आत्मसुख - अभंग १३१ ते १४०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१३१
वाढवेळ कां लाविला । कोण्या भक्तें रे गोंविला ॥१॥
झडकरी यावें बा विठ्ठला । आळवितां कंठ सोकला ॥२॥
वाट पाहें दाही दिशा । जिवीं धरोनि भरंवसा ॥३॥
न कळे का धरिले उदास । मज तो वाटती निरास ॥४॥
केव्हां येईल माझा हरी । आळंगील चहुंकरीं ॥५॥
नामा गहिंवरें दाटला । देह धरणिये लोटला ॥६॥
१३२
जिवलग कोण तुजविण होईल । जें माझें जाणेल जडभारी ॥१॥
अन्यायी अपराधी तुम्हां शरणागत । तुजविण हित कोण करी ॥२॥
नामा म्हणे आई धावें लवलाहीं । बुडतों या डोहीं दंभाचिया ॥३॥
१३३
काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥१॥
वाट पाहतांना भागले लोचन । कठिणच मन केलें तुवां ॥२॥
ऐकिली म्यां कानीं कीर्ति तुझी देवा । उठलासे हेवा त्याचि गुणें ॥३॥
अनाथ अन्यायी काय मी करीन । दयावंत खूण सांगसी तूं ॥४॥
नामा म्हणे आस पूर्ण कीजे देवा । रूपडें दाखवा नेटें पाटें ॥५॥
१३४
तूं माय माउली आस केली थोरी । वास निरंतरीं पंढरिये ॥१॥
स्वरूप दाखवी एक वेळां मज । धरूं नको लाज पांडुरंगा ॥२॥
नामा म्हणे तुज भक्तिचिये पैं पिसें । पुरविसी आस दुर्बळाची ॥३॥
१३५
मयुरध्वज राजा महापापी जाण । उभा नारायण जोडी हात ॥१॥
कर्वत आणसि सकळां देखतां । कांतिसी तत्वता मांस त्याचें ॥२॥
कपोतणी मागें पारध्याचा वेष । दावी ह्रषिकेश रूप त्यासी ॥३॥
नामा म्हणे तुझें करणें उचित । कां मज प्रचित न ये देवा ॥४॥
१३६
अज्ञान बालक कोमाईलें झणीं । जाणे ते जननी तानभूक ॥१॥
तैसा मजलागीं होउनि कृपाळ । करी गा संभाळ अनाथाचा ॥२॥
वत्सालागीं धेनु येतसे वोरसे । पान्हा स्तनीं कैसे वोसंडती ॥३॥
नामा म्हणे तुज हें न साहे उपमा । मी कुडी तूं आत्मा केशिराजा ॥४॥
१३७
अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें ॥१॥
आपुलें ब्रीद साच करी । येक वेळा भेटी दे गा मुरारी ॥२॥
पतित पतित म्हणती मातें । पतितपावन म्हणती तूतें ॥३॥
नामा म्हणे ऐकें सुजान । नाइकसि तरि लाज कवणा ॥४॥
१३८
तुवां येथें यावेम कीं मज तेथें न्यावें । खंती माझ्या जीवें मांडियेली ॥१॥
माझें तुजविण येथें नाहीं कोणी । विचारावें मनीं पांडुरंगा ॥२॥
नामा म्हणे वेगीं यावें करुणाघना । जातो माझा प्राण तुजलागीं ॥३॥
१३९
बोलावूं पाठवूं एवढी कैंची शक्ति । या रंग श्रीपती त्वां बा यावें ॥१॥
येईं गा विठ्ठला पाहातसें आतां । या रंगा अनंता त्वां बा यावें ॥२॥
धांवत त्वां यावें धांवत त्वां यावें । या रंगा नाचावें पांडुरंगा ॥३॥
तिन्हीं त्रिभुवनीं तुझीच करणी । ठाव मागे चरणीं नामदेव ॥४॥
१४०
दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा ॥१॥
बोल गा बोल मजशी कांहीं । दृष्टी उघडुनी मजकडे पाही गा विठोबा ॥२॥
अरे तूं कृपाळु दीनाचा । महा उदार थोरा मनाचा गा विठोबा ॥३॥
भक्तें पुंडलिकें गोविलासी लोभें । प्रेमें प्रीतीच्या वालभें गा विठोबा ॥४॥
युगें अठ्ठावीस भरलीं । धणी अजुनी नाहीं पुरली गा विठोबा ॥५॥
प्राण होती माझे कासाविस । नामा म्हणे कां धरिलें उदास गा विठोबा ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP