निरंजन माधव - निर्वोष्टराघवचरित

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


दीनजनावन दाशरथी । चरित सरस, दे अचल गती ॥

ऐहिकहीं अतिऋद्धि करी । चित्तकलंक अशेष हरी ॥१॥

दशरथ अवनीनाथघरीं । कौसल्यासतिच्या जठरीं ॥

जलजदलायतनेत्र हरी । जलधिशयन अवतार करी ॥२॥

अगणितवीर्यनिधीजनिला । निर्जरगण हर्षित घडला ॥

शेषचक्रजलजात असे । सहित - सहोदर तो विलसे ॥३॥

वडिल तनय रणधीर वना । याज्ञिक गाधिज ने अवना ॥

यज्ञविनाशक रात्रिचरां । वध करवी ऋषिविघ्नकरां ॥४॥

शिला चरणकल्हाररजें । द्विजवनिता घडली सहजें ॥

जनकसदसिं हर ......। दोनि खंड करि रघुराणा ॥५॥

वरी जनकतनया नवरी । त्रिदिववरां आल्हाद करी ॥

क्षत्रियांतकरगर्वगजा । केसरि हा राघवराजा ॥६॥

सत्यवचन धरणीश यया । धाडी दंडक - ऋषिनिलया ॥

अवर अनुज त्यासहित सती । करि गोदातटवनिं वसती ॥७॥

कनकहरिण निरखी नयनीं । सती अवनिजा त्याचक्षणीं ॥

धरावया विनवी नाथा । विनयें शशिवदना सीता ॥८॥

शरधिशरासन करीं धरी । काळवीटकदनार्थ हरी ॥

सहित अनुजवर वेग करी । तंव आला दशकंठ घरीं ॥९॥

सदनीं एकट कनकलता । राघवराणी ते सीता ॥

असतां हरिली हरिणदृशा । लंके ने लंकेश असा ॥१०॥

शोधित वनगव्हर सारें । वृद्ध गीधवचनाधारें ॥

देखति तैं नैषाद सती । वृत्त यथास्थित सर्व कथी ॥११॥

वानरनायक सख्य करी । वाली वधिला एकशरीं ॥

अष्टदिशा शोधासि हरी । धाडी कीशेश्वर निकरीं ॥१२॥

वाततनय अंगद असिले । वीर निघाले शत निशिले ॥

सागरलंघन वेग करी । अंजनितोक वनोक वरीं ॥१३॥

राक्षसनगरीं सति सीता । राक्षसवनितागतनाथा ॥

चिंतन करितां कृश झाली । जलदविना जाती वल्ली ॥१४॥

अशोकवनिं कांतीं निवसे । तारा क्षितिवरि काय घसे ॥

देखियली क्षितिधरराणी । राजनंदिनी दिवस गणी ॥१५॥

वृकवनितासंधीं हरिणी । चकित चलित केविलवाणी ॥

देखत अंजनिच्या तनयें । अंघ्रि वंदिले अतिविनयें ॥१६॥

नाथ आंगठी दे तिजला । वनितागण होता निजला ॥

कांतवृत्त तो कथन करी । एकांतीं सतिशोक हरी ॥१७॥

हर्षित झाली दिव्यसती । शिरोरत्न दे या हातीं ॥

काकशिक्षिता कथा कथी । संदेशवचन दे अशा रिती ॥१८॥

आज्ञा देतां निघे हरी । अशोकवनिका ध्वंस करी ॥

ऐकत रावण रोष करी । धाडी किंकर लक्षवरी ॥१९॥

ते वीरें वधिले येतां । अक्षयसह राक्षसनाथां ॥

इंद्रजितें वानर धरिला । जनकसन्निधी ने वहिला ॥२०॥

कोण कीश तव नांव कथीं । कां आलासि असें वदती ॥

सांगे कथन सविस्तर तो । रावण तृणवत जो गणितो ॥।२१॥

राघवदास असें साचा । तनय असे रे वाताचा ॥

आलों सतिशोध कराया । येथ देखिलि क्षितितनया ॥२२॥

राजनंदिनी सोडि खळा । नातरि नाश घडे सकळां ॥

शरण जाय राघवचरणा । शरणाथींरक्षणकरणा ॥२३॥

सीता दे त्याची त्याला । व्यर्थ कलह हा काशाला ॥

ना तरि जीवें जासी रे । हितगोष्टी नायिकसी रे ॥२४॥

ऐकत रावण घृतधारा । सिक्त अनळ लागत वारा ॥

तेविं वृद्ध क्रोधाग्नि घढे । चित्तीं अतिशय क्रोध कढे ॥२५॥

वाळदाह करवी रोषें । निर्दय राक्षस आवेशें ॥

ज्वाळा शिखिची अति वाढे । तों तों वानरही वाढे ॥२६॥

जाळित सुटला धवळारें । थोर थोर राजागारें ॥

जाळीयली कांचननगरी । सागरलंघन वीर करी ॥२७॥

वृत्त कथी रविवंशवरा । असे सती जीवंत धुरा ॥

त्वरा करीं निघ गा नृहरी । ऐकतां सजला तैंचि हरी ॥२८॥

वानरनाथनिदेशवती । सेना चाले त्वरितगती ॥

हांसत नाचत धांवत ते । जात सागरा लक्षिति ते ॥२९॥

सागरतोयीं सेतुकरी । राघवसेना नृत्य करी ॥

राक्षस निघती रणकदना । संहरि राघव दशवदना ॥३०॥

घटश्रोत्र इंद्रारि असे । देवांतक नरघातकसे ॥

ख्यातख्यातत्र्यैलोक्यजयी । वधी तया राघव विजयी ॥३१॥

यशशिखरीं वानर चढले । देव सर्व हर्षित घडले ।

लंका रावणसोदर घे । राघवचरणा शरण रिघे ॥३२॥

दिनकरराशि तंव राज्य करीं । राघव दे वरहस्त शिरीं ॥

यक्षवाहनावरि वळघे । हरि सेनेसह तैंचि निघे ॥३३॥

अंतरिक्षगत चाल करी । देखे राघव निजनगरी ॥

कैकयितनय जटी वल्की । त्यासि सादरें अवलोकी ॥३४॥

आलिंगी त्या तोष करी । लोभें आघ्राणोनि शिरीं ।

अरिनाशकसह जनयित्री । स्नेंहें निरखी निजनेत्रीं ॥३५॥

हर्ष न सांटें तैं जगती । देखति राघव दीनगती ॥

हद्गत खेद तदा सरला । चिंतावारिद वोसरला ॥३६॥

झाला तोष अशेष जना । आला श्रीश त्यजोनि वना ॥

आतां करिल जगा अवना । शाशिल निजधरणी राणा ॥३७॥

कैकयितनयवसिष्ठऋषी । सचिवसहित विनविति हर्षी ॥

राज्य करी हरि वडिलांचें । यांतचि अति हित सकळांचें ॥३८॥

अंगीकार करी नहरी । लोकशिराणी साच करी ॥

स्नान यथाविधि राज्यधरा । करविति जन तोषें नृवरा ॥३९॥

रत्नकिरीटांगदवलयें । हारादिक तें कनकचयें ॥

आणिति देव त्रिलोकधणी । स्तविती राघवकृत करणी ॥४०॥

राजेश्वर रघुवर घडला । देवसंघ हर्षा चढला ॥

जयजयकार त्रिलोक वरी । नाद वळघला सत्यशिरीं ॥४१॥

जनकनंदिनीसह राजा । राघव निर्जरवरकाजा ॥

अवतरला करि अति लीला । सज्जनजन अवघा घाला ॥४२॥

कवी निरंजन कीर्ति रची । यथाधीपणा निजवाचीं ॥

राघवचरणसरोजदळा । वाहे श्लोकस्रज सगळा ॥४३॥

दशरथनंदनचरित असें । अवोष्ठवर्णे ग्रथित असे ॥

कविवर संतां तोषकरी । सिद्ध धडे हें जरि विवरी ॥४४॥

सीताकांतत्रिलोकधणी । तारण कीर्ति करी धरणी ॥

गायिल जो नर तो तरतो । कैवल्यांगण तो वरितो ॥४५॥

इति निरंजनयोगीविरचितं निर्वोष्टराघवचरितं समाप्तं ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP