शा० - देवि श्रीतुळसी हरीस तुळसी तूं एक या भूतळीं
तूं तो केवळ वल्लभा निवससी श्रीकृष्णवक्षस्थळीं ।
तूं वाचोनि तया कदापि न गमे याकारणें सर्वदा
राहे तो तुजसन्निधी नरहरी तूं मानवा मुक्तिदा ॥१॥
घेतां संदर्शनातें सकळ अघ हरे स्पर्शितां पुण्यदात्री
रोगांतें वंदिता ते निरसुनि शमना सिंचितां भीतिकत्रीं ।
जीच्या आरोपणानें हरिसम तनु दे अर्पितां श्रीशपायीं
देते सायुज्य ऐशी त्रिभुवनजठरीं तूळसी हेचि आयी ॥२॥
आ० - गंगा पुष्करमुख्यें तीर्थे सरिता सरोवरें कांहीं ।
श्रीपति मुख्यामर ते वसती तुळसीदळीं सुखें तेही ॥३॥
श्रीहरिहर्षापासुनि उपजुनि संहारिसी जगत्क्लेशा ।
तुळसी हरिपदमुख दे हरिप्रिये ! वंदितों तुतें शतशा ॥४॥
संसारीं कंसारी तारक मनुजांसि एक तूं नारी ।
तुळसी भवसंहारी म्हणोनि सारी श्रुतीच डांगोरी ॥५॥
शां० - लक्ष्मी संपति दे जनांसि निवसे श्रीकृष्णवक्षस्थळीं
तीतें प्रार्थिति देव मानव तथा गंधर्वसिद्धावळी ।
तत्रापी अविनाशसंपति सती देऊं सकेना कदां
देशी त्वद्भजकांसि साच जननी लक्ष्मीपतीच्या पदा ॥६॥
कित्ती तें तरि मद्यपानअघ कीं ते स्वर्णचोरी किती
कित्ती तो गुरुदारसंग अथवा ते ब्रह्महत्या कित्ती ।
संसर्गात्मक दोष तो तरि किती देवी ! तुझ्या दर्शना
नेच्छी तोंवरि यांसि उन्नति असें हें साच माने मना ॥७॥
तूझ्या श्रीवनदर्शनासि निघतां माघेंचि हत्या सरे
भीतीनें तरि मद्यपानअघ तें मागील सारें झुरे ।
स्वर्णस्तेय दडे सुकौतुक घडे तल्पा दिसेना पुढें
संसर्गासह पापपंक्ति समुद्री धूळीप्रमाणें उडे ॥८॥
गोहिंसा विचरो सपुत्रस्वनिता विप्रोत्तमा संहरो
मातातात वधोनि दुष्टमति हा लोकीं सुखें संचरो ।
पापें जीं लिहिलीं कृतांतसदनीं तीं सर्वही हा करो
येवो श्रीतुळसी ! समीप तुझिया किंवा ठिकाणी स्मरो ॥९॥
आ० - तुलसी तुलसी तुलसी जपति त्रैवर्ण्य तीनदां कोणी ।
विष्णुस्वरुप म्हणिजे तो नोहे मृत्युलोकिंचा प्राणी ॥१०॥
तुळते विष्णुसमेता लक्ष्मीहुनि आवडे हषीकेशा ।
शिवपद दे सुजनातें पावे तुळशी सुनामनिर्देशा ॥११॥
शा० - जेथें श्रीतुळशीवनें हरितसी तेथें वसे श्रीहरी
श्रीमद्वैष्णवविप्रमंदिरवरीं राहे प्रियेसीं तरीं
तीं स्थानांहूनि धुंडितां न गिवसे श्रीश त्रिलोकांतरीं ॥१२॥
नाहीं क्षीरनिधींत शेषशयनीं नाहीं अनंतासनीं
श्वेतद्वीपनिवास त्यासि म्हणती हेही वृथा बोलणीं ।
योग्यांच्या हदयांतही न गिवसे श्रीसूर्यनारायणीं
पाहावा तरि कंजलोचन पहा श्रीतूळसीच्या वनीं ! ॥१३॥
हो कां आम्रतरु रसाळ सुरभी चांपेरस्वर्णाकृती
हो अश्वत्थ हरिस्वरुप वट हो शंभू शिवा मालती ।
एका श्रीतुळसीदळासि समता एकासिही नाघडे
विष्णूच्या पदपंकजीं सुहदयीं कंठीं शिरीं जे चढे ॥१४॥
आ० - केतकि मालति मल्ली आणखी वल्ली सुगंधसंपूर्णा
तुळसीसुगंधमहिमा पावतिना कृष्णतोषदा पूर्णा ॥१५॥
आ० - तूं भक्तोद्भवदोषकुंजरगणा प्रत्यक्ष पंचानना
तूं तापत्रयअंधकार - दळणा भानुप्रभा पावना ।
तूं आपत्तिभुजंगमा विलससी त्या वैनतेयीपरी
यासाठीं तुळसी ! तुला नरहरी सानंद कंठीं धरी ॥१६॥
लक्ष्मी त्वद्भगिनी खरी परि सरी तुझी न लाहे तरी
तूं देतीस जनांसि मोक्ष, कमळा लोटी भवाच्या पुरीं ! ।
ते राहे हरिच्या उरीं, पदनखापासोनि आंगीं शिरीं
वस्ती तूं करिसी बरी तुळसिके ! माते ! मला उद्धरी ॥१७॥
गौरांगी कमळा, हरी घननिळा, साम्या नये केवळा
लक्ष्मी पंकजगंधिनी, मृगमदामोदा म्हणोनी भला
देवी श्रीतुळसी । मृगांककुळिंचा शौरी बहू भाळला ॥१८॥
स्र० - व्याली ते पुत्र दोघे जलनिधिदुहिता एक वेदास्य दूजा
झाला अन्नंग ( अनंग ) येना हरिसम म्हणुनी नावडे त्यासि भाजा
तुझे ते पुत्र साधू नवजलदवपू सांवळे चौंभुजांचे
होती कोट्यानुकोटी प्रियतम तुळसी ! तूंचि होसी त्रिवाचे ॥१९॥
लक्ष्मीचा पुत्र पाहा विधिवदन तया चारि पांचा मुखांचा
झाला तत्पुत्र तोही प्रसवत बरवा पुत्र साहा मुखांचा ।
तुझे सत्पुत्र भक्तोत्तमकुळ समुदें वंशपारंपरेनें
होती श्रीकृष्णसाम्ये म्हणवुनि तुळसी ! तूं प्रिया त्यासि जाणे ॥२०॥
आ० - तव काष्ठोद्भवमाळा धरिती श्रीकृष्णभक्त जे कंठीं ।
होउनि भवनिधिनौका तारुनि नेसील त्यासि वैकुंठीं ॥२१॥
वसंत - कर्णी धरी तव मणी तरि कर्णधारी
होवोनि तारित हरी भवसिंधुपारीं ।
कंठीं धरी तरि तयाप्रति कंबुकंठी
ठेवी स्वरुपपद देउनि तो विकुंठीं ॥२२॥
वृंदावनीं जरि करी नमनासि भावें
त्यातें कदापि न लगे बहु दूर जावें ।
येथेंचि विष्णुपदवी वरिते तयातें
मायामदादि परि हारुनियां भयातें ॥२३॥
शा० - काशा क्षीरनिधीनिवास, नलगे वैकुंठिंचें राहणें,
भोगींद्रांगपलंग काय करिजे, काशा रमालिंगणें ।
देवी श्रीतुळसी ! तुझ्या निकटिंच्या या मानवांकारणे
देसी तत्पद साम्येतसि तुळितां हें सर्व तेथें उणें ॥२४॥
नेघें मी अमये ! सुमंगळमये ! वित्तेशता ईशना
नेघें मी अमराधिपत्य अथवा वैधातृता विष्णुता ।
देवी श्रीतुळसी ! तुझ्या उपवनीं राहोनि देहांत मी
लाहें तत्पद जें निरंजन असे जें ध्यायिलें सत्तमीं ॥२५॥
तुझें जे धरिताति मुळमृद तें भाळस्थळीं सुंदरी
ते होती शिवभाळलोचन असी पौराणिकी वैखरी ।
आम्हीं आयिकतों यथार्थ तुळसी या अन्यथा कैं घडे
तीं देवीं त्रिजगीं कदापि न दिसे संकीर्त्य तुझ्या पुढें ॥२६॥
गंगा वृक्षमुळीं कलिंदतनया शोभे समस्तां दळीं
ब्रह्माणी विलसे फुलीं सकळही आगीं दिवौकावळी ।
शाखाग्रीं मुनिमंडळी मिरवली तीर्थाश्रयो साउली
यासाठीं हरिवल्लभा म्हणविसी तूं तुळसी माउली ॥२७॥
काशाला मणिभूषणें सुवसनें काशासि माळागणें
काशाला सुमनें सुगंधभरितें कस्तूरिकाचंदनें ।
पक्वान्नें विविधें कशासि करणें श्रीशार्चनाकारणें
श्रीदेवी तुळसी नसे दळ तुझें हे सर्व तेव्हां उणें ॥२८॥
आ० - कोमळ तुळसीपत्रीं वनमाळी पूजिला नसे जेंहीं
हयमेधादिक यज्ञें कशासि कीजेति दुष्कृती तेहीं ॥२९॥
एका तुळसीपत्रें होतो जो तोष देवकीपुजा ।
तो वाचें वदवेना, ब्रह्मादिसुरां मुनीश्वरां मंत्रां ॥३०॥
मंजुळ मंजरिमाले विजिततमाले कुरंगमदभाले ।
श्रीपतिमनोनुकूले नतजनपाले नमामि गुणशीले ॥३१॥
स्र० - कैंच्या वाटा अव्हाटा सुजन सुपथ ते लागले तीनि वाटा
शास्त्रांचा घात मोठा द्विजगण समुदे वीकिती वेद पोटा ।
धर्माचा दारवंटा दृढतर चिणिला हा कली फार खोटा
यामध्यें तूज येना शरण तुळसिके ! तोचि वेटा करंटा ॥३२॥
शा० - देखोनी कलिभीति तैं शरण त्या गेल्या विधात्या प्रजा
साष्टांग प्रणमोनि सांगति तया हें वृत्त सारें अजा ।
बोले त्यांप्रति कंजसंभव तुम्ही स्थापा घरीं तुळसी
तेणे त्या कलिपामरा गति नव्हे तद्भीति ते कायसी ॥३३॥
देखोनी तुळसीवनें यमगणें होती भयाभीत कीं
त्या गेहीं गति त्यासि नाच घडतां ते वंदिती मस्तकीं ।
जाती दूरुनि सद्विजां निरखितां त्या अंत्यजाचे परीं
देवी श्रीतुळसी ! सुखें निवससी ज्या पुण्यवंता घरीं ॥३४॥
जे कां लाविति तुळसी शुभवनें त्यांला वनें नंदनें
जे कां सिंचिति जीवनें तरि तया होती सुधाजीवनें ।
जे कां रक्षण सादरें करिति त्यां श्रीचक्र रक्षीतसे
अर्पी पंकजनाभपादकमळीं तात्काळ तो होतसे ॥३५॥
ज्या गेहीं तुळसीसुदर्शन दरी द्वारावती मृत्तिका
शालग्रामशिला सचक असतां कैं ठाव त्या पातका ।
तेव्हां त्या यमकिंकरा गति तया स्थानीं कशाला घडे
त्या गेहस्थ जनां निरीक्षुनि कळी तो काळ पायां पडे ॥३६॥
भाळीं लक्षुनि मृत्तिका तुळसिची मूलोद्भृता सोज्वळा
जाती यक्षपिशाच भीउनि तया दूरोनियां निर्मळा ।
त्यातें ठाव असे रमेशगिरिजानाथांचिया राउळीं ॥३७॥
देवी श्रीतुळसी ! सुमंगळ करी दुर्भीतिसंहारिणी
श्रीकृष्णप्रियकामिनी अमृतजा सर्वार्थदा पावनी ।
तूतें वंदन मी त्रिकाळ करितों मद्दैन्य लक्ष्मी धरा
कर्णी तूं विनवी कृपा करुनियां रक्षी म्हणे किंकरा ॥३८॥
मातें श्रीतुळसी ! असें करि मला प्राणप्रयाणौत्सवीं
श्रीकृष्णासह धांव घेउनि पुढें ठाकें महावैभवीं ।
आपादस्रजमंडिता हरितनू पीतांबरालंकृता
तुझ्या ह्या करुणारसें निरखितां पावें पदा शाश्वता ॥३९॥
काशाला मज वेदशास्त्रपठणें कां तीर्थयात्राव्रतें
काशाला तप दान यज्ञ करणें घेवोनि नानामतें ।
मी तों अक्षय सर्वदां तव पदा घालोनि आहें मिठी
पापीही परि तूजलाचि पडलें मी तारिजे सेवटीं ॥४०॥
व्याली ते जननी त्यजोनि मजला गेली स्वकर्मे गती
गेला तात तसेचि बंधुगण ते टाकोनियां संगती ।
एकाकी भवभीतपातकमती आलों निदानीं तुला
लक्षोनी शरणार्थ रक्षण करीं टाकूं नको तूं मला ॥४१॥
म्यां नाहीं तुज पूजिलें निरखिलें ना ध्यायिलें वंदिलें
नाहीं त्वद्वनसन्निधीस कधिंही दीपासिही लाविलें ।
ऐसा दुष्ट कृतघ्न मी परि तुझ्या दासानुदासीं गणी
आतां त्याग करुं नको मज सती लोळें तुझ्या अंगणीं ॥४२॥
म्यां नाहीं वन लाविलें घटजळें एका तरी सिंचिलें
नाहीं श्रीपतिपादपद्मयुगळीं पत्रासिहीं अर्पिलें ।
आतां ते यमभीति दुर्धर महा दुर्वार दुर्यातना
ते कैशी तरि दूर होइल कधीं तुझ्या कटाक्षाविना ॥४३॥
झालों वृद्ध दशेंद्रिया शिथिलता आली श्रुती नायकें
नेत्रीं या तम दाटसें अतिशयें दंतावळी पारुखे ।
द्वारें सर्वहि एकदांचि झरती त्या सौहदीं त्यागिलें
आलों श्रीतुळसी ! तुला शरण मीं टाकूं नको वेगळें ॥४४॥
त्राहि त्राहि कृपाकरे ! भयहरे सर्वार्थसिद्धिप्रदे
आहं दीन तुझा अनन्य गति मी पाचरितों सादरें ।
रक्षीं या अभयंकरी धरुनियां मी बाळ तूं माउली
मीं तापत्रयतप्त आजि करि तूं पादांबुजें साउली ॥४५॥
आर्या - धन्योहं धन्योहं पुण्योहं गलितमोहजालोहं
धृततुलसीमालोहं जितकालोहं रमेशवालोहं ॥४६॥
श्रीतुळशीस्तवनातें रचिलें सप्रेम भक्तिसंपन्नें ।
माधवतनय कवीनें वाहुनि वाकपंकजें प्रमोदानें ॥४७॥
याच्या पटणें श्रवणें श्रीहरिधामीं वनांत तुळशीच्या ।
त्याच्या पुण्या गणना करुं सकेना बृहस्पती वाचा ॥४८॥
ज्या ज्या मनोरथाची आवडि ज्यांच्या मनीं जशी आहे ।
जगती तुळसीसन्निध थोड्या काळांत सर्वही लाहे ॥४९॥
विद्यारंभविवाहीं कृषि - उद्यममित्रसंग्रही त्याहीं
तात्काळ सर्व सिद्धी तुळशीस्मरणेंचि पावतां देही ॥५०॥
स्र० - राजद्वारीं प्रवासीं अतिकठिणतरप्राप्तसंकष्टकाळीं
कांतारीं चोरमार्गी घनतरसमरीं शत्रुमेळीं अवेळीं ।
तुः स्वप्नीं दुष्टसत्वीं जलशिखिविषमीं ईतिबाधाप्रसंगीं
जो प्राणी भक्तिभावें स्मरल तुळसिका रक्षिते त्यासि वेगीं ॥५१॥
इतिश्रीयोगीनिरंजनमाधवविरचिते श्रीतुळशीस्तोत्रं संपूर्ण श्रीकृष्णार्पणमस्तु ॥