* गुर्वष्टमीव्रत
भाद्रपद शु. अष्टमीस गुरुवार आला असता गुरूच्या सुवर्ण मूर्तीची पूजा करावी, असा या व्रताचा विधी आहे.
*दूर्वाष्टमी
भाद्रपद शु. अष्टमीला हे नाव आहे. या दिवशी दूर्वाविषयी व्रत करावे, असे सांगितले आहे. या व्रतास दूर्वेसह गौरी, गणेश व शिव यांची पूजा करावयाची असते. अपत्यहीन स्त्रिया हे व्रत करतात. पूजा झाल्यानंतर आठ ग्रंथीनी युक्त असा दोरा डाव्या हातात बांधतात. पुढील श्लोकाने दूर्वेची प्रार्थना करतात-
त्वं दुर्वेऽमृतनामासि पूजितासि सुरासुरै: ।
सौभाग्यसन्ततिं दत्व सर्वकार्यकारी भव ॥
यथा शाखाप्रशाखाभिर्विस्तृतासि महीतले ।
तथा ममापि सन्तानं देहि त्वमजरामरम् ॥
अर्थ - हे दुर्वे, अमृत हे तुझे नाव आहे. तू देवदानवादिकांकडून पूजित आहेस. तू मला सौभाग्य आणि संतती देऊन सर्व कार्ये सिद्ध करणारी हो. ज्याप्रमाणे शाखाप्रशाखांनी तू पृथ्वीवर पसरतेस, त्याप्रमाणे मला अजरामर असे पुत्रसंतान दे. (माझा वंशवृक्ष तुझ्यासारखा शाखा - प्रशाखांनी युक्त कर. )
या व्रताचे दुसरे पर्याय व्रत.
भाद्र. सु. सप्तमीस उपास करावा. अष्टमीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून पवित्र जागी उगवलेल्या दूर्वांवर शिवलिंगाची पूजा करावी. शिवाला दूर्वा, शमी, पुष्पमाला वाहाव्यात. खजूर, खोबरे व महाळुंग यांचा नैवेद्य दाखवावा. अक्षतायुक्त दह्याचे अर्घ्य द्यावे. ब्राह्मणांना विविध फळांची वायने द्यावी. त्या दिवशी केवळ फलाहार करावा. उद्यापनाच्या वेळी पूजाहवन करावे. ब्राह्मणांना व आप्तेष्टांना तिळाच्या व कणकीच्या पदार्थांचे भोजन घालावे.
फळ - सौभाग्य व संतती यांचा लाभ व इच्छापूर्ती.
* महालक्ष्मी व्रत
भाद्र. शु. अष्टमीपासून ते आश्विन व. अष्टमीपर्यंत दररोज १६ चुळा भरून प्रात:स्नान करावे. चंदनाच्या काष्ठाची लक्ष्मीची मूर्ती स्थापन करून तिच्याजवळच सुताचा दोरा घेऊन त्याला १६ गाठी घालून त्याचा तातू करावा. त्यावेळी लक्ष्मीची पूजा करावी व लक्ष्म्यै नम: म्हणून प्रत्येक गाठीची पूजा करावी नंतर
धनं धान्यं धरांहर्म्यं कीर्तिसमायुर्यश: श्रियम् । तुरगान् दन्तिन: पुत्रान् महालक्ष्मि प्रयच्छ मे ।'
हा मंत्र म्हणून वरील दोरा उजव्या हातात बांधावा. हिरव्या दूर्वेची १६ पाने व १६ अक्षता हातात घेऊन कथा श्रवण करावी याप्रमाणे करून आश्विन व. अष्टमी दिवशी विसर्जन करावे.
* राधा अष्टमी
भाद्रपद महिन्याच्या दोन्ही पक्षांतील अष्टमींना 'राधा अष्टमी' असे म्हणतात. राधेच जन्म भाद्रपद शु. सप्तमीस झाला असे समजतात आणि अष्टमीच्या दिवशी तिची पूजा करतात. पूजाविधी असा-
प्रात:काली स्नानानंतर व्रतसंकल्प करावा व एका मंडलात मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश ठेवावा. त्यावर असलेल्या तांब्याच्या तामनात राधेची सुवर्णमूर्ती ठेवून तिला वस्त्रे वाहावीत. मग पूजा करून ती मुर्ती ब्राह्मणास दान द्यावी. शक्य असेल तर उपास करावा. काही लोक या व्रतात राधाकृष्णाची पूजा करतात.
फल - पापनाश