गंगे ! फुल्लसरोजसुंदरमुखी मीनाक्षिणी मंगळे !
बाहूपद्मलतायुते खगकुचे शैवालकेशाविले ।
पाददूंदमराळयुग्म बरवें सर्वाग यादावळी
माते ! सद्गवरुपिणी भगवती मीं वंदितीं माउली ॥१॥
हो जागी ! जग हें विलोकन करीं वात्सल्य चित्तीं धरीं
ये माझ्या सदनासि सत्वरगती पूजा बरी स्वीकरीं ।
घे सिंहासन रत्नकांचनमयी श्रीगौतमी मंदिरीं
राहे सर्वसमृद्धिवत असिल्या पाद्यार्घ्य अंगीकरी ॥२॥
घेयीं तूं मधुपर्क पावन बरें सद्धेमपात्रीं असे
घे पंचामृतही सुतोषमनसें स्नानार्थ मीं देतसे ।
घे शुद्धोदक मज्जनार्थ अमले ! नाना सुगंधें सती
आहे भावित सर्वतीर्थसलिलें मीं स्नापितों तूप्रती ॥३॥
घे पीतांबरयुग्म फार विलसे सत्कंचुकी साजिरी
नाना भूषणवर्गरत्नमय ते सर्वागशोभा करी ।
भीं तूतें सति ! लेववीन पदकें ताटंकहारावळी
आई ! मंगळसुत्र धारण करी या कंबुसाम्यागळीं ॥४॥
माते ! दिव्य हरिद्रिकांगिकरि तूं जे स्वर्णपीता असे ।
घेयी हा पटवास सर्वसुरभीकस्तूरिकाद्यें रजें
केला मिश्र जवादिकें सरवरें अर्पीन भावें निजें ॥५॥
घेयीं चंदन अष्टगंधयुत हें आहे स्वदेहीं धरीं
पाहे सुंदर भांग मीं भरितसें आरक्त या सेंदुरीं ।
नेत्रीं अंजन अंगिकार करि न गोदावरी माउली
पाहे दिव्य कटाक्षयुक्त मजला कीजे कृपासाउली ॥६॥
वेणीचे नगयुक्त विंचरुनिया घालीन वेणी शिरीं
हे नीलालक भाविले परिमळें स्नेहें महासुंदरी ।
जाळी हे तरि मस्तकीं मिरविजे तां माझिया आदरें
मुक्तामणिकगुच्छयुक्त विलसे मानोनि घे सत्वरें ॥७॥
आयी ! कल्पसुमें विचित्र रचिले घे हार हे आवडीं
माझ्या अर्पण मीं तुतें करितसे हे प्रार्थना येवढी ।
पायीं मी तव अर्पितों अतिशयें आलक्तकें जावडें
तूझें पादसरोज शोभविन मी मातें असें आवडे ॥८॥
हे मंजीर सतीपदीं मिरविजे हे हंसही साजिरे
ज्याचा सध्वनि फार मंजुळ असा ब्रह्मांडगर्भी भरे ।
बोटीं या धरि जोडवीं अनवटें नाना विरोद्या फुलें
पोल्हारें झणकार फार करितीं शब्दें महाकोमले ॥९॥
घेयीं धूप अनेकगंधनिवहीं आहे सती निर्मिला
श्रीखंडागरुगुग्गुलादिक रसें म्यां भक्तिनें अर्पिला ।
घेईं दीप जगत्प्रकाश तुझिया तेजें तरी होतसे
ऐशाही अतुळप्रभेसि जननी ! हा दीप मी देतसे ॥१०॥
घे शाल्योदन दिव्यसुपयुत हें नानारसव्यंजनीं
शाखा सुंदर निर्मिल्या बहुविधा देती रुची भोजनीं ।
हे नानापरिचे सुभक्ष बरवे सभ्दोज्य लाडू खिरी
जेवी रायपुरीसमेत रचिल्या नैवेद्य अंगीकरी ॥११॥
घेयीं दुग्धदधी सुलोणकढ हें हें आज्य हे जान्हवी
सायीं घे विविधापरी विरचिल्या म्यां माउली उत्सवीं
या कोशिंबिरिका अनेक रचिल्या देवी तुला तोषदा
मी तों अर्पितसे स्वभक्तिबिभवें संतृप्त तूं सर्वदा ॥१२॥
घे शुद्धोदक फार शीतळ असें हे पाटले चंपके
येलोशीर सुगंधयुक्त विलसे म्यां भाविले नेटकें ।
अंतः शीत करी तृषा परिहरी सर्वाग ही नीववी
आहे दिव्य सुधोपमान असले ! भूतांसि हे जीववी ॥१३॥
द्राक्षें आम्रफळें सजंबुफणसें अंजीर अक्रोट हीं
हे देवा दाम खजूर दाडिमफळें सीताफळें मिष्ट हीं ।
इक्षूकर्दळिकासमेत बरव्या या श्रीफळा अर्पितों
हे अंगीकरि गौतमी ! अतिशयें मीं बाळ जें भावितों ॥१४॥
घे तांबूल सुवर्णवर्ण असती हें नागवल्लीदळें
हें पूगीफळ युक्त दिव्यखदिरें चूर्णादिकें निर्मिलें ।
एला जाति लवंग कर्पुर अशा नानासुगंधें बरा
आहे युक्त म्हणोनि अंगिकरि तूं गंगे ! निवेदीं करा ॥१५॥
मेरु मंदर दक्षिणा भगवती नानाघनीं आकरीं
रत्नांच्या निकरीं समर्पण करी मीं, सर्व अंगीकरीं ।
सूर्यैदूपर तेज पूर्ण विलसे नीराजनें कोटिशा
मी बोवाळुनि गौतमी ! तव वपू पाहेन हे सद्यशा ॥१६॥
नाना कल्पसुमें विचित्र रचिली पुष्पांजुळी स्वीकरीं
मी हें तूज प्रदक्षिणा करितसे त्रैलोक्यराजेश्वरी ।
घे साष्टांग अनेक वंदन करीं दंडापरी सर्वदां
मी तों दीन अनन्य किंकर तुझा आतां न सोडी पदा ॥१७॥
माझे तों अपराध कोटिवरि ते होती निशींवासरीं
सारे सोसुनि बाळ मी म्हणुनियां स्नेहें स्वहस्तीं धरीं ।
तूं तों वाग्विषयातिदूर ! तुझिया स्तोत्रासि कैसा करुं
मीं तों मूढ म्हणोनि पादकमळा अच्छिन्नभावें स्मरुं ॥१८॥
केले म्यां उपचार स्वल्प परि ते संपूर्ण घे मानुनी
देवी ! त्र्यंबकराजमस्तकमणी तूं तो जगत्पावनी ।
आतां क्षीरनिधीसमेत बरव्या सद्धेममंचावरी
माझ्या हत्कमळाख्यमंदिरवरीं सानंद निद्रा करीं ॥१९॥
पूजा हे रचिली निरंजन अशा नामें कवीनायकें
श्रीमन्माधवनंदनें नर यया भावें पढे आयके ।
तो पूजाफळ पूर्ण पाउनि वरी गोदावरीपादुका
पापीही परि मुक्तियोग्य घडतो सद्भक्त हो ! आयका ॥२०॥
हे पूजा यशपुत्रलाभधन दे सत्कीर्ति दे मान्यता
या लोकीं सकळार्थसिद्धिफळ तें पावे पहा आयिता ।
स्वर्गी भोगुनियां अनेक सुख तें सेखीं हरीच्या पदा
पावे साधक हें प्रमाण कथितों सद्भाविकां सर्वदा ॥२१॥
इति श्रीनिरंजनमाधवयोगीविरचित श्री गोदावरीमानसपूजा समाप्त ॥
संपूर्ण श्रीसुंदरकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीरस्तु ॥ शुभमस्तु ॥