निरंजन माधव - श्रीनारायणाष्टकं

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


ज्या देवां स्तविताति वेद समुदें शास्त्रें जया चर्चिती

ब्रह्मेशांदि सुरेंद्र सर्व नियमें ज्याच्या पदा अर्चिती ।

ज्यापासोनि अभीष्ट चिंतिति सदा ज्ञानी सुमुक्षू यती

आर्तत्राणपरायणः स भगवान्नारायणो मे गतिः ॥१॥

प्रल्हादें भजतां अनन्यगतिनें सप्रेमभावें अती

दंडी त्या तनुजा हिरण्यकशिपु द्रोही महा दुष्कृती ।

भक्ताच्या अभिरक्षणा प्रकटला स्तंभीं करालाकृती । आर्त० ॥२॥

रक्षेशा कथितां बिभीषण नयें रामासि दे तत्सती

ऐसें ऐकुनि ताडितां पदयुगें टाकोनिया संगती ।

आला तो शरणार्थ रक्षुनि करी आकल्प लंकापती । आर्त० ॥३॥

नक्रें तो धरिला पदीं गजपती, वोढी जळीं दुर्मती

ज्ञाती त्या असमर्थ टाकिति तदा पावोनियां दुर्गती ।

बोभाये तंव सोडवी हरि जवें धांवोनि ये त्याप्रती । आर्त० ॥४॥

द्यूतीं जिंतुनि पांडवा द्रुपदजा वोढोनि नेली सती

दुष्टें कौरवनायकें निजसभे भीष्मादि ते पाहती ।

इच्छी नग्न करुं अशांत लुगडी जो नेसवी श्रीपती । आर्त० ॥५॥

इंद्राच्या रतिसंगमा निरखितां क्रोधें अहल्येप्रती

शापी गौतम तूं शिला घडुनिया राहे वनी शाश्वतो ।

केली पावन पादपंकजरजें ज्यातें श्रुती वंदिति । आर्त० ॥६॥

जो पंचाब्दशिशू सपत्नजननीवाग्वज्रभिन्नस्थिती

वैषम्यें निलयीं उदासिनमनें लागे हरीच्या पथीं ।

वात्सल्यें करुणानिधी ध्रुवपदीं स्थापोनि दे संपती । आर्त० ॥७॥

क्षीरार्थी उपमन्यु बालक रडे दुग्धाब्धि दे त्याप्रती

पापी ही परि पुत्रनाम पढतां त्या पाववी निष्कृती ।

वेश्याही सहजें विमान वळघे वानूं असे मी किती । आर्त० ॥८॥

हें नारायणपावनाष्टक असे जो कां त्रिकाळीं पढे

तो नागामरमानवेश्वरसभे सन्मान त्याला घडे ।

जीवन्मुक्ति वरोनि भक्तवर तो प्राणप्रयाणोत्सवीं

पावे तत्परमंपदासि विनवी संता बनाजी कवी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP