सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८०१ ते ८५०
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
तस्मात् कांहीं साधनाविण । सुषुप्तिसुख असें गहन ।
अमुक एक प्रयोजन । पाहिजे ऐसें नाहीं ॥१॥
जैसी पतिसंगे पतिव्रता । सुखैक भोगितसे तत्वतां ।
व्यापार सर्वही नेणतां । बहिरंतरीचे ॥२॥
घरधंदा हें बहिर्व्यापार । आंतील तांबुलादि शृंगार ।
या दोहींचाही पडे विसर । मैथुनकाळीं ॥३॥
तैसा जागृतीचा व्यापार वृत्तीनें । आणि स्वप्नींचाही भास नेणें ।
एक आत्मसुखीं समरसणें । त्यागुन द्वैता ॥४॥
मैथुनकाळीं कामिनीसी । अंतर्बहिर्नेणवे शब्दासी ।
तेवीं आलिंगन पडे वृत्तीसी । स्वप्न जागर न स्मरे ॥५॥
हेंही बोलणें द्वैताचें । सुषुप्तींत सुखग्रहण तरी कैचें ।
एक निवर्तन नव्हे नेणिवेचें । ह्मणोनि बोलावें ॥६॥
असो रविदत्ता या निरोपणीं । सावध अससी कीं अंतःकरणीं ।
अस्ति भाति प्रियत्व तिन्ही । सुषुप्तींत आले ॥७॥
स्वप्न जागृती दोन्ही नसती । भाति प्रियांतही मावळती ।
तरी त्या अवस्था सत्य होती । कोणे काळीं तरी ॥८॥
तस्मात् जागृति स्वप्न असतां । उभयांसीही न ये सत्यता ।
अस्तित्वेंवीण भाति प्रियता । असे कवणासी ॥९॥
भ्रमेंच जरी आहेसें मानिलें । तरी काय तेथें सत्यत्व आलें ।
वृक्षस्थें पडिलिया जरी देखिलें । तरी काय जळीं खरा ॥१०॥
डोळे झांकितां पडिला न दिसे । तेव्हां मावळून वृक्षस्तीं समरसे ।
मा पाहतां काय जळीं असे । खरा पडिला ॥११॥
तैसी जागृति स्वप्नव्यापारा । सत्यता नये सुप्तीमाझारा ।
मा असतां काय हा भास खरा । सत्यत्वें जाला ॥१२॥
हे असो स्वप्नजागृती । जालीच नाहीं ना होणार पुढती ।
तरी काय वास्तविक हे सुषुप्ति । होईल तिहीं कालीं ॥१३॥
कार्य जें का प्रत्यक्ष दिसलें । तें विवेकें मिथ्या केलें ।
मा त्याचें कारण जें अनुमानिलें । तें सत्य कैसें ॥१४॥
कारण अज्ञान तों निःशेष नसे । कार्यामुळें मानिजे आहेसें ।
तें कार्यचि जालिया वायसें । तरी कारण तें कोठें ॥१५॥
देहादिकां आपणसें मानिलें । तेव्हा जाणावें विस्मरण आपुलें ।
त्या देहद्वयाचें मीपण त्यागिलें । तरी उरे केंवी अज्ञान ॥१६॥
जळीं पडिलाचि नाहीं खरा । तरी नेणपणासी कैंचा थारा ।
तेवीं मिथ्यत्व येतां उभय व्यापारा । अज्ञान नाहींच ॥१७॥
परी सत्य आपण नेणिवेपरता । वृत्तीस कळावें अपरोक्षता ।
तेव्हांचि हे देहद्वय असतां । मिथ्या स्फुरती ॥१८॥
जरी गुरु शास्त्राचे वचनीं । मिथ्या मानिलें विश्र्वास ठेवूनी ।
तरी ते नव्हे मिथ्या असोनि । स्वानुभवावीण ॥१९॥
तो स्वानुभव जागृतींत यावा । आपण निजात्मा । हा प्रत्यय व्हावा ।
तरीच देहाचा मीपणा जावा । निपटूनियां ॥८२०॥
तें निरोपण पुढें तुज । कीजेल तया रीती समज ।
येथें बोलिलें असे सहज । सत्य मिथ्या कळावया ॥२१॥
तिहीं काळीं जें एकरूप आहे । तो आत्मा सत्य विवेकें पाहे ।
केव्हां न राहे । तें तें मिथ्या अनात्मा ॥२२॥
जागृतीमाजीं स्वप्नजागृति । निःशेषच हरपून जाती ।
तस्मात् एक होता दोन्ही मावळती । ह्मणोनि अवस्था मिथ्या ॥२४॥
आत्मा जो अस्ति भाति प्रिय तिहीं अवस्थेत एकला अद्वय ।
तस्मात् सत्य आत्मा हा निश्चय । विवेकें निवडावा ॥२५॥
एवं असज्जडदुःखरूप अनात्मा । वृत्त्यादि देहांत भास जीवात्मा ।
आणि एक मुख्य ब्रह्मप्रत्यगात्मा । अस्तिभातिप्रियात्मक ऐसे सत्य मिथ्या दोन्ही ।
यथार्थ निवडिले निरूपणीं । हेंचि विवेचन मुमुक्षूंनीं । अत्यादरें करावें ॥२७॥
येथेंही रविदत्ता कोणाची । आशंका असे मंदप्रज्ञाची ।
तेचि अवधारी आधीं साची । पुढें उत्तर बोलूं ॥२८॥
दोनची पदार्थ निवडिले । सत्यमिथ्या हे वेगळाले ।
या दोहींतून अज्ञान जालें । तेंचि कवणा ॥२९॥
दृष्टांतही जो दिधला । जळीं बुडे आणि वृक्षीं बैसला ।
हेही दोनची परि विस्मर जाला । वृक्षीं बैसणारा ॥८३०॥
जळीं पडला तो नाहींच खरा । तेथें भाव नसे स्मरविस्मरा ।
तस्मात् वृक्षीं जयासी असे थारा । तोचि विसरला आपण तैसें स्थूलादि तों हें जड असे ।
वृत्त्यादि चंचल पाणिया ऐसें ।
त्यांत प्रतिबिंब जीव हा आभासे । हें तरी मिथ्या ॥३१॥
तयासी जाणणें कोठें खरें । कीं तो मुख्य आत्मया विसरें ।
तस्मात् मुख्य आत्मा जो निर्विकारें । तयासीच अज्ञान ॥३३॥
आत्मा आपआपणा विसरला । जीवाकडे पाहूं लागला ।
त्यासीच मी म्हणून बैसला । तस्मात् अज्ञान आत्मा ॥३४॥
ऐशी मंदप्रज्ञाची आशंका । येणें निर्विकारा आला झोंका ।
तरी याचें उत्तर सावध ऐका । जे जे श्रवणार्थी ॥३५॥
हें निरूपण उपक्रमी । प्रांजळ केलें असे आम्ही ।
तथापि हा संशय अंतर्यामीं । फिटावया बोलूं ॥३६॥
वृक्षीं बैसलिया जाली विस्मृति । हे सत्य परी पहावी पुरती ।
पहिली सर्वांगदेखणी दशा होती । नेत्र झांकितां कीं उघडितां आंधारी आपआपणा ।
प्रत्यक्ष जरी दिसेना । परी नखशिखांत असे देखणा । हा मी म्हणोनी ॥३८॥
ऐसिया सामान्य देखणिया । विशेष देखणेंही बोलणें वांया ।
तेथें विस्मरण पडलें कैसिया । परी सांगा ॥३९॥
सामान्य नखशिख जो देखतां । तेथें नेत्र उघडोनि पाहता ।
तेंचि एकदेशी पाहणें खालुता । मुख्य सामान्य हें नव्हे ऐसें एकदेशी पाहणें उद्भवले ।
तया पाहण्यासी विस्मरण जाईलें ।
हे दोन्हीही असती नाथिले । पुरुषाच्या ठायीं ॥४१॥
ऐसें एकेदशी जरी पाहतसे । परी बैसला त्यांचें विस्मरण नसे ।
विसरेच तरी मुंगी कळतसे । स्पर्शतां तें कवणा ॥४२॥
मी पडलों मज काढा म्हणे । विसरे तरी केवीं होय बोलणें ।
तस्मात् सर्वांगी जें असें देखणें । तया लोप नाहीं ॥४३॥
तस्मात् सामान्य देखणेंदशेसी । विकार नव्हे निश्चयेंसी ।
आणि जळींही पडलियासी । स्मर ना विस्मर ॥४४॥
मध्येंच तिसरे जालें उत्पन्न । तेंचि कीं पडणारासी कारण ।
हाचि दृष्टांत समान । विचारें पहावा ॥४५॥
किंचित् वृत्तीचे स्फुरण नसतां । वृत्ति अभावाचा जो जाणता ।
तेथें ज्ञान कीं अज्ञान वार्ता । लावी कवणा ॥४६॥
तेथें न होऊन स्फुरण जालें । जैसे रज्जूवरी सर्प उमटले ।
तेचि माया तयें नाथिले । पण अनादि ॥४७॥
निर्विकार जो सामान्य देखणा । जैसा तैसा परिपूर्णपणा ।
त्या अनंतरूपी माया स्फुरणा । उद्भव जाला ॥४८॥
जितुकें स्वरूप सच्चिद्धन । तितुकें जरी होतें स्फुरण ।
तरी हें स्वरूपाचें लक्षण । म्हणों येतें ॥४९॥
समुद्रामध्ये जैशी राई । इतुकी स्फूर्तीची असे नवाई ।
तेही वंध्यापुत्राची आई । जाहली ना होणार पुढें ॥८५०॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2010
TOP