' ब्रह्मैवाहं ' ह्नणोनी सतत जप करी सर्वसाक्षी सुखात्मा
सत्यज्ञानस्वरुपीं विलसत समुदा मीच आहें परात्मा ।
माझ्या ठायींच सारें प्रकटत जग हें पूर्णमायाविलासें
ऊर्मी नाना समुद्रीं प्रभवति पवनें तेंवि मी सर्व भासें ॥१॥
कुंभाकारेंचि माती घडुनि मिरविली भूषणाकार सोनें
मायाकारेंचि सारें जग घडुनि असें मीच हा सत्य जाणे ।
पाहूं जातां न माया किमपि तरि असे माझिया शुद्ध रुपीं
कोठें आहे म्हणावी लहरि तरि दुजी सांग अद्वैत - आपीं ॥२॥
नाहीं मातीपणीं या घट म्हणुनिं कदा दूसरा भाव जाणे
नाहीं सोनेपणीं या कधिंच निरखितां कुंडलाकार होणें ।
ना झाला सर्प रज्जू समज कधिं सहीं शुक्तिरुपें न झाली
भ्रांता दिग्भ्रांति तैशी सकळ ममरुपीं कल्पना हे उदेली ॥३॥
आकाशीं श्यामिका तें जल तरि दिसतें जेविं त्या रश्मिभागीं
तैसी हे कल्पना पैं अवचित उपजे नेच्छिली ही ममांगीं ।
पाहूं जातां तियेतें कवण म्हणुनियां कल्पना आढळेना
कल्पावें कोण त्यानें मजविण दुसरें कल्पितेंही असेना ॥४॥
वाणी वृत्ती मनाच्या मजहुनि समुद्या वर्तती दूर पाही
तोयीं त्या फेजजाला उपजुनि न पवे फेन तोयासि कांहीं ।
ऊर्णायू जेविं आहे सकळ रचुनियां जाल आत्मस्थतंतू
विस्तारोनी न गुंते अपुणाचि आपणामाजि खेळे स्वहेतू ॥५॥
दोहीं त्या कारणत्वें अपुणच मिरवे कार्य निर्मोनि तंतू
तैसा मी हेतु ऐसा समज शुभगुणा सर्वही मीच हेतु ।
ऐसें माझ्या विलासीं सकळहि रचलें दीसतां मी परात्मा
ना गुंते ना घडे मी अलगचि कलनातीत आहें महात्मा ॥६॥
आहे नाहीं असेंही विवरण करितां ठाव दोहींस नाहीं
आहे तैं बोलवेना नसलचि म्हणतां मीच हें विश्व पाही ।
ऐशा विज्ञानबोधें समरसुनि असें भिन्न नोहोनि भिन्न
आहे भिन्नत्वभावारहित अपुण मी सर्वसाक्षी अभिन्न ॥७॥
ऐशा तत्त्वावबोधा निरखुनि वसिजे आपुणीं आपणातें
पाहा संकेत आहे गुरुनिगदित हा वेदसिद्धांत मातें ।
या बोधें पूर्ण ऊर्मीविण जलनिधिसा वर्ततो निर्विकल्पें
सांगे ऐसा बनाजी कविवर सुजनां वेचतां कोटिकल्पें ॥८॥