मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
अध्याय २२

श्री गणेश प्रताप - अध्याय २२

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ।

श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजयाजी विश्वंभरा । विकटा रे लंबोदरा । अघहारका सुंदरा । वेदसारा गणपती ॥१॥

तुझी होता कृपा गोमटी । संसारी न होती भक्त कष्टी । मी प्रार्थितो याचसाठी । कृपादृष्टी पाहे मज ॥२॥

तेणे होवोनिया पावन । अंती त्वत्पद पावेन । संसारी विषयसुखालागुन । न गुंतेन गजानना ॥३॥

श्रोते परिसा सावधपणे । सोमकांत भृगूसि म्हणे । मन्मथ जाळिता भोगीभूषणे । रतीने केले मग काय ॥४॥

दग्ध होता पंचशर । रतीसि दुःख जाहले थोर । तेणे तळमळे निरंतर । दुःख अपार करीतसे ॥५॥

मग येवोनिया कैलासी । नमन करोनिया शंकरासी । स्तवने संतोषवोनि त्यासी । मग रुदनासी करीतसे ॥६॥

तिचे अवलोकिता दुःखाशी । कृपा उपजली शंकराशी । शर्व म्हणे तेव्हा रतीशी । व्यर्थ शोकासि करू नको ॥७॥

मनसिज होवोनि तुझा पती । रति पुरवील तूते रती । कृष्णावतारी कृष्णशक्ती । तिचे उदरी जन्मेल पै ॥८॥

संपूर्ण लक्षणे सुलक्षण । होईल रुक्मिणीचा नंदन । तू आता दुःख टाकून । समाधान राखी मन ॥९॥

ऐसा वर पाउनि देख । रती पावली परम सुख । हरपले परम संसारदुःख । महेश्वर प्रसादे ॥१०॥

मग येवोनिया अनंग । सेविता जाहला गौरीरंग । प्रसन्न होवोनि भवभयभंग । गणेशमंत्र उपदेशी तया ॥११॥

मन्मथे करिता अनुष्ठान । प्रसन्न जाहला गजवदन । मदन म्हणे करी अवन । देहदान मज द्यावे ॥१२॥

गणेश म्हणे प्रसन्नमने । आता तुजला नाही उणे । आदिशक्तीचे उदरी जाणे । पूर्णांग तेणे होईल तुला ॥१३॥

प्रद्युम्ननामे रुक्मिणीसुत । कृष्णावतारी होशील विख्यात । तुझे साह्य करील वसंत । रोहिणीकांत त्याचपरी ॥१४॥

ऐसा देऊनिया वर । गुप्त जाहला लंबोदर । महोत्कटनामे मूर्ती सत्वर । तेव्हा मार स्थापीतसे ॥१५॥

ऐसी ऐकून गणेशकथा । व्यास विधीस जाहला पुसता । शेष किमर्थ एकदंता । अर्चोनिया स्थापन करी ॥१६॥

विधि म्हणे सत्यवतीसुता । कैलासी सकळ देव मिळाले तत्वता । त्याणी पूजिले गौरीकांता । यथाविधी भक्ती करोनिया ॥१७॥

त्यामाजी होता शेष । तो म्हणे माझा पराक्रम विशेष । मीच असता परमपुरुष । का इतरांस व्यर्थ पुजू ॥१८॥

ऐसा गर्वे राहाटता । हे कळले गौरीकांता । शेष पुच्छी धरोनि तत्वता । जाहला आपटिता तेधवा ॥१९॥

भोंवडोनिया सभोवते । शेष ताडिता अवनीते । मोक्ष होवोनिया फणाते । सहस्त्रभाग जाहले ॥२०॥

शेषास भवंड दाटली बहुत । मुखे भडभडा वमी शोणित । परमदुःख पावला अनंत । गर्वविख्यात दुष्ट असा ॥२१॥

गर्व न साहे ईश्वराशी । तेणे दुःख दिधले फणींद्राशी । तळमळ लागली शेषाशी । तो नारदासि देखिले ॥२२॥

नयनी दुःखाश्रू आणोनी । शेष सद्गद ह्रदयी होउनी । नमने बोले नम्रवचनी । कृपा करा मुनिवर्या ॥२३॥

नारद म्हणे काय केले । गर्वदोषे विटाळले । ह्रदय शेषा कसे आपले । फळ पावले तसेच पै ॥२४॥

आता न करोनिया दुःख । तुवा अर्चावा गजमुख । तेणे पावशील सदा सुख । सुखी मुखे होतील तुझी ॥२५॥

गणेशमंत्रे उपदेशिला । शेष तपालागी वनी गेला । तेथे दुर्घट तपे तापला । श्रमी जाहला बहुसाल ॥२६॥

पाहोनि त्याचे तपश्रम । प्रसन्न जाहला पुरुषोत्तम । भक्ताभिमानी पुर्णकाम । मनविश्राम गजानन ॥२७॥

कोटि सूर्यतेजागळा । देव पुढे उभा ठाकला । गणेश पाहोनिया डोळा । झाकी बुबुळा शेष तेव्हा ॥२८॥

शेष बोले सद्गद मने । प्रसन्न असावे सौम्यपणे । ऐकता कोटिचंद्रगुणे । शीतळपणे सुरवाडला ॥२९॥

सौम्य पाहोनि सिद्धिबुद्धिरंग । नमने स्तविता जाहला उरग । प्रसन्नमने भवभयभंग । वरदवाणी वदतसे ॥३०॥

सहस्त्राभागे भिन्नमुख । आता होशील प्रसन्नमुख । महीशी रसतुल्य देख । एकावरी धरशील पै ॥३१॥

स्वरूपी न होय विस्मरण । यावच्चंद्र सहस्त्रकिरण । तावत मायीक देहधारण । ज्ञानसंपन्न होशील तू ॥३२॥

माझ्यासह हरिहरांशी । सदा सान्निध्य होईल तुजशी । म्हणोनि वेढला परिकराशी । व्यालोदर म्हणवीतसे ॥३३॥

सहस्त्रशिरी वरदकर । ठेवोनिया लंबोदर । गुप्त जाहला जगदीश्वर । उरगेंद्र संतोषला ॥३४॥

तेणे निर्मोनिया मंदिर । धरणीधरनामे मूर्ति सुंदर । स्थापिता जाहला फणिवर । मूषकध्वज प्रसादे ॥३५॥

गणेशकथा मोक्षदायिणी । तिचे श्रवणे व्यासमुनी । विनये म्हणे विधीलागुनी । पुढे सांग गणेशकथा ॥३६॥

विधी म्हणे सत्यवतीसुता । आता ऐके गजाननकथा । मी पूर्वी सृष्टीकरिता । जाहलो निर्मिता मानसात्मज ॥३७॥

त्यामाजी पुत्रोत्तम । त्याचे जाणे कश्यप नाम । ज्ञानतपविध्युक्तकर्म । याचे वर्म पूर्ण जाणे ॥३८॥

मी पुत्रस्नेहे तयासि जाण । गणेशोपासना देऊन । श्रुत केले मर्मविधान । केले अनुष्ठान तयाने ॥३९॥

त्याची पाहोनि दृढभक्ती । प्रसन्न जाहला भक्तपती । साकारली दिव्यमुर्ती । त्याची स्फूर्ती दुर्लभ पै ॥४०॥

कोटिसूर्यतेजे लखलखित । कश्यप पाहता एकदंत । आनंदे लोटांगण घालित । स्वभाल ठेवित तच्चरणी ॥४१॥

तयासि बोले तारकेश भाल । तुझे ऐकोनिया स्तुति बोल । येतात सुखाचे माते डोल । इष्ट बोल काय तुझे ॥४२॥

ऐकोनि त्याची प्रेमवाणी । कश्यप मस्तक ठेवी चरणी । स्मृति असावी तवचरणी । सदासर्वदा विघ्नेशा ॥४३॥

आणीक मागणे जिवेभावे । माझा पुत्र असे तू म्हणवावे । सृष्टिकर्तृत्वसामर्थ्य द्यावे । देवाधिदेवा गणराया ॥४४॥

तथास्तु म्हणोनि गणराज । गुप्त तो जाहला सहज । गृही आला धातात्मज । महोत्साहे करोनिया ॥४५॥

दक्षकन्या त्रयोदश वनिता । त्यांसि कश्यपे क्रीडा करिता । सृष्टि विस्तारली तत्वता । अदिती वनिता श्रेष्ठ पै ॥४६॥

यथाविधी सेवा पतीची । रतिकाळी इच्छा रतीची । पुत्रत्वे केली धन्य तिची । कुशी साची सत्वगुणे ॥४७॥

ईश्वराच्या सत्वांश गुणे । पुत्र जाहले देवपणे । अकाली पतीसी रति मागणे । दितीसि तेणे दैत्यसुत ॥४८॥

दैत्य यक्ष पशु गंधर्व । कीट पक्षी उरग दानव । पर्वत शैलसृष्टी सर्व । जाहली अभिन्नव तेधवा ॥४९॥

आत्मसंभव सृष्टी पाहून । आनंदे कोंदला ब्रह्मनंदन । मग स्वपुत्राते पाचारुन । त्यालागोन सांगे हित ॥५०॥

तुम्ही उपासावा गजकर्ण । तेणे तुमचे होईल कल्याण । मग ऋणारी चक्र शोधुन । त्यालागून मंत्र सांगे ॥५१॥

पावता मंत्राचा उपदेश । सर्व गेले तेव्हा तपास । दिव्य वर्ष करिता सायास । आली करुणा देवास पै ॥५२॥

साकारल्या दिव्य मूर्ती । ध्याती जैसा जैसा चित्ती । त्या त्या स्वरूपे जगत्पती । सर्वांपुढे उभा असे ॥५३॥

कोटिसूर्य तेजागळा । नानारूपे गणेश डोळा । पाहता संतोषोनि ते वेळा । चरणकमळा झोंबती ते ॥५४॥

सर्व जोडोनिया कर । स्तुति करिती सादर । जयजय तू सर्वेश्वर । लीला अपार न कळे तुझी ॥५५॥

तुझे पासोनि त्रिगुणाकार । सर्व जाहले चराचर । वेद न पावती तुझा पार । सुखकर भक्तांसि तू ॥५६॥

देवा तुझे प्रसादेकरून । सिद्धि तिष्ठती पुढे येऊन । धनधान्य सुख सदन । दासनंदन पावती ॥५७॥

सकल पुरती वांच्छितार्थ । जो सेवी त्वन्नामतीर्थ । त्याइतर साधने कशासि व्यर्थ । सकलस्वार्थ त्वन्नाम ॥५८॥

तू सच्चिदानंद परमात्मा । हरिहरादि स्मरती त्वन्नामा । परमपुरुषा मंगलधामा । पूर्णकामा सर्वेशा ॥५९॥

जयजयाजी संकटहरणा । सिंदूरांतका सिंदूर भूषणा । एकदंता बालार्कवर्णा । करी करुणा आम्हावरी ॥६०॥

धन्य वाटे आज वासर । धन्य आमचे मातापितर । नेत्र जाहले धन्यतर । तुज लंबोदर पाहता ॥६१॥

ऐसा ऐकता स्तुतिवाद । संतोषोनि बोले आनंदकंद । तुमचे पुरती वांछित वृंद । आता आनंद भोगाल पै ॥६२॥

ऐसे बोलोन जगत्पती । अंतर्धानाची धरी गती । मग ते आनंदचिती चित्ती । देवळे बांधिती रत्नमय ॥६३॥

अनेक नामे ठेऊनि मुर्ती । अनेकालयी ते स्थापिती । त्याते आता सांगू किती । त्यात संख्या द्वादशांची ॥६४॥

श्लोक ॥ सुमुखश्चैकदंतश्चकपिलोगजकर्णकः ॥ लंबोदरश्चविकटोविघ्ननाशोगणाधिपः ॥ धूम्रकेतुर्गणाध्यक्षोभालचंद्रोगजाननः ॥१॥

या द्वादशनामे करिता जप । कोटि कन्यादान पुण्य अमुप । कोटि यज्ञव्रत तीर्थतप । तया आपाप पावती ॥६५॥

सुवर्णभार सहस्त्रदान । कृच्छ्रतप्त कृच्छ्रव्रताचरण । त्यांची पुण्ये तयालागुन । सहज घडती राजेंद्रा ॥६६॥

जो भावे जपे बारा नाम । तो धन्य मानव उत्तम । त्याचे दर्शने करूनि अधम । राजसत्तम उद्धरती ॥६७॥

द्वादश नामाचा जो जप करी । त्याचे संकटा होय बोहरी । मुक्ती सुलभ त्यासि चारी । त्याते विघ्नारी प्रसन्न सदा ॥६८॥

विद्यारंभी संकटी विवाहकरिता । जो या नामाते होय स्मरता । त्याची विघ्नसंकटे तत्वता । सत्यवतीसुता नाश पावती ॥६९॥

सर्वकार्यारंभी जाता येता । स्मरे नामे तेथे येऊनि स्वता । निर्विघ्न करी देव तत्वता । संकटव्यथा नाशी त्याची ॥७०॥

सूत म्हणे शौनकालागुन । व्यासास सांगे कमलासन । तेचि सोमकांतास भावे करून । भृगुऋषीने ऐकविले ॥७१॥

तेचि मी यथामती । कथन केले तुम्हाप्रती । हे खंड जे पठणश्रवण करिती । त्यांसि गणपती तारी सदा ॥७२॥

पुत्रपौत्र धनसंपदा । पावोनि भोगोनि भोग सदा । अंती पावती गणेशपदा । पुण्याची मर्यादा न बोलवे ॥७३॥

गणेशकथा ही मंदाकिनी । येथे सुस्नात व्हावे जनी । त्यासि तारील कैवल्यदानी । भक्ताभिमानी निश्चये ॥७४॥

हे उपासनाखंड रसभरित । सकल कामनादायक निश्चित । याते सदा श्रवण करोत । गणेशभक्त भावीक भले ॥७५॥

जयजयाजी आनंदकंदा । विनायक किंकरवरदा । विनयी माझे चित्त सदा । त्वत्पदासक्त असो की ॥७६॥

सकल अपराध करोनि क्षमा । मज तारावे मंगलधामा । अनंत कीर्ते अनंतनामा । भक्ताभिरामा जगत्पते ॥७७॥

मी म्हणवितो तुझा दास । आता आधी राहील जीवा । तरी तुझे महत्वास । कोण वर्णील भावबळे ॥७८॥

म्हणोनि आता आळस टाकुन । माझे करी सदा अवन । तू तर निजभक्ता जीवन । परमपावन जगत्पिता ॥७९॥

माझी माता तूचि पिता । गणगोत भगिनीभ्राता । तूचि यजमान अन्नदाता । निजपदी सुखदाता तू ॥८०॥

अनंत जन्मीचे पुण्ययोगे । कथा वर्णविसी या प्रसंगे । तो काम पुरवी आता निजांगे । मग हा भंगेल कामचय ॥८१॥

होता आशा परिपूर्ण । ह्रदयी बाणशील तूच जाण । तेणे माझे परम कल्याण । इहपरत्र होईल की ॥८२॥

हे करणे तुझे आधीन । म्हणोनि वारंवार तुजलागून । प्रार्थितो देवा होऊनि दीन । कृपा करोन आणी मना ॥८३॥

माझी हरोनि ह्रदयभ्रांती । आनंदमय वसे चित्ती । अखंड त्वत्कथामृतपानरती । सदा मजप्रति पाववी ॥८४॥

येथे भोगवोनि विहितभोग । वाणीने करवोनि कीर्तनरंग । निजपदी स्थापी सिद्धिबुद्धिरंग । येव्हडेच मागणे तुजपासी ॥८५॥

तू उदारामाजी अग्रसर । तुझे दशेसि नाही पार । निजभक्तासि तारणार । म्हणोनि भार घालितो मी ॥८६॥

माझे अन्याय करोनि क्षमा । मज तार तार रे पुरुषोत्तमा । हे भक्तकामकल्पद्रुमा । संकटहरणनामा तूच पै ॥८७॥

म्हणोनि तूते स्मरतो आता । तरी हरोन संकटे तत्वता । पूर्ण मनोरथ तूचि कर्ता । वेदसमर्था बोलती है ॥८८॥

जयजयाजी गजानना । अनंतवेषा सनातना । पूर्णानंदा गौरीनंदना । भक्तजना तारक तू ॥८९॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । द्वाविंशोध्याय गोड हा ॥९०॥

उपासनाखंड समाप्तम ॥ अध्याय २२ ॥ ओव्या ९० ॥

अध्याय बाविसावा समाप्त

॥ इति श्रीगणेशपुराणे उपासनाखंड समाप्तम ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP