आत्मसुख - अभंग १२१ ते १३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१२१
येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे ॥१॥
सजलजलदघन पीतांबर परिधान । येई उद्धरणें केशिराजे ॥२॥
नामा म्हणे तूं विश्वाची जननी । क्षिराब्धिनिवासनी जगदंबे ॥३॥

१२२
येई वो विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरीं काढी मज ॥१॥
आकांत आवसरी स्मरलीसे गजेंद्रें । दीनानाथ ब्रीदें साच केलीं ॥२॥
स्मरलीसे संकटीं द्रौपदी वनवासी । धांवोनि आलीसी लवडसवडी ॥३॥
प्रल्हादें तुजलागीं स्मरिलें निर्वाणीं । संकटापासोनि राखियेलें ॥४॥
नामा म्हणे थोर पीडिलों भर्भवासें । अखंड पाह्तुसे वाट तुझी ॥५॥

१२३
जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां ॥१॥
त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टीं पाहे । येऊनियां राहे ह्रदयामाजीं ॥२॥
वासनेच्या संगें शिणलें माझें चित्त । विषयाचे आघात पडती वरी ॥३॥
नाहीं तुझी सेवा केली मनोधर्में । संसार संभ्रमें भ्रांत सदा ॥४॥
नाहीं तुझें नाम गाईलें आवडी । वाळली कुर्वंडी त्रिविधतापें ॥५॥
नामा म्हणे  आई धांवें लवलाही । बुडतों चिंताडोहीं तारी मज ॥६॥

१२४
भेटीची आवडी उत्कंठित चित्त । न राहे निवांत एके ठायीं ॥१॥
जया देखे तया हेंचि पुसे मात । कां मज पंढरिनाथ बोलविना ॥२॥
कृपेचा सागर विठो लोभपर । माझा कां विसर पडिला  त्यासि ॥३॥
माहेरींची आस दसरा दिवाळी । बाहे ठेवुनि निढळ वाटे पाहे ॥४॥
मखे वारकरी पंढरीस जाती । निरोप त्या हातीं पाठवीन ॥५॥
निर्बुजला नामा कंठीं धरिला प्राण । करीतसे ध्यान रात्रंदिवस ॥६॥

१२५
भेटसी केधवां माझिया जिवलगा । ये गा पांडुरंगा मायबापा ॥१॥
चित्त निरंतरीं तुझे महाद्वारीं । अखंड पंढरी ह्रदयीं वसे ॥२॥
श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे ॥३॥
भेटिचें आरत उत्कंठित चित्त । तुजविन माझें हित कोण करी ॥४॥
कटीं कर विटे समचरण साजिरे । देखावया झुरे मन माझें ॥५॥
असुवें दाटलीं उभारोनि बाहे । नामा वाट पाहे रात्रंदिवस ॥६॥

१२६
तूं माझी जननी काय गे साजणी । विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥
डोळे माझे शिणले पाहतां वाटोली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥२॥
मी तुझें पाडस गुंतलों भवपाशीं । माते धीर तुजसी कैसा धरवला ॥३॥
तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरशी ॥४॥
तूं माझी माउली मी तुझें वोरस । पुढती पुढती वास पाहतसे ॥५॥
नामा म्हणे विठ्ठले आस पुरवीं माझी । ओरसे वेळां पाजीं प्रेमपान्हा ॥६॥

१२७
मुक्तपण आम्हां नको देवराया । भेटी मज पायां पुरे बापा ॥१॥
चतुरपणाची नको मज चाड । प्रेमभाव गोड पुरे बापा ॥२॥
खाय  भिल्लिणीचीं फळें आवडतीं । काय त्याचे चित्तीं दुजा भाव ॥३॥
भावापाशीं देव उभा सर्वकाळ । खेचरानें बळें दाखविला ॥४॥
नामा म्हणे मज सद्‌‍गुरुची सत्ता । आम्हासि मुक्तता नको बापा ॥५॥

१२८
तूं माय माउली म्हणोनि आस केली । विठ्ठलें पाहिली वास तुझी ॥१॥
मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥
तुजविण जिवलग दुजें कोण होईल । तें माझें जाणेल जडभारी ॥३॥
मी दोन अपराधी तुझा सरणागत । तुजविण माझें हित करिल कोण ॥४॥
करुणा कल्लोळिणी अमृत संजीवनी । चिंतितो निर्वाणीं पाव वेगीं ॥५॥
नामा म्हणे तुजविण जालों परदेशी । केव्हां सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥

१२९
भवव्याघ्र देखोनि भ्याले माझे डोळे । जालेसें व्याकुळ चित्त माझें ॥१॥
पाव गा पाव गा पाव गा विठोबा । पाव गा विठोबा मायबापा ॥२॥
तूं भक्ता कैवारी कृपाळुवा हरी । येईं गा झडकरी देवराया ॥३॥
नामा म्हणे नेणें आन तुजवांचूनि । जनक जननी केशिराजा ॥४॥

१३०
कां गा मोकलिलें माझिया विठ्ठला । धांवा तुझा केला मायबापा ॥१॥
त्रितापें तापलों बहुत पोळलों । चिखलीं पडिलों दीनानाथा ॥२॥
यालागीं तुजला भाकितों करुणा । धांवसी निर्वाणा पांडुरंगा ॥३॥
नामा म्हणे देवा अनाथाच्या नाथा । रुक्माईच्या कांता घाली उडी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP