* अदु:खनवमी
'अदु:खनवमी' हे भाद्र. शु नवमीचे नाव. विशेषत: स्त्रिया हे व्रत करतात. व्रतावधी नऊ वर्षांचा. व्रतदेवता गौरी असते. उपास, पूजा, जागरण या तीन्ही गोष्टींना या व्रतात महत्त्व आहे. स्त्रिया प्रात:काळी नदीवर स्नान करून मौन धरून घरी येतात. कलशावर पूर्ण पात्रात गौरीची स्थापना करतात. नंतर पूजा, वायनदान, उपोषण शक्य नसल्यास हविष्यान्न भोजन, रात्री नृत्य, गायन, कथाश्रवणादी कार्यांत जागरण; दशमीस देवीची उत्तरपूजा, विसर्जन, दंपतीभोजन व व्रतसंपूर्ती. नऊ वर्षे पूर्ण झाल्यावर उद्यापन. सुवर्णगौरी-प्रतिमेची पूजा व दान. तीळ. घृत. पायस यांचे हवन. नऊ दंपतीस वायन व भोजन.
* नंदानवमी
भाद्र. शु. नवमी दिवशी (नंदानवमी) दुर्गादेवीची यथासांग, यथाविधी पूजा करावी म्हणजे विष्णूलोक प्राप्त होतो. व्रत करणार्याने शु. सप्तमीला एकवेळ जेवावे, अष्टमीला उपवास करून दुर्गादेवीला दूर्वांवर स्थापन करून फळाफुलांनी पूजा करावी. रात्री
'ॐ नंदायै नम: स्वाहा हूं फट'
या मंत्राने जप व जागरण करावे. नंतर नवमी दिवशी सकाळी चंडिकादेवीची, गुरूची व कुमारीची पूजा करून भोजन करावे. स्नान व पिण्यासाठी कुशोदकाचा उपयोग करावा. या प्रमाणे शु. ७, ८ व ९मीस चार वर्षेपर्यंत करावे.
* भागवत सप्ताह व्रत
भागवत सप्ताहाचा श्रवण विधी व दीक्षाविधी
हे कलियुगातील मोक्षदायी व्रत आहे. हे व्रत भाद्रपद शु. नवमीस सुरुवात करून पौर्णिमेस संपवितात. भागवत सप्ताहाच्या कथेला भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, आषाढ हे सहा महिने योग्य असून श्रोत्यांना मोक्ष देणारे आहेत. तथापी भगवद्भक्ताला इच्छा होताच शुभदिन पाहून सप्ताहास सुरुवात करता येते, असे शुक्राचार्यांना सांगितले आहे.
ही भागवतकथा कृष्ण निजधामास गेल्यानंतर पुढे तीस वर्षांनी कलियुगात प्रथम शुक्राचार्यांनी राजा परीक्षितास भाद्रपद शु. नवमीस सांगण्यास प्रारंभ केला. नंतर दोनशे वर्षांनी आषाढ व श्रावण शु. नवमीस गोकर्णाने ही कथा सांगण्यास आरंभ केला. पुढे तीस वर्षांनी कार्तिक शु. नवमीपासून ब्रह्मपुत्र सनत्कुमारादी मुनींनी भागवतकथा वाचण्यास सुरुवात केली. या चार महिन्यांत विशेष अधिकारी पुरुषांनी सप्ताह केल्यामुळे त्या काळास पुण्यवत्ता आहे. म्हणून ते प्रशस्त मानले आहेत. आश्विन महिना चातुर्मास्यान्तर्गत असल्यामुळे तो महिना प्रशस्त आणि मार्गशीर्ष भागवद्विभूतिरूप आहे, म्हणून तो प्रशस्त.
'सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा.' (पद्मपुराण )
या भागवत पुराणात सामान्य सृष्टी, विशेष सृष्टि, संरक्षण, सृष्टिपोषण, कर्माची वासना, मन्वन्तरातील आचारधर्म, परमेश्वरी लीला, सृष्टिसंहार, मोक्ष आणी ईश्वरस्वरूप अशा दहा विषयांचे विवेचन केलेले असून सांप्रत ज्ञानादिक धर्माचा विचार करून योगवेत्त्यांत श्रेष्ठ अशा व्यासमुनींनी हे आश्चर्यजनक आणि अद्भूत कथानक लिहून ठेवले आहे. ही भागवतसंहिता रचल्यानंतर त्यांनी ती आपला पुत्र शुक्राचार्य यांस सांगितली. असे हे लोककल्याणकारी भागवत पुराण आहे. सर्व यज्ञांहून, सर्व व्रतांहून, सर्व प्रकारच्या तपश्चर्यांहूनही या भागवत सप्ताहाची महती विशेष आहे. म्हणून भगवद्भक्त या कथेचे श्रवण सतत करीत असतात.
कलियुगात अन्य मार्गांनी ज्ञानप्राप्ती अशक्य असल्यामुळे ज्ञानोपदेशाचा विशेष प्रकार भागवतात शुक्राचार्यांनी सांगितला आहे. ही भागवतकथा सात दिवसांत पुरी करावी. त्याला सप्ताह पारायण म्हणतात. या सप्ताहप्रसंगी वैषयिक वृत्ती जिंकलेल्या असाव्यात. मौनादी नियम व वर्णाश्रमादी आचार पाळावे व शक्य असल्यास यज्ञाप्रमाणे सप्ताह पारायणाबद्दल दीक्षा ग्रहण करावी.
कथाश्रवणाला आप्त, स्नेही, भाऊबंद व कथाप्रेमी इत्यादिकांना नम्रपणे निमंत्रण करावे. कथाश्रवणाला तीर्थस्नान, वन व घर ही चांगली स्थाने आहेत. जागा गाईच्या शेणाने सारवावी. बसण्यास चांगले आसन असावे. सप्ताहाची जागा गुढ्या-तोरणे यांनी सुशोभित करावी. सप्ताहाच्या पूर्वदिवशी वक्त्याने क्षौर करावे. नंतर दुसर्या दिवशी अरुणोदयकाली प्रातर्विधी उरकून घेऊन स्नानसंध्यादि आन्हिक कृत्ये उरकून घ्यावीत. कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून गणपतीची पूजा करावी. पितरांना तर्पणादी विधींनी तृप्त करून शरीरशुद्धयर्थ प्रायश्चित आचरावे. नंतर मंडलाकर भूमी शुद्ध करून तीवर ब्रह्मादि मंडल देवतांसह कृष्णाची स्थापना करावी. नंतर त्याची समंत्र पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालाव्या, नमस्कार करावा, प्रार्थना करावी. नंतर मोठ्या समारंभाने भागवतग्रंथाची यथाविधी मंत्र म्हणून पूजा करावी. नंतर हातात नारळ घेऊन प्रसन्न अंत:करणाने पुन्हा प्रार्थना करावी व श्रीभागवतग्रंथापुढे तो नारळ ठेवून नमस्कार करावा. कथा निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून पाच ब्राह्मणांची पूजा करावी. वेदाच्या पुर्वी उच्चारला जाणारा 'ॐ' हा प्रणव, वेदाची माता
'तत्सवितुर्वरेण्यं'
हा गायत्रीमंत्र व 'सहस्रशीर्षा' हे पुरुषसूक्त, ही तीन मिळून भागवत ग्रंथ आणि
'ॐ नमो भगवते वासुदेवाय'
हा द्वादशाक्षरी मंत्र निर्माण झाला. म्हणून 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा. सूर्योदयापासून साडॆतीन प्रहरांपर्यंत कथा वाचावी. दुपारी दोन घटका विराम करून नंतर कथाप्रसंगानुसार भगवान विष्णूच्या गुणांचे कीर्तन करावे. वक्त्याला मोठे उंच असे आसन द्यावे. वक्त्याचे तोंड उत्तरेकडे असल्यास श्रोत्यांनी पूर्वाभिमुख बसावे. वक्ता पूर्वाभिमुख बसला असल्यास श्रोत्यांनी उत्तरभिमुखी बसावे. वक्ता विरक्त, विष्णुभक्त, ब्राह्मण, वेद व शास्त्र यांच्या अध्यनाने अंत:करण शुद्ध झालेला, कथा सांगण्यात निपुण, पंडित, पंडित बोलण्यात प्रवीण व अत्यंत नि:स्पृह असा असावा. अशाच वक्त्याची योजना करावी. अनेक प्रकारचे धर्म ऎकून जे भ्रमिष्टासारखे झाले आहेत, जे स्त्रीलंपट, नास्तिक; पाखंडी आहेत, ते जरी विद्वान, पंडित असले तरी, त्यांची भागवताचे प्रवचन करण्यास योजना करू नये. वक्त्याला साहाय्य करण्यासाठी अशाच अधिकाराचा दुसरा वक्ता बाजूस बसवून ठेवावा.
कथासप्ताह चालू असता काही नियम पाळावयाचे ते
एकवेळ हविष्यान्न भोजन करावे. रात्री दूधसाखर घ्यावी. ब्रह्मचर्याने राहून भूमीवर शयन करावे. पत्रावळीवर भोजन करावे. वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरू, गोसेवक, स्त्री, राजा यांची निंदा करू नये. रजस्वला स्त्री, अंत्यज, म्लेंच्छ, पाखंडी यांच्याशी भाषण करू नये. धनहीन, पुत्रहीन, क्षयरोगी, पापी व मुमुक्षू यांनी कथा श्रवण केली असता त्यांना शुभफल मिळते.
सप्ताह समाप्तीनंतर पोथीची व वक्त्याची पूजा करावी. श्रोत्यांन प्रसाद म्हणून तुळशीच्या माळा वाटाव्यात. नंतर टाळ, मृदंग वाजवून तालासुरावर श्रीहरीच्या नामाचा घोष करावा. समाप्तीच्या दुसरे दिवशी व्रताची सांगता होण्यासाठी गीतापाठ करावा. श्रोता(यजमान) गृहस्थाश्रमी असल्यास त्याने होमहवन करावे. हवनाचे सामर्थ्य नसल्यास त्यास लागणारे पदार्थ ब्राह्मणास दान द्यावे. शक्ती असल्यास ब्राह्मणास सुवर्णाची गाय दान द्यावी. यजमान सामर्थ्यवान असल्यास बारा तोळ्यांचे सुवर्णाचे सिंहासन तयार करून त्यावर भागवत पोथी ठेवून षोडशोपचारे दक्षिणेसह पूजा करावी व ते सिंहासन पोथीसह इंद्रियनिग्रही अशा आचार्याला अर्पण करावे. सप्ताहामधील होमफलप्राप्त्यर्थं व वक्त्या-श्रोत्यामधील दोष दूर व्हावे याप्रीत्यर्थ विष्णूसहस्रनामाचे पठण करावे. त्यायोगे सप्ताहामधील सर्वदोष दुर होतात.
उद्यापन - कृष्णाष्टमीचे व्रताचे जसे उद्यापन करतात, त्याप्रमाणे भागवतकथाश्रवणाचे उद्यापन करावे. दारिद्र्यामुळे एखाद्या भक्ताला उद्यापन करण्याची शक्ती नसेल तर त्याने ते करू नये. केवळ श्रद्धेने, निष्काम भावनेने भागवतकथेचे श्रवण केले असल्यास उद्यापनाची आवश्यकता नाही.
श्रीमद्भागवत हे सर्व पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे. या भागवताचे भक्तीने श्रवण किंवा पठण करून विचार करणारा मनुष्य मुक्त होतोच होतो. हा भागवतरस स्वर्गात, सत्यलोकी व कैलासामध्ये, त्याचप्रमाणे वैकुंठातही मिळणार नाही. म्हणून भाग्यवान माणसाने याचे प्राशन अवश्य करावे.
फलश्रुति
ज्याच्या घरी नेहमी भागवतकथा चालते, त्याचे घर तीर्थाप्रमाणे पुण्यकारक आहे. त्याच्या घरी जे जे लोक राहतात. त्यांचे पाप समूळ नाश पावते. हजार अश्वमेधयज्ञ, शंभर वाजपेय यज्ञ यांहूनही या भागवतकथाश्रवणाचे फल श्रेष्ठ आहे. जो कोणी या भागवतकथेचे अहोरात्र अर्थपूर्वक पठण करील त्याची कोट्यवधी जन्मांतील पातके नाश पावतील. तसेच या भागवतातील अर्धा किंवा पाव श्लोक पठण करील त्याला राजसूय किंवा अश्वमेघ यज्ञाचे फल प्राप्त होईल व अंतकाळी याचे श्रवण केले अस्ता, वैकुंठलोक प्राप्त होतो. श्रीमद्भागवतपुराणश्रवणाने ज्ञान, वैराग्य व भक्ती यांची प्राप्ती होते. तसेच, धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते.