* अनंतव्रत
हे व्रत भाद्रपद शु. चतुर्दशी दिवशी करतात. यासाठी उदयव्यापिनी तिथी घेतात. पौर्णिमायुक्त असेल तर फल अधिक वाढते. कथेच्या अनुरोधाने जर मध्याह्नपर्यंत चतुर्दशी असेल तर उत्तम मानतात. व्रत करणार्याने त्या दिवशी प्रात:स्नान करून
'ममाखिलपापक्षयपूर्वक शुभफलवृद्धये श्रीमदनन्तप्रीतिकामनया अनंतव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून जागा सुशोभित करावी. चौरंगास कर्दळी लावून त्यावर साक्षात नाग अगर दर्भाचा बनवलेला सप्तफणांचा शेषस्वरूप अनंत याची प्रतिष्ठापना करावी. त्याच्यापुढे १४ गाठींचा रेशमाचा अनंतदोरक ठेवून आम्रपल्लवांसह पंचामृतादी धूप, दीप, गंध, फूल वगैरे षोडशोपचारांनी पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.
"नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर ।
नमस्ते सर्व नागेन्द्र नमस्ते पुरुषोत्तम ॥"
असा श्लोक म्हणून नमस्कार करावा, व
'न्यूनातिरिक्तानि परिस्फुटानि यानीह कर्माणि मया कृतानि ॥
सर्वाणि चैतानि मम क्षमस्व प्रयाहि तुष्ट: पुनरानमनाय ॥'
या मंत्राने विसर्जन करावे आणि
'दाता च विष्णुर्भगवाननन्त: प्रतिगृहीता च स एव विष्णु: ।
तस्मात्त्वया सर्वमिदं ततं च प्रसीद देवेश वरान् ददस्व ॥'
या मंत्राने वाण द्यावे बिनमिठाचे पदार्थ खावेत. .
* कदलीव्रत
भाद्रपद शु. चतुर्थी दिवशी केळी (कर्दळी ) च्या झाडाखाली बसुन अनेक प्रकारच्या फळा - फुलांनी व धूप - दीप दाखवून त्याची पूजा करावी. सप्त धान्य, रक्तचंदन, घृतदीपक, दही, दूध अक्षता, वस्त्र, तुपात तळलेला नैवेद्य, जायफळ, सुपारी व प्रदक्षिणा यांनी अर्चना करून
'चिन्तयेत्कदलीं नित्यं कदलै: कामदीपितै: ।
शरीरारोग्यलावण्यं देहि देवि नमोऽस्तु ते ॥
अशी प्रार्थना करावी. याप्रमाणे ३ अगर ४ महिने केल्यास त्या वंशात स्त्री पातकी निघत नाही व सर्व पुत्रपौत्रादींसह सुदैवी व सदाचारिणी होतात.
* पालीव्रत
भाद्र. शु. चतुर्दशी दिवशी चारी वर्णांपैकी कुणीही कुलस्त्रीने जलाशयावर जाऊन अक्षता घेऊन त्याचे मंडल करावे. त्यावर वरुणाची मूर्ती अथवा वारुण यंत्र स्थापन करावे. त्याची गंध-फुलांनी पूजा करावी.
'वरुणाय नमस्तुभ्यं नमस्ते यादसां पते ।
अपांपते नमस्तुभ्यं रसानां पतये नम: ॥'
या मंत्राने अर्घ्य द्यावा आणि
'माक्लेदं मा च दौर्गन्ध्यं वैरस्यं मा मुखेऽस्तु मे ।
वरुणो वारुणीभर्ता वरदोऽस्तु सदा मम ॥'
अशी प्रार्थना करून ब्राह्मणांना भोजन घालावे व मग स्वत: जेवावे.
* गाज खोलना
हे दोरा विसर्जनाचे व्रत आहे.