मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय १

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय १

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजयाजी मंगलमूर्ती । सरस्वती ही तुझी स्फुर्ती । सद्‌गुरु तूचि महामती । जन्मोद्धारा कारणे ॥१॥

तूझे करितांचि स्मरण । होय संसारा सारपण । तेणे चुके जन्ममरण । यदर्थ शरण तुजलागी ॥२॥

कर्ताकरविता तूचि एक । जगी नसे दुजा नायक । निजभक्ता दाविशी कौतुक । लीला अपार करोनिया ॥३॥

आरंभिले तुवा जे का । सिद्धी नेइजे भक्तपालका । कर्तृत्वबाधा विनायका । किमपी स्पर्श न द्यावी ॥४॥

श्रोते ऐका सावधान । भगवत्कथानुसंधान । श्रवणमात्रे भवबंधन । तुटोन मुक्त सहजची ॥५॥

शौनक म्हणे गा पौराणिका । नरांतक आणि देवांतका । कोणी वधिले धर्महिंसका । प्रजापीडका असुराते ॥६॥

ज्याचे प्रभावे सकल देव । पावोनिया पराभव । दानव बाधा हतवैभव । दीनवदने हिंडती ॥७॥

ऐसिया असुरांचा नाश । कोण्या उपाये जगदीश । करिता जाहला परेश । भक्तपाशच्छेदक जो ॥८॥

ऐकोन वक्ता म्हणे शौनक । धन्य तूचि श्रोता एक । तव प्रश्न अमोलिक । ह्रदयी सुख हेलावे ॥९॥

ऐसाच पूर्वी पराशरसुते । प्रश्न केला चतुर्मुखाते । तेणे कथिले चरित्राते । तेचि तूते सांगतो ॥१०॥

धाता म्हणे सत्यवतीसुता । ऐके पुण्यपरायण चरिता । ज्याचिया श्रवणे धन्यता । प्राप्त जगता होतसे ॥११॥

जो का मन्मानसपुत्र । नामे तो कश्यप सत्पात्र । स्वधर्माचरणे पवित्र । अगाध पुत्र तयाते ॥१२॥

जो जितेंद्रिय तपस्वी । तपोतेजे सुतेजस्वी । अतिकरुणे ते वसवी । ह्रदयकमळी दीनाच्या ॥१३॥

सर्वशास्त्रार्थ तत्वज्ञ । त्रिकालज्ञाने अतिप्राज्ञ । सगुणगुणे गुणज्ञ । जो का मान्य त्रिलोकी ॥१४॥

जो भावे भगवत्परायण । ज्याते समान मृत्तिकासुवर्ण । चित्ती नसे वर्णावर्ण । देहविसरण देहपणे ॥१५॥

परोपकारी अतिअग्रणी । ज्ञानियांमाजी मुगुटमणी । स्मरणे रंगली सदा वाणी । सगुणवाणी वदनाने ॥१६॥

ऐसा तो मुनिराट् त्रिजगती । वर्तत असता सहजस्थिती । ज्याची ज्येष्ठपत्‍नी अदिती । पूर्ण सती पवित्रा ॥१७॥

सख्या बहिणी तेराजणी । दक्षकन्या दाक्षायणी । कश्यपे वरिल्या सगुणगुणी । त्यामाजी अग्रणी अदिती प्रिया ॥१८॥

रूपे सौंदर्यतनू गोरटी । मुखी लाजती चंद्रकोटी । स्वारुणरंगे बिंबोष्ठी । लाजोनि देठी सूटले ॥१९॥

कुटिलालका कुरंगनयना । गजगंडकुचा गजगमना । जीचे तुळणी ललामललना । त्रिभुवनामाजी नसे पै ॥२०॥

गुणाथिली गुणनिधान । वर्णिता भागला सहस्त्रवदन । जीचे चातुर्य अवलोकुन । विस्मित मन शारदेचे ॥२१॥

पातिव्रत्यतेजे तेजागळी । कृपाकटाक्षे विश्वपाळी । कोपता करील तत्काळी । विश्व होळी ऋषिवर्या ॥२२॥

गुणाभ्यास कल्पोनि सेवेशी । अष्टनायका जाहल्या दासी । पतिव्रता सती तेजोराशी । सुमने पतीशी संलग्न ॥२३॥

सापत्‍नभावे रहितसदा । इंदिरा जेवी मुकुंदपदा । सेवी ऋषीचे पदारविंदा । प्रपंच धंदा त्यागुनी ॥२४॥

ऐसी देवमाता अदिती । अवलंबोन संसाररीती । वर्तत असता तयेचे चित्ती । चिंतास्थिती वाढली ॥२५॥

दैत्यी पराभवले सर्व । हतस्थानभाग्यदेव । पुत्र हे क्लेशभागी सदैव । पाहोनि चिंता करी मनी ॥२६॥

बैसोनिया पवित्रासनी । झाकोनिया नेत्र दोन्ही । पतीचे पदसरोज आणोनि ध्यानी । तद्दर्शनी आर्त असे ॥२७॥

ध्यानयोगे आकळिला । योगिया पुढे साकारला । नारायण येतसा आला । धातात्मज कश्यप ॥२८॥

पाहोनिया मूर्ती गोमटी । हर्षे वोसंडली पोटी । चरणी घालोनिया मिठी । चरणा क्षाळी नेत्रोदके ॥२९॥

कश्यपे देता आलिंगन । हर्षभरित जाहले मन । कोमलहस्ते हस्त धरून । निजमंचकी स्थापिला ॥३०॥

उदयाद्रीवरी देखोनि तरणी । हर्षे विकासे कमळणी । तैसी स्मितानना रमणी । कश्यपाग्री सन्मुख ॥३१॥

सलज्ज अवलोकिता वदन । मग ती बोले मधुरवचन । म्हणे धन्यधन्य आजिचा दिन । साफल्य वाटे दर्शने ॥३२॥

ज्या का साध्वी पतिव्रता । त्यांची गती एक भर्ता । समुद्रावाचोनिया सरिता । कैसा थारा पावतील ॥३३॥

की मत्स्यिणीलागी जीवनकळा । जीवन आहे तसी अबळा । चंद्रदर्शने चकोरमेळा । सुख सोहाळा भोगित ॥३४॥

जोडोनिया कर दोन्ही । म्हणे विनंती करणे आहे मनी । अभय होता प्रसन्नवदनी । आर्त निवेदीन ह्रदयींचे ॥३५॥

चातुर्य भाषणाची नवलपरी । ऐकोनि मुनीचे अंतरी । प्रीती दुणावता सुंदरी । अंकावरी घे तिला ॥३६॥

प्रेमे देऊनि आलिंगन । ऋषि म्हणे दक्षजे लागून । तुझेन मी सुखसंपन्न । आहे प्रसन्न तुजलागी ॥३७॥

जे तुझे चित्ती वर्ततसे । तेच कथी का राजसे । आर्त पुरवित मी डोळसे । संकोच मानसे त्यजावा ॥३८॥

अदिती वदे कोकिलरवे । स्वामी तुमचे न आगळी दैवे । मदार्त पुरविता जीवेभावे । तुजवाचोनि कोण असे ॥३९॥

ज्याचेनि अंशे इंद्रादि देव । माझे उदरी पुत्रत्वभाव । पावले तेने राणीव । जगामाजी विस्तारली ॥४०॥

परि न वाटे सभाग्यता । वंशी नाही कृतकृत्यता । जरी चिदानंद पावे पुत्रता । तरी धन्यता जगी माझी ॥४१॥

परमात्मा आनंदघन । स्वये होल माझा नंदन । तरी पुत्रवतीमाजी मान । अग्रभागी पावेन मी ॥४२॥

ज्याचेनि जन्मे साधुदेव । ह्रदयी पावतील स्वस्थभाव । पुत्रसोहळा वैभव । पूर्णपणे पावेन मी ॥४३॥

अदितीचे मधुरवचन । ऐकोनि तोषे ऋषीचे मन । म्हणे धन्य तू अंगना रत्न । गुणनिधान गुणज्ञे ॥४४॥

प्रिये तुझे रसाळ बोले । ह्रदय माझे सुखावले । जैसे तृषार्ता हाती आले । गांगजळ अवचिता ॥४५॥

दुर्भिक्ष काळी क्षुधातुराशी । अमृतोपम भोजन त्यासी । आदरे मिळता मानसी । संतोषासी काय उणे ॥४६॥

कनकलतिके नितंबिनी । हेच होते माझे मनी । तेच तुवा अनुवादुनी । आनंद जीवनी बुडविले ॥४७॥

असेल महत्पुण्य गाठी । तरीच घडोनि येईल गोष्टी । ज्याचे एकदर्शनासाठी । तपःकोटि पुरेना ॥४८॥

ज्याचिया दर्शनाकारण । योगयाग पंचाग्निसाधन । सत्यव्रत धर्माचरण । तत्परायण करिताती ॥४९॥

जो का निर्विकल्प निर्गुण । निरीच्छ निरीह जाण । जे आदिमायेचे कारण । चराचर रहित जो ॥५०॥

वर्णिता भागले चारी वेद । खुंटले जेथे शास्त्रानुवाद । ओतप्रेत ब्रह्मानंद । परिपूर्ण भरला असे ॥५१॥

मायाविषय मायाधीश । मायातीत जो जगदीश । करोनि अकर्ता परेश । अविद्यानाश ज्याचेनी ॥५२॥

अनुष्ठानाविना राजसे । ते ब्रह्म साकारले कैसे । जे स्थूळ दृष्टीने न दिसे । ह्रदयी विलसे भाविकांचे ॥५३॥

जो आदिमायेचा निजभर्ता । अनंत ब्रह्मांडांचा कर्ता । जरी भावबळे अनुसरता । तरे चहाता येईल ॥५४॥

अदिती म्हणे प्राणेश्वरा । विधानेसि मंत्रोद्धारा । सांगोनिया स्थीर करा । निज दारा सत्पात्र ॥५५॥

पाहोनि तिचा सद्भाव । संतोषला भूदेव । विनायक हा मंत्रराव । कर्णरंध्रे परिसवी ॥५६॥

शिरी पावता वरदपाणी । आनंदे कोंदली रमणी । मस्तक ठेवोनि पतिचरणी । पूजा करी प्रीतीने ॥५७॥

करोनिया मंगलस्नान । पवित्रवस्त्र परिधान । घेवोनि पतीचे आज्ञावचन । तपोवना पावली ॥५८॥

द्रुमलताकीर्ण पर्वती । गुहा पाहोनिया निगुती । करोनि विनायकाग्रवृत्ती । दृढासन घातले ॥५९॥

शुद्धभावाचे आचमन । करोनिया न्यासध्यान । आरंभोनि पुरश्चरण । मने मन आकळी ॥६०॥

वृत्ती करोनि तदाकार । विनायक ध्यानी तत्पर । होवोनि मुखे मंत्रोच्चार । अति सादर करीतसे ॥६१॥

विनायकध्यान परायण । निराहार वायुभक्षण । ऐसी शतवर्षे जाण । घोर तपे तपली ॥६२॥

पाहोनि तिचे उग्रतप । वनदेवता ह्रदयी कंप । संचरला तेणे ताप । पाहोनि विस्मय करिताती ॥६३॥

अहो ही असोनि अबला । तपे विश्वगोल तापविला । अद्यापि त्या विनायकाला । साकडे का उपजेना ॥६४॥

काय उग्र तपाची गरिमा । व्याघ्रे सांडिले हिंसाधर्मा । गजकेसरीचा स्नेहमहिमा । वनामाजी विस्तारला ॥६५॥

सर्पगरुड एक्याठायी । क्रीडताति निर्वैर देही । मूषकबिडाल सर्वदाही । स्नेहभावे राहिले ॥६६॥

ऐसी लोटलिया वर्षशत । संकटे द्रवला अनंत । पुरवावया तिचा हेत । ब्रह्मसगुण साकारले ॥६७॥

जैसे धरिले तिणे ध्यान । तैसा नटला रूपसगुण । सहस्त्रकोटी सूर्यदर्शन । एकाएकी प्रगटला ॥६८॥

भक्तानुकंपी विनायक । कंठी मुक्तावलीजडितपदक । ह्रदयी शोभती अमोलिक । भाली टिळक कस्तुरीचा ॥६९॥

चरणी झणात्कारती नुपुर । कासे विराजे रक्तांबर । सुवर्ण कटिसूत्र सुंदर । वरफणींद्र नाभिदेशी ॥७०॥

उदर विराजे दोंदिल । कोमल कांती वक्ष विशाल । एकदंत आयत भाल । कुंकुमरंगे चर्चिले ॥७१॥

लावण्ये शोभे वारणानन । शूर्पाकृती विस्तीर्ण कान । कुंडले तळपती दैदीप्यमान । वरी मंडन पन्नगांचे ॥७२॥

किरीटकुंडलांची दिव्यप्रभा । गंडस्थळी षट्‌पदशोभा । कोमलकेशे रंग नभा । वर्षाकाळी संचरला ॥७३॥

मुगुटी दूर्वांकुरावतंस । उत्तरीय शोभे चारुवास । स्वरूप पाहता मदनास । खेद चित्ती वाढला ॥७४॥

स्वरूपी लाजोनिया मदन । करी देहाचे विसर्जन । ऐसा महाराज गजानन । अदितीने पाहिला ॥७५॥

अष्टबाहू आयुधे हाती । परशांकुश विराजती । सिद्धिबुद्धी सुंदरयुवती । चामरे ढाळिती दोहीभागी ॥७६॥

जो चिदानंद चिच्छक्ती । तेजे चंद्रसूर्य झाकूळती । ऐसी असंभाव्य मूर्ती । पाहता सती घाबरली ॥७७॥

नेत्री ठेवोनि दोन्ही पाणी । विव्हळ जाहली अंतःकरणी । मूर्छित पडली धरणी । कापे तरुणी थरथरा ॥७८॥

ह्रदयींचे विराले दृढध्यान । जप राहून पडले मौन । अग्रभागी उभे निधान । तपोधन तयेचे ॥७९॥

मनी म्हणे हे अत्यद्भुत । काय प्रगटले महद्भूत । किंवा पुरवावया माझा आर्त । दीननाथ प्रगटला ॥८०॥

भये घाबरी ते सुंदरी । पाहोनि करुणेचा सागर । दीनवत्सल तो सत्वर । ना भी ना भी म्हणतसे ॥८१॥

विनायक म्हणे वो कमलेक्षणे । अहोरात्र ध्याशी अंतःकरणे । तोच मी हे मनी जाणे । भय टाकणे अंतरीचे ॥८२॥

ऐसे बोलोनि दिव्यनेत्र । देता जाहला गजवक्र । ऐकता आनंदले कलत्र । प्रियपात्र कश्यपाचे ॥८३॥

प्रसन्न करोनि अंतःकरण । चरणी घालोनि लोटांगण । ब्रह्मानंदे भरली पूर्ण । त्राही त्राही म्हणतसे ॥८४॥

विनायक म्हणे गजगामिनी । तुझ्या घोर तपाते पाहुनी । लगबग आलो धावुनी । भक्ती पाहोनि संतोषलो ॥८५॥

जो का तुझे मनी इष्ट । वर मागे वरिष्ठ । नासेल साधूचे अरिष्ट । आता कष्ट करू नको ॥८६॥

ऐकोनि आनंदली वामा । मग म्हणे गा तेजसोत्तमा । सौम्यरूपे मंगलधामा । मनविश्रामा वर देयी ॥८७॥

व्यासास म्हणे कमलासन । भावे तोषला गजानन । सौम्यरुदे वरदान । समर्पणी उभा असे ॥८८॥

अदिती म्हणे देवाधिदेवा । पावोनिया मत्पुत्रभावा । माझे मनी वाढवावा । संतोष ठेवा बहुसाल ॥८९॥

जरी तू माझा पुत्र होशी । कृतकृत्यता संसाराशी । तेणेच माझे जन्माशी । पुनरावृत्ती चुकतील ॥९०॥

घडेल साधूचे रक्षण । होईल दुष्टांचे निर्दाळण । जगाचे कर्णी कीर्तिभूषण । आवडी लेण लेववी ॥९१॥

तथास्तु म्हणोनि वरदहस्त । अदिति मस्तकी ठेवित । तिणे करिता दंडवत । अंतर्धान पावला ॥९२॥

श्रोते म्हणती वक्त्याप्रती । देवांतक नरांतकांची कैशी स्थिती । आणि त्यांची उत्पत्ती । कवणापासोन ती कथा ॥९३॥

ऐकोनि श्रोतयांचा प्रश्न । वक्ता करीतसे कथन । ज्याचे जन्मकर्म गहन । ब्रह्मनंदन दैत्य ते ॥९४॥

अंगदेशीय नगरी जाण । रौद्रकेतु नामे ब्राह्मण । सर्व विद्या परिपूर्ण । साधू द्विजगण सेवीत जो ॥९५॥

अग्निहोत्री धेनुपूजक । वेदशास्त्रार्थ येरू एक । जाणता ज्ञानी अलोलिक । पुण्यश्लोक द्विजवर ॥९६॥

शारदा नामे त्याची ललना । परम साध्वी कमललोचना । सिंहकटी चंद्रवदना । गुणसदना कलावती ॥९७॥

देवांगनादि सकल युवती । जीते पाहोनिया लाजती । जीचे मुख पाहता करी खंती । तारापती सदैव ॥९८॥

सभाग्य रौद्रकेतूची अबला । दोहदवती होता ऋषीला । परमानंद तेव्हा जाहला । आलिंगी तिला ऋषिवर्य ॥९९॥

डोहाळे तिचे नानापरी । नवमास ऋषि पूर्ण करी । तव प्रसूत जाहली सुंदरी । पुत्रद्वय प्रसवली ॥१००॥

ऐकता ऋषि करूनि स्नान । येऊनि पाहे पुत्रालागुन । आजानुबाहू दैदीप्यमान । पाहता आनंद घन जाहला ॥१॥

म्हणे धन्य माझे जन्मांतर । म्हणोन ऐसे जाहले कुमर । आनंदे नाचोनि निर्भर । समारंभ करीतसे ॥२॥

वेदविधिज्ञ घेऊनि मुनिगण । स्वस्तिवाचन करी पूर्ण । अभ्युदयीक श्राद्ध जाण । करूनि ब्राह्मण तेधवा ॥३॥

जातकर्म संस्कार करून । शर्करा वाटी आनंदान । द्वारी ध्वज उभवून । तोरणानी शोभवी ॥४॥

मंगलवाद्यांचेनि घोषे । मंडप नांदला विशेषे । मग ज्योतिर्विद बलाऊनि हर्षे । नमन त्यांसि करोनिया ॥५॥

म्हणे यांचे भविष्य करून । काय ठेवावे नामाभिधान । हे सांगावे विचारुन । तेच ठेवणे नाम याचे ॥६॥

ज्योतिर्विदानी करून गणित । म्हणती एक देवांतक निश्चित । दुसरा नरांतक विख्यात । नामे येती असी यांची ॥७॥

होतील मोठे पराक्रमी । सदा देवास करितील श्रमी । ऐसे ऐकता ब्राह्मण नमी । म्हणे स्वामी धन्यधन्य ॥८॥

द्वादश दिवसी नामकरण । करून दाने देत ब्राह्मण । देवांतक नरांतक नाम पूर्ण । ठेविता जाहला रौद्रकेतू ॥९॥

मग करी ब्राह्मणभोजन । आप्तसुह्रदग्रामस्थजन । समस्तसंगे घेऊन । करी कौतुकाने भोजनविधी ॥११०॥

वस्त्राभरणे विडेमाळा । हर्षे वाटी करी सोहळा । कौतुके वाढवी दोन्ही बाळा । रौद्रकेतू अबळा तेधवा ॥११॥

वायुसंगे अग्निप्रबळ । तैसे वृद्धीस पावले बाळ । मौजीबंधन संस्कार तत्काळ । करिता जाहला आनंदे ॥१२॥

केले विद्याप्रवीण कुमर । प्रबुद्ध पाहता अतीत । रौद्रकेतूस आनंद थोर । प्रेमभरे खेळवी ॥१३॥

तव तेथे पातला नारदमुनी । त्यासि रौद्रकेतू सादर नमी । नारद म्हणे तयालागुनी । धन्य जनी तू एक ॥१४॥

पूर्वपुण्यसुकृतबळे । तुज लाधली ही दोन बाळे । ऐकोनि रौद्रकेतू ते वेळे । पदकमळे धरीतसे ॥१५॥

म्हणे कृपा करोनि मुनिवर्य । सर्वदा विजयी माझे तनय । होतील ऐसा उपाय । ऋषिराय कथी यांशी ॥१६॥

ऐकता रौद्रकेतूचे वचन । नारद होऊनि प्रसन्नमन । दोघांजणाशी अंकी घेऊन । मूर्ध्न्यवघ्राण करीतसे ॥१७॥

शिवषडक्षर महाविद्या । त्यासि उपदेशी जीसद्या । प्रसन्न करी विश्वाद्या । मुनिगण वंद्या हराशी ॥१८॥

मस्तकी अर्पोनि वरदकर । मुनी तेथोनि गेला सत्वर । तपोवनी ते कुमर । तपालागि गेले पै ॥१९॥

निबिड अरण्य गिरि गव्हरी । वायुभक्षण निराहारी । दाहासहस्त्र वर्षे वरी । देववैरी तापले ॥१२०॥

त्यांचे उग्र तपाचे महिमान । सूर्य जाहला कलाहीन । निर्वैरी प्राणी ऐसे वन । त्यांचे तपाने करियेले ॥२१॥

त्यांच्या तपाचे जाणोनि कष्ट । ह्रदयी कळवळिला शिपिविष्ट । नंदीवरी बैसोनि देववरिष्ट । धावे चटपट अंबेसह ॥२२॥

नेऊनि त्यांचे निकटी । वर मागा म्हणे धूर्जटी । ऐसे ऐकता कर्णपुटी । पूर्ण तुष्टी पावले ॥२३॥

दोघे उघडोनिया नयन । पाहते जाहले शिवप्रसन्न । कोटिसूर्य दैदीप्यमान । सुहास्यवदन परमात्मा ॥२४॥

भाळी मिरवे चंद्रकोर । गंगा विलसे मस्तकावर । नागकुंडल नागेंद्रहार । उमावर जगत्पती ॥२५॥

ऐसा पाहोनि गिरिजापती । देवांतक नरांतक हात जोडिती । वारंवार पदी घालिती । लोटांगणे भावबळे ॥२६॥

म्हणती धन्यधन्य आमुचे पितर । म्हणोन प्रसन्न तू अंबावर । दर्शने जाहले जन्म साचार । अतीतर भूतपते ॥२७॥

ऐसी नानाविध स्तुती । ऐकोनि वदे उमापती । तुमची पाहोनि प्रेमळ भक्ती । संतोष चित्ती जाहला ॥२८॥

आता मागा इष्ट वर । ऐकता ऐसे उत्तर । विनये मागती ब्रह्मकुमर । ऐके सादर पशुपते ॥२९॥

दिवसरात्रीमाजी जाण । जय असावा परिपूर्ण । सुरासुर नर जीवापासून । कदा निधन नसावे ॥१३०॥

त्रिलोकीचा राज्यभार । वागवीत हे आमचे कर । तथास्तु म्हणोनिया हर । गुप्त जाहला अंबेसह ॥३१॥

मग ते येवोनिया सदनी । पितरा नमिती आनंदोनी । जाहला प्रसाद निवेदनी । तत्पर जाहले तेधवा ॥३२॥

मग पाहोनिया सुमुहूर्त । नरांतक देवांतक हर्षभरित । स्वधर्म संपादिती त्वरित । उमाकांत आराधिती ॥३३॥

दाने देऊनिया अपार । ब्राह्मणभोजने करिती तर । वडिल वृद्ध नमोनि सत्वर । घेती बहुत आशीर्वचने ॥३४॥

ऐसा करोनि उत्साह थोर । मग दोघे करिती विचार । सिद्ध करोनिया दळभार । आता जिंकू त्रैलोक्य हे ॥३५॥

देवांतक म्हणे नरांतकाते । तुवा जिंकावे भूमंडलाते । आणि सर्व पाताळाते । जिंकोनि जयाते पावणे ॥३६॥

मी स्वर्गादि सर्व लोक । जिंकिता हा देवांतक । ऐसा विचार करोनिया निःशंक । देवांतक स्वर्गी निघे ॥३७॥

युद्धी जिंकून इंद्रपद । घेऊनि पावला आनंद । रानोरानी हिंडती विबुध । महाखेद पावोनिया ॥३८॥

देवांतकाचेनि भये जाण । वैकुंठ त्यागोनि नारायण । क्षीरसागरी शयन । कमलासन कमळी वसे ॥३९॥

कैलास त्यागोनिया पशुपती । आणिक स्थळी करी वस्ती । आता इतरांचा पाड किती । त्रैलोक्यपती जाहले ॥१४०॥

सर्व देवांचे पदावर । तेथे स्थापिले तेव्हा असुर । त्रैलोक्याचा राज्यभार । चालविती निजबळे ॥४१॥

दैत्यांचा उत्कर्ष जाहला । अधर्म भूमीवरी मातला । सद्धर्म दिगंतरी गेला । तेणे इला तळमळे ॥४२॥

मारिती धेनूब्राह्मण । परकन्या दारा हरण । करिते जाहले असुरगण । नानाभूषण वस्तू तशा ॥४३॥

जाहल्या दुष्कृतांच्या राशी । भार न साहे मेदिनीसी । उलथू पाहे अहर्निशी । दुःख मानसी करीतसे ॥४४॥

भृगू म्हणे गा सोमकांता । ऐके अवतार कृत्यकथा । दैत्यभारे अनंता । ह्रदयी व्यथा पावली ॥४५॥

पृथ्वी होवोनि मूर्तिमंत । सत्यलोकी निघे त्वरित । पाहोनिया विष्णुसुत । करी दंडवत दीनमुखे ॥४६॥

जोडोनिया पाणिद्वय । नेत्री आणोनिया दुःखतोय । धरोनि विरंचीचे पाय । उकसाबुकसा स्फुंदतसे ॥४७॥

पाहोनि तिची अत्यंतग्लानी । कृपेने द्रवला पद्मयोनी । मेदिनीते आश्वासुनी । वर्तमान श्रवण करी ॥४८॥

अचला म्हणे विबुधश्रेष्ठा । ऐके माझे भारकष्टा । थारा नसे धर्मवरिष्टा । प्रजा भ्रष्ट जाहल्या पै ॥४९॥

उन्मत्त जाहले दैत्य दोनी । सदाचार त्याणी उच्छेदुनी । यज्ञादि धर्म विध्वंसुनी । नितंबिनी भष्टविल्या ॥१५०॥

मांडिले गोब्राह्मणकंदन । स्वधर्मे भ्रष्टविले ब्राह्मण । राहिले भगवध्ध्यान भजन । आकांत जाहला भूतळी ॥५१॥

सुरऋषी जाहले स्थानभ्रष्ट । साधू पावती सदा कष्ट । दुराचारी असुर नष्ट । कैसे तुवा निर्मिले ॥५२॥

ब्राह्मण केले कर्महीन । नाहीच जाहले वेदाध्ययन । तेणे मी जाहले मलिन । पाप अद्भुत संचले ॥५३॥

मला न सोसे दैत्यबाधा । जरी न करिसी त्याचे वधा । होवोनि मी असह्यापदा । रसतळा जाईन ॥५४॥

स्त्रष्टा म्हणे गा वसुमती । मी जाणतो हे त्यांची ख्याती । तू राहावे स्वस्थ चित्ती । धैर्यवृत्ती धरोनिया ॥५५॥

भृगु म्हणे गा भूपाळा । घेवोनि देवऋषींचा मेळा । जोडोनिया करकमळा । स्तविता जाहला विधाता ॥५६॥

ॐनमोजी विश्वकारणा । विश्वव्यापका संकटहरणा । करिसी दीनाचिया रक्षणा । अनाथ करुणा वाहशी ॥५७॥

ॐनमोजी अनंतकीर्ती । अनंतरूपा अनंतशक्ती । अरिनाशना अनंतमूर्ती । अखिला गती तूचि पै ॥५८॥

नमोनमोजी मनविश्रामा । सच्चिदानंदा पूर्णकामा । चराचराखिल लोकधामा । भक्तारामा सुखाब्धी ॥५९॥

विश्वेधारा विश्वेशा । विश्वनाथा हतविश्वपाशा । विश्वतापहरा विश्वकोशा । अविनाशा अगम्या ॥१६०॥

जयजय शत्रुतापशमना । दीनानुकंपी निरंजना । अनंता रे गजानना । अघभंजना जगद्‍गुरो ॥६१॥

जयजय अखिलविश्वपोषणा । करुणाकरा विश्वभूषणा । गुणास्पदा निर्गुणा । सुखकारणा सुरेशा ॥६२॥

निराधारा निरामया । निर्मला रे अप्रमेया । निरहंकरा निर्भया । महाकाया महामते ॥६३॥

भूतातीता भूतभावना । भूतांतका भूतवर्धना । भूताध्यक्षा विघ्नदमना । वारणानना गणपती ॥६४॥

ऐसे विनायकाते स्तवुनी । मुखे हा हा शब्द करूनी । परमदुःखे विव्हळ होउनी । आक्रंदती दीनस्वरे ॥६५॥

म्हणती बुडालो दुःखावर्ती । स्वाहास्वधाकाररहित क्षिती । तेणे क्षोणी रसातळगती । धरू पाहे अनिवार ॥६६॥

दैत्यी हरिले आमचे वैभव । हतस्थान जाहलो सदैव । अरण्यपशू ऐसे सर्व । गुहाशयी राहिलो ॥६७॥

हे दीननाथ करुणाघन । करी का असुरांचे हनन । तुजहूनि त्राता अन्यजन । कोण आहे दयाळा ॥६८॥

देवऋषी मिळोनि सकळ । ऐसा करिती कोल्हाळ । त्या शब्दे कोंदले निराळ । भक्तपाळ कळवळिला ॥६९॥

आकाशी गर्जे नभोवाणी । ना भी ना भी ऐसा ध्वनी । ऐकोनिया सुधापानी । तटस्थ उभे राहिले ॥१७०॥

कश्यपगृही अवतरोन । करीन दुष्टांचे हनन । तेणे साधूंचे पालन । सहजस्थिती होईल पै ॥७१॥

भृगू म्हणे गा भूपाळा । नभोवाणी ऐकोनि ते वेळा । आनंद होवोनि सकळा । लोटांगणे घालिती ॥७२॥

मेदिनीस म्हणे चतुर्मुख । पूर्ण अवतरेल विनायक । मृत्युलोकी वृंदारक । तेही अवतार घेतील पै ॥७३॥

हरेल तुझा सकल भार । स्वस्थ राहे धरी धीर । ऐकोनि धरणी सत्वर । स्वस्थानी स्थीर राहिली ॥७४॥

भृगु म्हणे नरपती लागुन । अवधारी पूर्वानुसंधान । अदिती पावली वरदान । तेणे कश्यप संतोषला ॥७५॥

आलिंगोनिया सुंदरी । नेवोनिया अंतःपुरी । भोगोपभोगे क्रीडा करी । गर्भ धरी अदिती तेव्हा ॥७६॥

अदिती जाहली गर्भिणी । आनंदे कोंदली धरणी । उत्साह मांडला सुरगणी । आनंदवनी क्रीडती ॥७७॥

पोटासि आले परब्रह्म । दोहदलक्षणे अतिउत्तम । पाहोनिया ब्राह्मणसत्तम । इच्छित काम पूर्ण करी ॥७८॥

डोहळे न पुरता गर्भिणीचे । तेणे व्यंग होय गर्भाचे । ऐसे जाणोनिया तिचे । मनी इच्छिले पूर्ण करी ॥७९॥

पोटी उभवला ब्रह्मठसा । स्वानंदे डोले राजसा । शुक्लपक्षी चंद्र जैसा । गर्भ तैसा वाढत ॥१८०॥

नवमास पूर्ण होता । अरिष्ठी प्रवेशली देवमाता । सुखशयनी शयन करिता । प्रसूत जाहली तत्क्षणी ॥८१॥

माघमस उत्तम जाण । शुक्लपक्षी चतुर्थी पूर्ण । मध्यान्ही येता चंडकिरण । जगद्भूषण प्रगटला ॥८२॥

असता उच्चग्रह पंचक । अवतारला विनायक । भाळी केशर वरी टिळक । कस्तुरीचा परिमळे ॥८३॥

किरीटकुंडले मंडित वदन । आरक्तरंगे अधरपूर्ण । भ्रृकुटी ज्याच्या सुलक्षणा । तेज फाके दशदिशा ॥८४॥

कंठी रुळती रत्नमाळा । वक्षी चिंतामणी तेजागळा । रूप न पाहवे डोळा । सिद्धिबुद्धीसहित जो ॥८५॥

ऐसा तो अयोनिसंभव । सूतिका गृही देवाधिदेव । पाहोनि त्याचे वैभव । हर्षभरित जाहली दोघे ॥८६॥

अष्टवर्षांची दिव्यमूर्ती । सगुणगुणे बालाकृती । दशबाहू अतुलदीप्ती । मातेप्रति ऐक म्हणे ॥८७॥

तुवा पूर्वी तप केले । ते पुण्य आता फळा आले । बालभावे वागविले । पाहिजे मज जननीये ॥८८॥

करीन दुष्टांचा संहार । स्वस्थानी स्थापीन तुझे कुमर । प्रवर्तवीन सदाचार । भूभार हरण करीन मी ॥८९॥

करीन तुमचे सेवन । आता असावे सुखसंपन्न । ऐसे ऐकता वचन । आनंदनिमग्न जाहली दोघे ॥१९०॥

भृगु म्हणे भूपती ऐक । अर्कावलोकने चक्रवाक । तैसे आनंदभरित देख । बालकासी बोलती ॥९१॥

तू परमात्मा विनायक । स्वलीला दाविसी अनेक । तुज म्हणता आमुचे बालक । जगी कौतुक अपूर्व हे ॥९२॥

जो चराचरगुरू जगत्पती । सत्यनित्यानंदमूर्ती । सर्वसाक्षी अतुलदीप्ती । विश्वस्थिति कारण ॥९३॥

तो आमुचा पुत्र जाहला । असा शब्द जगी विस्तारला । तेणे आमचा तुटला । भवबंध निश्चये ॥९४॥

धन्य जाहली आमची कूले । जगी ज्ञान धन्य जाहले । साधूकारणे साकारले । परब्रह्म गोमटे ॥९५॥

सूत्री जैसे मणिगण । तैसी ब्रह्मांडे परिपूर्ण । ज्याचे ठाई विलसती जाण । तोच तू जगदाता ॥९६॥

यदर्थ तू अवतार धरिसी । स्वरूपी करूनि आकृती तैसी । बालाद्यभावे आम्हासी । रंजवावे कौतुक ॥९७॥

ऐकोनि त्याचे ऐसे वचन । दिव्यरूप आच्छादुन । प्राकृत बालक जैसे तान्ह । ऐसा जाहला क्षणमात्रे ॥९८॥

मायेस घालोनि मायावरण । तिचे पुढे करी रुदन । तेणे कोंदले दिशागगन । प्रसन्न जाहल्या दशदिशा ॥९९॥

रुदन नाद ऐकता कानी । वंध्या जाहल्या गर्भिणी । प्रमोदे भरली मेदिनी । सुधापानी आनंदले ॥२००॥

दुंदुभी वाजविती निराळी । देव वोपिती पुष्पांजली । वाहोनि टाळियाटाळी । परस्परे भेटती ॥१॥

नृत्य करिती अप्सरागण । रसेरस जाहले परिपूर्ण । अवतरता जगाचे मंडण । अरिष्ट खंडण जाहले पै ॥२॥

भये दैत्य जाहले विव्हळ । त्याचे नेत्री वाहे जळ । गात्रे होवोनिया विकळ । मुगुटी तळ पाहिला ॥३॥

द्वारी वाजती वाद्यगजर । ती दुमदुमिले अंबर । तोरणे मखरे सुंदर । उभविली ऋषिवर्यै ॥४॥

कश्यपे करोनि मंगलस्नान । घेवोनि पुरोहितब्राह्मण । विधिविधान मंत्रे करून । जातकर्म आरंभिले ॥५॥

मधूबिंदूघृतयुक्त । बाळाचे मुखी घालित । तेणे संतोषला भगवंत । कश्यपसुत जगदात्मा ॥६॥

नाळ छेदूनिया निके । बाळ न्हाणिले उष्णोदके । अंकी घेवोनिया कौतुके । माता खेळवी निजच्छंदे ॥७॥

जो विश्वास आधार जाण । त्यासि घालिती पांघुरण । निजभक्तांचे आर्तपूर्ण । जगद्भूषण पुरवीतसे ॥८॥

ऐकोन बालकाचे रुदन । मायामोहे जाकळुन । मुखकमळी घालोनि स्तन । स्तन्यपान करवीतसे ॥९॥

बालोत्कर्षाकारण । दाने गौरविले ब्राह्मण । मांडिला महोत्साह जाण । कश्यपऋषीने स्वगृही ॥२१०॥

पुत्र जाहला अदितीलागुनी । हे ऐकोनिया नितंबिनी । आंचण्या ताटी भरुनी । सूतिकासदनी पातल्या ॥११॥

वोसंगा घेवोनिया बाळ । चौरंगी बैसली वेल्हाळ । पाहोनि ऋषिपत्‍न्या सकळ । हरिद्राकुंकुमे अर्पिती ॥१२॥

वोटी भरोनि सूतिकेची । मूर्ती पाहता बाळकाची । लाऊ विसरली नयनाची । पाती तटस्थ राहिली ॥१३॥

जो निर्गुणनिराकार । निष्कर्मनिरूप साचार । तोचि जाहला साकार । लीलाविग्रही विनायक ॥१४॥

अतिसुंदर चरणतळ । उपमेकठीण रातोत्पळ । बाल सूर्याचेनि तेजाळ । तैसी कवळे टाचाची ॥१५॥

ध्वजवज्रांकुशरेखा । चरणिची सामुद्रिके देखा । न वर्णवती सहस्त्रमुखा । ब्रह्मादिका अलक्ष्य ॥१६॥

सुवर्णचंपककळिका । तैशा अंगोळिया सुरेखा । नखी नखपणे शशांका । पूर्णकळा लाधल्या ॥१७॥

सांडूनि कठिणत्वाचे डंभ । सचेतनहि त्याचे स्तंभ । तैसे चरणजी स्वयंभ । बालक शरीरी शोभती ॥१८॥

सोहंभावाचेनि गजरे । चरणी गर्जती नूपुरे । ममुक्षाचे मन निजसुरे । त्याते चेयिरे करिताती ॥१९॥

सागरी ऊर्मीची नवाळी । तैसी उदरी त्रिगुणात्रिवळी । कर्माकर्म रोमावळी । बहिर्मुख विस्तारल्या ॥२२०॥

न कळे ह्रदयीचे महिमान । चारी वेदा पडले मौन । तेथे संचरले साधुजन । देहाभिमान त्यागोनिया ॥२१॥

ओंकारमातृकासगट । तैसा शोभे कंबुकंठ । भक्तसंकट श्रवणी सुभट । श्रवण दोनी शोभती ॥२२॥

गगन शून्यत्वा उबगले । कुंतलरूप साकारिले । मस्तकी अधोमुख लोंबले । जावळ कुरळ केश पै ॥२३॥

सकळ दैवे दैवागळ । तैसे शोभे विशाळभाळ । दिग्गजशुंडादंड सरळ । रक्ततळ अरुणप्रभा ॥२४॥

पंचतत्व तरूच्या कळिका । अंगोळिया तेवी सुरेखा । नास्तिका हरोनि नासिका । सरळभावे उंचावली ॥२५॥

ब्रह्मांडमुसी मुसावले । सौंदर्यतेजे साकारले । ब्रह्मानंदे वोतिले । मुख सुंदर बाळाचे ॥२६॥

ब्रह्मसरोवरी विकासिले । मुखकमळ हास्ये शोभले । पाहोनिया लंपट जाहले । नेत्रभ्रमर कामीचे ॥२७॥

बाळ पाहूनिया दृष्टी । म्हणती लागेल गे दृष्टी । माया कवळोनिया धरी पोटी । मुख चुंबी आवडीने ॥२८॥

पंचम दिवसी गुडदान । षष्ठमदिनी षष्ठीपूजन । करोनिया नामकरण । नाम ठेविले कश्यपे ॥२९॥

सर्वाहूनि अतिउत्कट । म्हणोनि नाम महोत्कट । ठेविता जाहला तो सुभट । अतिआवडी करोनिया ॥२३०॥

शुक्लपक्षी जैसा चंद्र । तैसा वाढे बाळकेंद्र । जगी विस्तारले सुभद्र । जाहले अभद्र असुरांसी ॥३१॥

ऐसा महाराज विनायक । अदितीचा जाहला बालक । निजभक्तासी दावी कौतुक । अपारलीला करोनिया ॥३२॥

सूत म्हणे शौनकाप्रती । निवेदिली अवतार ख्याती । ही कथा जे ऐकती । भावस्थिती करोनिया ॥३३॥

अदिती ऐसे निश्चित । त्याचे पुरतील मनोरथ । वंशी वंशध्वजसुत । धरी अनंत अवतार पै ॥३४॥

कथागंगोदके न्हाले । ते संसारी नाही मळले । अंती तत्पद पावले । भक्तिबळे करोनिया ॥३५॥

हे आख्यान करिता श्रवण । निश्चये चुके जन्ममरण । नासती अरिष्टे दारुण । होय कल्याण सहजची ॥३६॥

ब्रह्मानंदगुरुप्रसादे । महाराष्ट्रभाषा निजच्छंदे । विनायकमुखे अनुवादे । विनायकाची निजलीळा ॥३७॥

गणेशपुराणाचे अनुमते । कथा लिहिली शुद्ध येथे । साहित्यरत्‍ने विराजते । श्रवणी भूषणे श्रोतया ॥३८॥

जयजयाजी जगन्नाथा । पुढे बोलवी रसाळकथा । हीच जन्माची सार्थकता । वंशी धन्यता येणेची ॥३९॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंडरसभरित । प्रथमोध्याय गोड हा ॥२४०॥

अध्याय ॥१॥ ओव्या ॥२४०॥

अध्याय पहिला समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP