* कटिपरिवर्तनोत्सव
भाद्रपद शु. एकादशीला भगवंताचा कटिपरिवर्तन ( कूसबदल ) उत्सव करतात. त्या दिवशी 'देवप्रबोधिनी' एकादशीप्रमाणे सर्व विधी करतात. देवाला स्नान, रथयात्रा वगैरेसह समारंभाने आणून सायंकाळी महापुज व नीरांजनांनी आरती करून रात्री देवास उजव्या कुशीवर निजवावे व जागरण करावे. दुसरे दिवशी सकाळी '
'वासुदेव जगन्नाथ प्राप्तेअयं द्वादशी तव । पार्श्वेन परिवर्तस्व सुखं स्वापिहि माधव ॥'
अशी प्रार्थना करून पारणे सोडावे. राजपुतान्यात या उत्सवाला' जलझूलनी' असे नाव असून सामान्यपणे अथवा विशेष प्रकाराने हा साजरा करतात.
* कर्मावर्मा
हे व्रत उत्तरभारतात प्रचलित आहे. हे व्रत भाद्र. शु. एकाद्शीस सायंकाळी करतात. या दिवशी बायका आपल्या परसात दोन खळगे करून एकात पाणी व दुसर्यात दूध ओततात. त्या दोन खळग्यांच्या मध्यभागी कुशतृणाचे रोप लावतात. जितके भाऊ असतील, तितकी कुशाची पाती आपल्या केसात खोचतात. विष्णूची पूजा करून केवळ फलाहार करतात. दुसर्यादिवशी खळग्यातले दूधपाणी, कुश, निर्माल्य सर्व नदीत नेऊन सोडतात. ब्राह्मणाला शिधा देतात व व्रताचे पारणे करतात. या व्रतामुळे स्वत:च्या व बंधूंच्या सर्व आपत्ती दूर होतात, अशी समजूत आहे.
शुक्लैकादशी
भाद्रपद शु. पद्मा एकादशीला पहाटे प्रात:स्नानादी कृत्ये झाल्यावर भगवंताची यथाविधी पूजा करावी. उपवास करून रात्री हरिजागरण करावे व दुसरे दिवशी पूर्वान्ही (सकाळी) पारणे करावे जर सकाळी श्रवणनक्षत्राच्या मध्याच्या २० घटिका असतील तर भोजन करू नये. तसेच, जर मध्यान्हीच्या पुर्वी श्रवणाचा मध्य अंश नसेल, तर पाणी पिऊन पारणे करावे.
जर या दिवशी श्रवणनक्षत्र असेल तर या एकादशीला 'विजया एकादशी' म्हणतात. या व्रताने सर्व मनोरथ पूर्ण होतात. या दिवशी 'श्रीवामना'ची पूजा करतात. व्रत करणार्याने त्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर 'श्रीवामना'ची सोन्याची मूर्ती करून तिची गंधफुलांनी यथाविधी पूजा करावी व त्यावेळी 'मत्स्य, कूर्म, वराह' आदी नामांचा उच्चार करावा. रात्री जागरण करावे. दुसरे दिवशी असलेले देय द्रव्य ब्राह्मणांना दान देऊन, त्यांना भोजन घालून नंतर आपण स्वत: जेवावे व व्रताची सांगता करावी.