निरंजन माधव - वासुदेव स्तोत्र

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


ॐ कारात्मक विश्वरुप घटना निर्माण केली स्वयें,

तो त्यामाजि प्रवेशला हरि जसें आकाश भूतान्वयें ।

सूत्रात्मा जडजंगमांत कुसुमीं गंधापरी राहिला,

तो हा श्रीपति नंदगोपतिघरीं रांगे बरा तान्हुला ॥१॥

नंदें खेळविला, सखीं कवळिला, माये स्तनीं लाविला,

गोपी चुंबिति सुंदरास्यकमला प्रेमें पदीं न्हाणिला, ।

अंगीं भूषण लेववीत अबला, कोणी सुखें भोगिला,

भावें गोरज पाजिला, वज्रकुळीं हा भोगिती सोहळा. ॥२॥

मोठाले दैत्य गाढे धड सबळ पुढें देखतां देव वेडे,

होती सक्रोध, दाढे रगडिती, तंव ते टाकिती स्वर्गवाडे ।

ते कैसें बैल घोडे करुनि हरिपुढें पाठवीले निवाडें,

त्यांतें संग्राम होडे ' निवटुनि ' तुकडे थोर केले पवाडे. ॥३॥

भक्तांचें विघ्न वारी, दुरित परिहरी, शोखिली बाळमारी

माया दावी मुरारी, अघ बक समरीं मारिले दैत्य भारी, ।

रांगे जैं नंददारीं यमलतरुवरीं घेतली मुक्ति हारी,

ऐसा हा दानवारी नमित सुरवरीं बाळभावांगिकारी. ॥४॥

गंधर्वादिक सिद्ध गाति बिरुदें तो यादवांच्या कुळीं

झाला आनकदुंदुभीसुत, अरी वाढे तुझा गोकुळीं, ।

ऐसा श्रीपति नारदें विनविला तो देव जाणावया,

प्रेरी भोजपती वडील चुलता अक्रूर आणावया ॥५॥

वंशीं मारक जन्मला म्हणुनियां चिंता करी भूपती

तेणें दैत्य विदारिले रणमही म्यां प्रेरिले जे क्षितीं; ।

हा गोवर्धन थोरला उचलिला, तो बाळ कैसा म्हणों ?

जेणें भक्षुनि वोणवा विझविला त्या केवि आम्ही जिणों ? ॥६॥

तेव्हां चापमखासि निर्मुनि करी आज्ञा प्रभू गोकुळा

यावें कृष्णहलायुधासह पुरीं पाहावया सोहळा, ।

मार्गी यादव चालतां म्हणतसे पाहेन तो श्रीपती,

ज्याचे पाय अपाय दूर करिती, बहेंद्र ज्या वंदिती, ॥७॥

वाणी ही स्तवितां शिणे, निगम तो त्यालागिं नेणें म्हणे;

तो देवेश विलोकितां व्रजकुळीं दृष्टी घडो पारणें. ।

देखे भूवरुते अपूर्व हरिच्या पादांबुजाचे ठसे,

लोळे त्यांवरि भक्तिनम्र पुरता सुप्रेम ज्या उल्लसे. ॥८॥

सूर्यास्तीं रथ पातला व्रजपुरीं अक्रूर आला घरा,

ऐसें जाणुनि भेटती सुरपती हा आमुचा सोयरा, ।

साष्टांग प्रणिपात सांत्वन करी, ब्रह्मेंद्र ज्या वंदितो

तेही जाणुनि भाव हत्कमळिचा भक्तेंद्र या पूजितो ॥९॥

देवा घेउनि चालिला, व्रजवधू अक्रूर तो निंदिती

देवें दाखविलें स्वरुप यमुनाडोहीं स्वभक्तांप्रती ।

नेला मोक्षपदासि कंसनृपती चाणूरमल्लासवें,

स्थापी राज्यपदीं यदूत्तम पुन्हा मातामहा वैभवें. ॥१०॥

वाहे भार वसुंधरा दडपली दैत्येंद्र राजें बळीं

गर्वी कौरव बाण भूसुत जरासंधादि चैद्यावळी ।

त्या सर्वोसि वधोनि धर्मनृपती संस्थापिला आदरें

केला दिग्विजयी महा विजय तो भूभार जेणें हरे ॥११॥

एके सोळा सहस्र क्षितिपत्नितनया भोगिल्या एक वेळा

स्वर्गीच्या कौतुकानें सुरवरविटपी आणिला द्वारकेला ।

केला श्रीवासुदेवें कुरुयदुमथनीं बोध पार्थोद्धवाला

ते झाली ज्ञाननौका भवनिधिरतणोपाय सद्वैष्णवाला ॥१२॥

श्रीकृष्णाची चरित्रें परम शुभकरं ऐकतां दोष जाती

स्वच्छंदें प्रेमबंधें हरिजन हरिची सत्कथा नित्य गाती ।

हत्पद्मीं ब्रह्मरंध्रीं सुदहरकुहरी लक्षिती वासुदेवा

ध्याती त्या पंकजाक्षा नवजलदनिभा अर्पिती भक्तिमावा ॥१३॥

मंत्राचे वर्ण बारा प्रणव प्रथमतो वासुदेवाभिधानी

त्यावर्णी श्लोक बारा रचुनि हरिपदीं अर्पिली रम्य वाणी ।

कैंचें सामर्थ्य मातें परि सकळ कृपा बापटलक्ष्मीधराची

प्रार्थी भावें बनाजी कविवर परिसा कीर्ति हे केशवाची ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP