पद १.
संसार कैचा ज्ञानवंताला ? ॥ध्रु०॥
ज्ञानवंत भगवंतचि होउनि । फिरति जंगी जगदोद्धारणाला ॥१॥
भेद निरासुनि बोधरुप अनुभूति । सौख्यपर भोगिति त्याला ॥२॥
भक्तिविरक्ति समाधिस साधुनि । निश्चळ राहति आत्मरताला ॥३॥
शाम विभाउनि उन्मनि लाहुनि । निः संशयपद भोगिति त्याला ॥४॥
माधवनंदन बापदेवगुरु । पदभजनें सच्चिन्मय झाला ॥५॥
पद २.
अरे हरिरुप जगत्त्रय हें ॥ध्रु०॥
कांचन सर्वहि भूषण झालें । तद्वत चिन्मय हें ॥१॥
नामरुप निरसृनि पाहतां । अस्तिभाति प्रिय हें ॥२॥
माधवनंदन आत्मस्वरुपीं । व्यक्त करी लय हें ॥३॥
पद ३.
मनुजवरा विषयकाम वाढवूं नको रे ॥ध्रु०॥
क्षणिकचि संसार सुखी सार म्हणुनि गुंतलासि ।
भजन तंतु मना करुनि तोडवूं नको ॥१॥
कामलोभमोहबद्ध जाहलासि काय तरी ।
भावभक्तिधर्मकर्म बुडवूं नको ॥२॥
सद्गुरुसि शरण रिघुनि मरणजनन दुर करी ।
निरंजनी लाग भेद रुढवूं नको ॥३॥
पद ४.
तुला कशाला रे । हळहळ ॥ध्रु०॥
सृष्टिस्थितिसंहारकार तो । असे निराळा रे ॥१॥
जो करितो निज खेळ तयाची । चिंता तयाला रे ॥२॥
एकनिष्ठ भगवंतपदीं तूं । लावि मनाला रे ॥३॥
प्रारब्धाच्या करीं समर्पी । यया देहाला रे ॥४॥
विषय टाकि तूं ध्यानानिष्ठ भज । निरंजनाला रे ॥५॥
पद ५.
मजवरि कां अजुनि दया नये दयाधना ॥ध्रु०॥
पापि अजामीळ तारियला तां । गणिका ते वारांगना ॥१॥
पशु गजराज तयाप्रति धांवसी । काय तयाहुनी मी उणा ॥२॥
खग मृग अबला बाळा रक्षिसि । मज विसरसि कां चिद्धना ॥३॥
शरणपरायण किंकर तुझा । जाणुनि करि संरक्षणा ॥४॥
दीनदयाळ हे बिरुद जतन करि । तारा माधवनंदना ॥५॥
पद ६.
श्रीसुंदरं देवकीनंदनं भजे ॥ध्रु०॥
कालीयशासनं । कालमृत्यनाशनम् ॥१॥
त्रैलोक्यनायकं । भुक्तिमुक्तिदायकम् ॥२॥
गोपवृंदपोषणं । पापकंदशोषणम् ॥३॥
रासकेलिकौतुकं । वासुदेवनामकम् ॥४॥
नंदगोपबालकं । माधवेयपालकम् ॥५॥
॥ इति ज्ञानदेवाष्टकं संपूर्णम् ॥