वृत्त - इंदुवदना.
काय करि काळकलि नीलगल चित्तीं
घ्याल जरि बालभरि बैसुनि निवातीं ।
भाळशिखि बाळशशिमंडण भवारे
सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे ॥१॥
गांगजळ बिल्वदळ तंदुळतिळांनीं
कोकनदकुंदकरवीरकुसुमांनीं ।
धूपबळिदीपयुत अर्पुनी पुजा रे । सांब० ॥२॥
देववर भीतिहर शंकर उमेशा
कामरिपु कोमल मनोज्ञतरवेषा ।
शूलवरखङ्गधनुहेतिधरणा रे । सांब० ॥३॥
पर्वतसुतारमण शर्व सुखराशी
दीनजनपालनसुदक्ष विषदांशी ।
नासुनि निजात्मपद देत सुजना रे । सांब० ॥४॥
भूति अतिशुभ्र विभुचर्चित निजांगीं
शारदपयोदनिभ भासत सुयोगी ।
कृत्तिकृतवास अविनाशक भजा रे । सांब० ॥५॥
मूळ अमरांसि अमरागसम पाहा
कामितमनोरथफळासि पुरवी हा !
नामजपमात्र करितांचि मनुजा रे । सांब० ॥६॥
निर्मळपदांबुरुहअर्चनपरांतें
पूर्णपददान करणार विभु हातें ।
हाचि परमेश परतत्व समजा रे । सांब० ॥७॥
इंदुवदना अनुपमान ललितांगी
कल्पलतिकासम अखंडित अलिंगी
तोचि कुळदैवत तया शरण जा रे । सांब० ॥८॥
सांबशिवपावनसुधाष्टक बनाजी
किंकर सदंतर रचोनि पद पूजी ।
पाठ करितील शिवभक्त जरि भावें
मुक्तिनवरी वरिल शंकरविभावें । सांब० ॥९॥
इतिश्रीयोगी निरंजनमाधवविरचितं सांबशिवाष्टकं संपूर्णम् ॥