आत्मसुख - अभंग ४१ ते ५०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
४१
हिरे जळामधीं भिजतील कधीं । तैसें कृपानिधी केलें आम्हां ॥१॥
आमुचा विकल्प आमुचा विकल्प । आमुचा विकल्प आम्हां नाडी ॥२॥
कामधेनु संगें गाढव बांधिलें । तयाचें तें मोलें तुके केवि ॥३॥
काय म्यां करावें पाठी लागे भोग । नामा म्हणे योग तुझ्या हातीं ॥४॥
४२
आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठीं । धांव जगजेठी स्वामी माझ्या ॥१॥
गेलासि केउता वाढिलें दुश्चिता । अगा कृपावंता स्वामी माझ्या ॥२॥
नामा म्हणे मज नाहीं कोण गत । तारिसी अनंत स्वामी माझ्या ॥३॥
४३
तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥
न करीं विठ्ठला आतां लाजिरवाणें । मी तुझें पोसणें पांडुरंगा ॥२॥
काकुळती कोणा येऊं हो मी आतां । अनाथाचे नाथा विठ्ठला तूं ॥३॥
एक वेळ आतां पाहे मजकडे । नामा म्हणे वेडें रंक तुझें ॥४॥
४४
माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥
नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥
अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थू आतां ॥३॥
नामा म्हणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आतां बरी ॥४॥
४५
समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हांसती सकळ लाज कोणा ॥१॥
देव आप्त दैन्य उरे कैंचे बापा । आम्हांसि तूं कां पां विसरलासी ॥२॥
ऐसा तूं अविनाश त्रिभुवनिंचा राजा । नामा म्हणे माझा तूंचि स्वामी ॥३॥
४६
आम्ही काय जाणो तुझा अंत पार । होसी तूं साचार निवारिता ॥१॥
बहु अपराधी जाण यातिहीन । पतितपावन पांडुरंगा ॥२॥
नामा म्हणे ऐसा पाताकी पामर । करिसी उद्धार साच ब्रीद ॥३॥
४७
नेणे घातमात नव्हे कळावंत । शास्त्रज्ञ पंडित तोहि नव्हे ॥१॥
रंकाहुनि रंक संतांचा सेवक । मी नामधाराक विठोबाचा ॥२॥
नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशीळ । नव्हे मी वाचाळ तर्कवादी ॥३॥
नामा म्हणे राया विठोचा डिंगर । नामें पैलपार पावविलों ॥४॥
४८
लटिका मी गाईन लटिका मी नाचेन । संतासि देखोन लटिका लवें ॥१॥
लटिका माझा भाव लटिकी माझी भक्ति । तूं तंव श्रीपती कृपासिंधु ॥२॥
लटिकी माझी क्रिया लटिकें माझें कर्मा । परि सत्य तुझें नाम गातु असे ॥३॥
लटिकें माझें ध्यान लटिकें माझें ध्यान । तूं तंव सहजगुण सत्यरूप ॥४॥
लटिकी माझी पूजा लटिकें माझें स्मरण । लटिकें माझें भजन भावहीन ॥५॥
लटिकें प्रेमवत्स धेनु हें स्वीकारी । तैसें मज करीं म्हणे नामा ॥६॥
४९
आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया । ऐसें हें कासया पाहसी देवा ॥१॥
जाणतां नेणतां नाम तुझें देवा । गाईन केशवा आवडीनें ॥२॥
विषयीं आसक्त भ्रांत माझें मन । कैसें तुझें भजन घडेल मज ॥३॥
नामा म्हणे आतां जाणसी तें करीं । पतितपावन हरि नाम तुझें ॥४॥
५०
लटिका तरी गाईन तुझेंचि नाम । लटिकें प्रेम आणीन तुझें ॥१॥
सहजचि लटिकें असे माझें ठायीं । तुझिया पालट नाहीं साचपण ॥२॥
लटिकें तरी हरी करी तुझें ध्यान । लटिकें माझें मन तुजचि चिंती ॥३॥
लटिकें तरी बैसे संतांचें संगतीं । दृढ धरीन चित्तीं नाम तुझें ॥४॥
लटिका तरी तुझा म्हणविन दास । धरीन विश्वास नामीं तुझें ॥५॥
लटिकें माझें मन सुफळ करी देवा । नामा म्हणे केशवा विनती माझी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP