्तिभावे केली सीमा । संतोष उमापुत्रांसि पै ॥२८॥
दक्षबाळा समवेत । पूजित असता एकदंत । गृही शोध करीतात । म्हणे सुत कोठे गेला असे ॥२९॥
जन सांगाती तयाते । येणे नाशिले आमुचे मुलाते । मेळवोनिया बाळकांते । जाऊनि वनाते नाचतसे ॥३०॥
वनी मांडोनिया दगड । म्हणे माझा हा वक्रतुंड । त्यासी करीत नाहीस दंड । तेणे पाखांड मांडिले ॥३१॥
आधीच होता राग पोटी । ऐसी ऐकता जनाची गोष्टी । मग धावला उठाउठी । हाती वेताटी घेऊनिया ॥३२॥
ग्रामाबाहेर आला धावत । क्रोधे थरथरा कापत । बाळके पाहूनिया पळत । पुत्र ध्यानस्थ बैसला असे ॥३३॥
त्यासि म्हणे दटाउनी । माझे उदरी तुवा येउनी । बुडविले माझे नावालागुनी । तुझेनी जनी निंद्य मी ॥३४॥
टाकून पुत्रस्नेह निष्ठुर । जैसा यमाचा किंकर । धरोनिया त्याचा कर । काष्ठे प्रहार करीतसे ॥३५॥
आसडोनि पाडिला धरणीवरी । निष्ठुर घाते लाथा मारी । रक्त वाहे त्याचे शरीरी । रुदन करी बालक पै ॥३६॥
वृक्षी मग बांधिला त्याशी । म्हणे आता देव सोडवील तुजशी । तोच पुरवील अन्नवस्त्रासी । तुजसी मजसी संबंध नाही ॥३७॥
आता येशील जरी घरा । प्राण घेवूनि करीन पुरा । क्रोधे प्रवेशला निजमंदिरा । वनी कुमरा टाकोनिया ॥३८॥
मोडोनि टाकिले त्याचे देउळ । वनी बांधला तसाच बाळ । तव झाला संध्याकाळ । निशा प्रबळ दाटली ॥३९॥
वृक्षी बांधला एकट वनी । शोणित वाहे अंगातुनी । ऐसा पडोनिया व्यसनी । देवासि मनी चिंती तदा ॥४०॥
बाळक विलपे शोकवचनी । विघ्नारी म्हणविशी आपणालागोनी । ते असत्य झाले आजचे दिनी । हेच जनी निंद्य तूते ॥४१॥
तुज भजता दिनेश । मज होतात ऐसे क्लेश । तुझे बुडाले आजि यश । हे विघ्नेशा न जाणशी तू ॥४२॥
भक्तभिमानीमानी ब्रीद मिरविशी । निजभक्तांची उपेक्षा करिशी । हे लाजिरवाणे नाही तुजशी । काय थोराशी म्हणावे ॥४३॥
ऐसा करोनि दीर्घशोक । मग शापिला तेणे जनक । म्हणे हो का कुब्जबधिरमूक । पापभाक मम पिता ॥४४॥
जेणे देवालय भंगिले । त्यासि महादोष घडले । त्याचे कर्म अबद्ध बोले । पाहिजे भोगिले जन्मांतरी ॥४५॥
ऐसी वदोनि शापवचने । मग राहिला स्वस्थमने । गणेश आकळिता ध्याने । जगज्जीवने जाणितले ॥४६॥
ह्रदयी जाणोनि त्याचे दुःख । अंतरी कळवळिला वारणमुख । लगबग धाविन्नला देख । त्याचे दुःख हरावया ॥४७॥
ब्राह्मणाचे दिव्यस्वरूपे । तेथे येऊनिया साक्षेपे । बंधमोक्ष करूनि गणाधिप । निजभक्त पे तयाचे ॥४८॥
आंगावरी फिरऊन अमृतकर । केले त्याचे दिव्य शरीर । निर्मलज्ञान लंबोदर । देत सत्वर तयासी ॥४९॥
बल्लाळ होऊनि हर्षभरित । पदी घाली दंडवत । जोडोनिया दोन्ही हस्त । स्तुती करीत भावार्थे ॥५०॥
ऐकोनि त्याची स्तुति अद्भुत । मग ब्राह्मण तयासी म्हणत । तुझे शापान्वये तव तात । व्याधिवंत होय आता ॥५१॥
मग वदे बल्लाळ देवा । त्वद्भक्ती मम ह्रदयी साठवा । या स्थळी महिमा तुवा । वाढवावा दयानिधे ॥५२॥
ऐकोनि त्याचे ऐसे वचन । मग बोले गजानन । तुझे नामाभिधान धरून । करीन पावन निजभक्ता ॥५३॥
बल्लाळविनायक हे नाम । या स्थळी धरिले म्या उत्तम । भाद्रपद शुक्ल चतुर्थीस काम । निजभक्तांचे पुरवीन मी ॥५४॥
ऐसा देऊनिया वर । गुप्त जाहला लंबोदर । तेथे रम्य जाहले मंदिर । बल्लाळेश्वर देव तेथे ॥५५॥
पल्लीनामे नगरी विख्यात । अद्यापि आहे कोकणात । विनायक तेथे नांदत । उद्धरीत निजभक्ता ॥५६॥
बल्लाळभक्त तो बाळक । तेथे अर्ची विनायक । ते पाहावया कौतुक । नागरिक धाविन्नले ॥५७॥
बल्लाळाचा होताच शाप । अंधबधिर जाहला बाप । शरीरी क्षते पडली अमुप । करी विलाप कांता त्याची ॥५८॥
मग येऊनिया वनी । पुत्र अवलोकिला नयनी । शांतदांतसमाधानी । तेणे मनी संतोषली ॥५९॥
पुत्रस्नेहे मोहिली अंगना । स्तनी दाटला तिचे पान्हा । मग म्हणे ती अगा नंदना । चाल सदना आपुलिया ॥६०॥
स्नेहे आलिंगिला तिणे पुत्र । म्हणे वंशी धन्य तू सत्पात्र । तुझे निगती आम्हास पवित्र । इहपरत्र पावेल की ॥६१॥
परी तुझे पित्याची दशा झाली । ती तुवा पाहिजे अवलोकिली । तेणे जगात कीर्ती भली । विस्तारेल सत्पुत्रा ॥६२॥
इंदुमतीचे ऐसे वचन । ऐकोनि बोले तिचा नंदन । न पाहे मी त्याचे वदन । सत्यवचन हे माझे ॥६३॥
न करिता अपराधाते । तेणे ताडण केले माते । भंगिले सुंदर देवालयाते । विनायकाते क्षोभविले ॥६४॥
तो नव्हे माझा बाप । त्याचे फळले त्यास पाप । तू न करी व्यर्थ विलाप । माझा शाप न फिरे कदा ॥६५॥
मातापिताबंधूजन । माझा एक गजानन । तू करी त्याचे सेवन । रक्षी मन त्याचे पदी ॥६६॥
वल्लभ नामे महा नृपती । त्याची भार्या तू निश्चिती । पुढिले जन्मी इंदुमती । कमळा नामे होशील तू ॥६७॥
तुझा पति तुझे उदरी । पुत्र जन्मेल जन्मांतरी । दक्ष या नामे निर्धारी । जनाभीतरी बाहतील ॥६८॥
उपजताच अंधबधिर । वाहेल अंगी पूयरुधिर । दुर्गंधीयुक्त कुष्ठशरीर । ऐसा कुमर प्रसविशी तू ॥६९॥
त्याचे रोगपरिहारासी । वल्लभ करील महायत्नासी । द्वादशवर्षे लोटता ऐसी । मग त्रासासी पावेल तो ॥७०॥
मग पुत्रासमवेत तूते । नगराबाहेर दवडील माते । गाणपत्याचे शरीरवाते । दिव्यदेहाते पावेल तो ॥७१॥
ऐसी ऐकता बल्लाळवाणी । रुदन करी तदा तरुणी । मग गृही जावोनि रमणी । अत्यंत क्लेशे उबगली ॥७२॥
जे शेष आयुष्य उरले । ते दुःख भोगिता दिवस गेले । मग तयासि मरण आले । तो पावला यमलोकी ॥७३॥
इंदुमती तीच कमला । कल्याण तो दक्ष जाहला । भृगु म्हणे सोमकांताला । तूते समजला वृत्तांत की ॥७४॥
विश्वामित्रे इतिहास । सांगता हर्ष जाहला भीमास । विनये पुसे गाधिजास । म्हणे तुम्हास प्रश्न असे ॥७५॥
दक्षे तप कवणे स्थानी । केले हे सांगा मजलागुनी । ऐकून म्हणे विश्वामित्र मुनी । होय श्रवणी सादर नृपा ॥७६॥
नंदनोपम कौंडिण्यवनी । तेथे बैसला तो अनुष्ठानी । तप करिता एकविंशति दिनी । तया लागोनि स्वप्न जाहले ॥७७॥
सिंदूराक्त विशालवारण । अलंकारपताका परिपूर्ण । गंडस्थळी षट्पदगण । शुंडाग्री माळा सुमनाची ॥७८॥
ती घातली आपले कंठी । येऊनि अमात्य प्रजा भेटी । मग धरूनिया करसंपुटी । गजस्कंधी बैसविले ॥७९॥
नेऊनिया भद्रासनी । अभिषेकिले आपणालागुनी । ऐसे त्याणे स्वप्न पाहुनी । जागृत जाहला उषःकाळी ॥८०॥
करूनि नमस्कार मातेसी । स्वप्न निवेदी तियेपासी । ती पावोनिया प्रमोदासी । म्हणे राज्यासी पावसील ॥८१॥
ऐकोनि म्हणे दक्ष सुमती । जरी जाहली राज्यप्राप्ती । प्रजा पाळीन मी निश्चिती । ब्राह्मणा प्रतिपाळीन मी ॥८२॥
कौंडिण्य नगरींचा नृपती । चंद्रसेन नामे तयाप्रती । दैवे पावला निधनगती । कर्मगती करूनिया ॥८३॥
चंद्रसेन राजा मरण पावता । सुलभा नामे त्याची वनिता । ह्रदय पिटोनि करी आकांता । म्हणे मी आता काय करू ॥८४॥
सौभाग्यरवि मावळला । तेणे प्रपंची अंधार पडला । सौख्यनिधी समुद्री बुडाला । कडा कोसळला मजवरी ॥८५॥
हे नाथ हे नाथ सौख्यदानी । जाऊ नको मज टाकोनी । तुज वाचोनि नितंबिनी । अनाथ जनी जाहली की ॥८६॥
उघडोनिया कमलनयन । सप्रेम पाहे माझे वदन । मंदस्मित सुहास्ये करून । माझे मन रंजवी की ॥८७॥
सर्व अपराध घालोनि पोटी । समजवावी प्रिया गोमटी । कंठी घालोनिया मिठी । धरून हनुवटी रिजवी मज ॥८८॥
रुसणे सोडोनि गुणराशी । एक शब्द बोले का मजशी । चरण झाडिते कुरळ केशी । प्रियदासी म्हणोनिया ॥८९॥
नित्य जाता भद्रासनी । मज पुससी क्षणक्षणी । आज का निष्ठुर जाहला मनी । एकही वचन बोला ना ॥९०॥
ऐसी शोके पडली मूर्च्छित । नगरनारी धावल्या बहुत । मग तीते सावरोनि धरित । सावध करीत ललना त्या ॥९१॥
कपाळ पिटोनिया अबळा । भूषणे टाकोनि तोडिल्या माळा । अंग टाकी वेळोवेळा । धरणीतळी लोळतसे ॥९२॥
कठीण करूनिया अंतःकरण । तीते म्हणती वृद्ध ब्राह्मण । जगी शाश्वत आहे कोण । सर्वा मरणविभाग असे ॥९३॥
मिळोनि अमात्य सुह्रज्जन । उत्तरकार्य संपादन । करिते झाले अनुदिन । त्रयोदश दिवसपर्यंत ॥९४॥
खेदे करिती अमात्य विचार । कैसा चालेल राज्यभार । तव तेथे आला ऋषीश्वर । मुद्गलनामा पवित्र जो ॥९५॥
त्याते अमात्ये करूनि नमन । केले पाद्योपचारपूजन । पाहुनी त्याचे खिन्न मन । बोले ऋषि तयाते ॥९६॥
अराजकी राजविधी । निर्मिता जाहला पूर्वी विधी । तो करोनिया या संधी । कार्यसिद्ध करावी ॥९७॥
गजशुंडी द्यावी सुमनमाळा । तो घालील ज्याच्या गळा । तो राजा अवनीतळा । प्रतिपाळा आज्ञा त्याची ॥९८॥
वचन मानवले सर्वांसी । उत्तम शृंगारिले गजासी । पुष्पमाळा कराग्रासी । देऊनि त्यासी प्रार्थिले ॥९९॥
येईल जो का तुझे मानसी । राजा करी आता त्यासी गज चालला वेगेसी । शोधीत नगरासी तेधवा ॥१००॥
तंतवितंतघनसुस्वर । वाद्ये वाजती अपार । नगर धुंडुनिया कुंजर । मग बाहेर निघाला ॥१॥
कौंडण्यवनी प्रवेशला । दक्ष तेथे ध्यानस्थ बैसला । त्याचे कंठी अम्लानमाळा । घालिता झाला गजराज ॥२॥
प्रजा करिती जयजयकार । पुष्पे वर्षती सुरवर । आशीर्वाद देती धरामर । मंत्रोच्चार गर्जती ॥३॥
अमात्य आणि पदाधीपती । येऊनि त्यासी वंदिती । मानोनिया तो भूपती । गजस्कंधी बैसविला ॥४॥
उल्हाटयंत्राचे भडमार । वाद्ये वाजती अपार । रत्नजडित अळंकार । तेणे शरीर शोभले ॥५॥
वस्त्राभरणे टिळामाळा । कंठी रुळे मौक्तिकमेळा । मग शृंगारूनिया कमळा । शिबिकासनी बैसविली ॥६॥
अग्री धावती वेत्रधारी । दिव्यातपत्रे शोभती शिरी । ऐसा मिरवित आणिला नगरी । महोत्सव मांडिला ॥७॥
आणोनिया राजमंदिरी । मग बैसविला भद्रावरी । अभिषेकिला द्विजवरी । मंत्रोच्चारी गर्जती ते ॥८॥
मग फोडोनि भांडार । दाने गौरविले द्विजवर । वस्त्रालंकारे आप्तनर । सेवक समग्र सुखी केले ॥९॥
विनय पाचारोनि मुद्गलमुनी । त्यासि बैसऊनि भद्रासनी । षोडशोपचारे पूजा करोनी । धनदानी गौरविला ॥११०॥
ग्रामरत्ने धेनुदाना । देऊनि तोषविले त्याचे मना । आनंदाश्रू आणोनि नयना । मुखे नाना स्तव करी ॥११॥
पाहूनि त्याचा विनयभाव । संतोष पावला भुदेव । ऋषि म्हणे तू सदैव । सुखवैभव भोगशील ॥१२॥
जे जे इच्छील तुझे मन । ते ते पुरवील गजानन । ऐसे देऊन वरदान । मग स्वस्थान पावला तो ॥१३॥
जनमुखे ऐकोनि वार्ता । वल्लभराजा दक्षपिता । तेथे येऊनिया स्वसुता । ह्रदयी तेणे धरियेले ॥१४॥
कमला पाहूनि निजभर्ता । चरणी ठेविला तिणे माथा । तेणे सप्रेम आलिंगता । वियोगव्यथा विसरली ॥१५॥
वीरसेन रायाची कुमरी । लावण्यराशी रतीचेपरी । गणेश त्याते आज्ञा करी । स्वप्नाभीतरी येऊनिया ॥१६॥
दक्ष राजा प्रिय भक्त माझा । तो जाण जामात तुझा । त्याची करोनि भावे पूजा । कन्या त्यासी अर्पावी ॥१७॥
तेणे मानोनिया उत्तम । करिता जाहला अतिसंभ्रम । कन्यादान विधिक्रम । करोनि दक्ष गौरविला ॥१८॥
तिचे उदरी गुणगंभीर । बृहद्भानु जाहला कुमर । त्यापासून जाहला डुधर । त्यापासून सुलभ जन्मला ॥१९॥
त्यापासोनि पद्माकर । रिपुमर्दी त्याचा कुमर । चित्रसेननामे महाशूर । तव पिता जाणेका ॥२०॥
विश्वामित्र म्हणे भीमकोत्तमा । तुझे पूर्वजाचा ऐसा महिमा । श्रवणमात्रे अधमाधमा । मंगलधामी लाभ घडे ॥२१॥
जयजयाजी संकटहरणा । गुणातीता गजकर्णा । आपली कीर्ती मदंतःकरणा । उपदेशी निर्मल ॥२२॥
विनायकाचा तू नायक । तुझे नावही विनायक । निजदास म्हणोनिया देख । आपणाशी साम्य करी ॥२३॥
स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । सप्तमोध्याय गोड हा ॥२४॥ अध्याय ॥७॥ ओव्या ॥१२४॥