* गिरिराज व्रत आणि पूजन
भाद्रपद शु. त्रयोदशीला हे व्रत करतात. या व्रतात गोवर्धन पर्वताची पूजा सांगितली आहे. या व्रताचे फल राजसूय व अश्वमेध यज्ञाच्या फलासमान आहे.
* दुर्गात्रिरात्र व्रत
हे स्त्रीव्रत आहे. भाद्रपद शु. त्रयोदशीला प्रारंभ करून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते. याचा विधी असा- तीन दिवस उपवास करावा. उमामहेश्वर, धर्म आणि सावित्री यांच्या मूर्ती दुर्वांमध्ये ठेवून त्यांची पूजा करावी. रात्रौ जागरण करावे. अखेरच्या दिवशी होम करून व्रताची समाप्ती करावी.
फल - धन, पुत्र व सौख्य यांचा लाभ.
* प्रदोषव्रत :
अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते ।
रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।
ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥'
अशी प्रार्थना करुन भोजन करावे.
सूर्यास्ताचे वेळी स्नान करून लाल जास्वंद, लाल गंध आणि धूपदीप आदी उपचारांनी पूजा करून प्रदोषकाळी एकवेळ जेवावे. जर या दिवशी 'शनिवार' असेल तर अधिक चांगले.