* महत्तमव्रत
हे व्रत भाद्रपद शु. प्रतिपदेला करतात. यासाठी जटाजूटधारी, त्रिशूल, कपाल, कुंडिका यांनी युक्त, चंद्रधारी, त्रिनेत्री भगवान शंकराची सुवर्णमूर्ती त्या दिवशी स्थापन केलेल्या कलशावर ठेवावी आणि तिचे यथाविधी पूजन करावे. नैवेद्यात ४८ फळे अथवा मोदक अगर मिष्टान्ने ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा. १६ देवतांना, १६ ब्राह्मणांना देऊन १६ आपण घ्यावीत आणि
'प्रसीद देवदेवेश चराचर जगद्गुरो । वृषध्वज महादेव त्रिनेत्राय नमो नम: ॥
या मंत्राने प्रार्थना करून दूध देणारी गाय दान द्यावी. एकभुक्त राहून व्रत पूर्ण करावे. यायोगे सर्व पापांपासून मुक्तता मिळते; राज्य, धन, पुत्र, स्त्री, आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होते.
* मौनव्रत
हे व्रत भाद्रपद शु. प्रतिपदेला पूर्ण होते. श्रावण पौर्णिमेपासून हे चालू झालेले असते. त्या दिवशी नदीस्नान झाल्यावर कोमल दूर्वांकुरांच्या १६ गाठी घातलेला तातू करून त्याचे पूजन करतात व स्त्रिच्या डाव्य़ा हातात व पुरुषाच्या उजव्या हातात बांधलेला असतो. यानंतर महिनाभर पाणी आणणे, दळणे, नैवेद्य करणे वगैरे वेळी सर्वस्वी मौन पाळावे व भाद्रपद शु. प्रतिपदेला नदीस्नान करून नित्यकर्मे झाल्यावर देव, ऋषी, मनुष्य व पितरांचे तर्पण करावे. सदाशिवाची षोडशोपचारे पूजा करावी.
'जन्मजन्मांतरेष्वेव भावाभावेन यत्कृतम् । क्षंतव्यं देव तत्सर्वं शंभॊ त्वां शरणं गत: ॥
अशी प्रार्थना करावी.