Dictionaries | References

बुद्धिर्यस्य बलं तस्य ।

   
Script: Devanagari

बुद्धिर्यस्य बलं तस्य ।

   ज्याच्या जवळ बुद्धि असते तो बलवान असतो. त्याला पराक्रम करतां येतो. बुद्धिर्यस्य बलंतस्य ( यस्य बुद्धिर्बलं तस्य ) निर्बुद्धेस्तु कुतोबलम् । वने सिंहो मदोन्मत्तः शशकेन निपातितः ॥-पंच १.२३७. [ एका रानांत एक सिंह राहात होता. तो फार पशू मारुन खाऊं लागला. म्हणून सर्व श्वापदांनीं एकत्र जमून त्याच्याशीं आहाराकरितां रोज एक पशु पाठविण्याचा करार केला व पाळीपाळीनें एकेक पशु पाठवूं लागले. एके दिवशीं सशाची पाळी असतां तो मुद्दामच खूप उशीर करुन गेला. तेव्हां सिंह अगदीं क्षुधातुर होऊन अतिशय रागावला होता. एक लहान ससा पाहून त्यास फारच राग आला. तेव्हां त्यानें सशांस रागावून उशिराचें कारण विचारलें. तेव्हां त्यानें आपण लहान असल्यामुळें आणखी तीनचार ससे बरोबर घेऊन येत असतां वाटेंत एका सिंहानें आपणांस अडवून इतर सशांस खाऊन टाकलें व मी कसाबसा पळून येथें आलों, असें सांगितलें. त्यावर सिंहानें तो दुसरा सिंह कोठें आहे म्हणून विचारतांच त्यानें त्यास एका विहिरीवर नेऊन आंत पहावयास सांगितलें. तों त्यास पाण्यांत आपलेंच प्रतिबिंब दिसलें. तेव्हां त्यानें मोठी गर्जना केली. तिचा प्रतिध्वनि त्यास मोठयानें ऐकूं आला. त्याबरोबर त्यानें आंत उडी मारली व प्राणास भुकला. याप्रमाणें सशानें युक्तीनें सिंहास मारलें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP