मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ११०१ ते ११५१

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ११०१ ते ११५१

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


क्रिया व्यवहार जितुके । बहुधाही बुद्धीचे तितुके ।
जीव आभासरूपें सर्व निकें । भासविलिया होती ॥१॥
पूर्वींचे इश्र्वरनिर्मित । रूपादि हे पदार्थजात ।
जयासी ईक्षणादि प्रवेशांत । म्हणे श्रति ॥२॥
ईक्षण म्हणजे अवलोकन । करी मायावी ईशान ।
तया इच्छेसरिसें निर्माण । होतें जालें ॥३॥
गुण भूतें निर्माण जालीं । जयेतें अष्टधा प्रकृति बोलिली ।
ते अविद्याचि जडत्वा आली । स्थूल सूक्ष्म ॥४॥
आकाश वायु तेज आप । पांचवें पृथ्वीचें रूप ।
यया भूतांपासून नामरूप । बहुधा जालें ॥५॥
भूतांपासून जे जालें । भौतिकत्व वेगळालें ।
परी तें भोग्य भोक्तृत्वें निवडिलें । चंचळ जड ॥६॥
जडत्वें चारी खाणी होती । साकारत्वें भिन्न भिन्न व्यक्ति ।
ब्रह्मादि तृणांत जगतीं । सान कीं थोर ॥७॥
हे पंचीकृत भूतांचे जालें । जें पूर्वी उपक्रमी सांगितलें ।
त्यांत अपंचीकृत मिळालें । सूक्ष्म तत्व ॥८॥
इतुकेंही ईशें पाहून । म्हणे हें सर्व जड मजविण ।
चलन न पावती तरी आपण । प्रवेशावें अंतरीं ॥९॥
मग ईश्र्वरें रूप आपुलें । आच्छादुनी जीवत्व घेतलें ।
तेंचि चहूंखाणींत प्रवेशलें । तेव्हां व्यापारती सर्व ॥१०॥
ते व्यापार तितुके जीवाचे । पुढें अनुक्रमें बोलिजे वाचे ।
परी प्रवेश होय निर्मित ईशाचें । ईक्षणापासूनी ॥११॥
आकाशी शब्द स्पर्श वायूचा । तेजाचें रूप रस विषय आपाचा ।
गंध तो जाणावा पृथ्वीचा । एवं ही पंचभूतें ॥१२॥
भौतिकत्वें ज्या चारी खाणी । अथवा तृणांत आदिकरूनी ।
या सर्वांमाजीं विषयश्रेणी । पंचधा असती ॥१३॥
साकार जितुकें रूपासि आलें । तें नेत्रासी दृश्य जाईलें ।
म्हणोनि रूपादिनाम असें ठेविलें । रूप तेथें चारी ॥१४॥
नाम कल्पना असे जीवाची । परी ओळखी व्हावी लागे रूपाची ।
म्हणोनि बोलावें वाउगेंची । अमुक नामें म्हणोनि रूप तेथें शब्द असे ।
स्पर्शही तेथेंच वसतसे । वास्तव्य केलें गंधरसें ।
म्हणोनि भौतिकत्व ॥१६॥
श्रोत्रामुळें शब्द हें नाम । त्वचेस्तव स्पर्शासि उद्रम ।
चक्षूसाठीं रूपाचा अनुक्रम । रस जिव्हे प्रीत्यर्थ ॥१७॥
घ्राणामुळें गंध जाला । एवं पंचधा भाव जीवें कल्पिला ।
परी ईश्र्वरें पदार्थमात्र निर्णिला । तेथें पंचविषया वस्ती ॥१८॥
स्वर्ग मृत्यु लोक पाताळीं । जितुकें ब्रह्मांड अधोर्ध्व स्थळीं ।
सर्वीं या पंचभूतां वेगळीं । अणुही असेना ॥१९॥
पांचावेगळा पदार्थ सहावा । नाहींच नाहीं न दिसावा ।
तस्मात् ब्रह्मगोळ जो हा आघवा । पंचभूतात्मक ॥२०॥
पृथ्वीआदि हीं मुख्य भूतें । आणि भूतांपासून भौतिकें समस्तें ।
हे उभयही अनुक्रमें राहते । जाले ब्रह्मगोळीं ॥२१॥
असो इतुकेंही ईशानिर्मित । रूपादि विषयात्म समस्त ।
हें दृश्य परी अबाधित । अतीत बंध मोक्ष ॥२२॥
कवणासी बांधी ना सोडवी । उगीच निर्बाधरूपें असावी ।
यावरी बंधनरूपता उभवावी । कल्पित जीवें ॥२३॥
सहजरूपादि हें निर्माण । याच्या ठायीं जीव हा आपण ।
उभवितां जाला दोषगुण । तेणेंचि बंध पावला ॥२४॥

गुणदोषादिविकल्पाबुद्धिगाःक्रियाः ॥

जीवकृत म्हणजे बुद्धीनें केलें । व्यापारादि नामभेद कल्पिले ।
तेंचि क्रियात्मक पाहिजे ऐकिलें । मुमुक्षें त्यागार्थ ॥२५॥
गुण म्हणजे हें हें चांगुलें । हें ओंगळ तें तें दूषिलें ।
येणेंरीतीं जीवें कल्पिलें । गुणदोषात्मक ॥२६॥
हे प्रिय पदार्थ हे अप्रिय । हें सुखकर हें दुःखद होय ।
हे अनुपयोगी हे हे उपाय । गुणदोष कल्पना ॥२७॥
हे पुण्यात्मक असती । हे पापात्मक ओळखिती ।
हे ग्राह्य हे अग्राह्य असती । हे गुणदोष कल्पना ॥२८॥
हे वंद्य निंद्य उंच नीच । हे सफळ हे निर्फळ आहाच ।
हे थोर सानसे उगेच । हे गुणदोष कल्पना ॥२९॥
हे सुंदर हे ओखटे । हे हे श्रीमान हे करंटे ।
हे वडील हे असती धाकुटे । हे गुणदोष कल्पना ॥३०॥
हे सजातीय हे विजातीय । हे चंचळ हा जड प्रकार होय ।
ही स्त्री नपूंसक पुरुष होय । हे गुणदोष कल्पना ॥३१॥
हे स्वकीय हे परके । हे आप्त माझे हे येर असिके ।
हा मी तो तूं हें हें निकें । हे गुणदोष कल्पना ॥३२॥
हे स्वामी हे सेवक । हा राजा हे येर रंक । हा अधर्मी हा धार्मिक ।
हे गुणदोष कल्पना ॥३३॥
हे कीटक ओंगळ अधम । हे पतंगादि मध्यम ।
हे पानकिडे किती उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३४॥
हे हिवरादि वृक्ष अधम । बोरी बाभळी हे मध्यम ।
धात्री शमी पिंपळ उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३५॥
काउळे होले हे पक्षी अधम । चिमण्या साळ्यादि मध्यम ।
रांवे नीळकंठादि उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३६॥
हे श्र्वानशुकरादि अधम हे गायहरिणादि उत्तम ।
हे गुणदोष कल्पना ॥३७॥
हे अंत्यजादि अधम । हे क्षुद्र गोपादि मध्यम ।
हे विप्र आणि द्विज उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३८॥
हे दैत्यराक्षसादि अधम । हे पितरगंधर्वादि मध्यम ।
हे देव सर्वांत उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३९॥
यक्ष गंधर्वादि अधम । इंद्रादि देव हे मध्यम ।
विष्णु आदि हे उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥११४०॥
ऐसेचि तृण पाषाणाआंत । अथवा संपूर्ण वस्तुजात ।
उत्तमाधम भाव संकेत । हे गुणदोष कल्पना ॥४१॥
येथें शंका ऐसी करिसी । कीं हे निर्माणचि जालीं ऐशी ।
जैसियासी कल्पना करिता तैशी । दोष तो कोणता ॥४२॥
तरी ययाचें उत्तर ऐकावें । जालें असती तैसे स्वभावें ।
तयावरीच वाउगे भाव कल्पावे । उत्तमाधम मध्यम ॥४३॥
पाहेपा एकचि पाणी असतां । हे ओहळ अधम मध्यम सरिता ।
भागीरथी आदि उत्तम तत्वतां । हेंचि गुणदोष ॥४४॥
प्रेताग्नि तो असे अधम । सहज अग्नि तो मध्यम ।
होमादिकांचा तो उत्तम । हेचि गुणदोष ॥४५॥
हा कर्कंश वायु अधम । हा समान वायु मध्यम ।
हा मंदवायु शीतळ उत्तम । हेचि गुणदोष ॥४६॥
हें मेघें आकाश दूषिलें । हें पहा कैसें असे स्वच्छ जालें ।
या रीतीं एकासीच भाविलें । हेचि गुणदोष ॥४७॥
हे भूमि किती पवित्र । हे पहा कुश्चळ अपवित्र ।
तैसेंचि कुग्राम हें क्षेत्र । हेचि गुणदोष ॥४८॥
ऐसेंचि अवघें कर्म धर्म क्रिया । आश्रम गुण विद्या अविद्या ।
हें हें चांगलें हें हें वायां । हेचि गुणदोष ॥४९॥
हा सुदिन हा दुर्दिन । कुमुहूर्त भाऊन । उगाचि संशयीं पडे आपण । हेचि गुणदोष ॥५०॥
असो ऐसें किती बोलावें । धरणीही लिहितां न पुरवे ।
परी अल्प संकेतें समजावें । सर्वही गुण दोषात्मक ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP