आत्मसुख - अभंग १११ ते १२०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१११
आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित ॥१॥
विठ्ठलचि घ्यावा विठ्ठचि गावा । विठ्ठचि पहावा सर्वाभूतीं ॥२॥
या परतें सुख न दिसे सर्वथा । कल्पकोटि येतां गर्भवास ॥३॥
नामा म्हणे चित्तीं विठठलांचें रूप । संकल्प विकल्प मावळले ॥४॥

११२
तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥
कशासाठीं शीण थोडक्याकारणें । काय तुज उणें होय देवा ॥२॥
चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥
नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । ह्रदयकमळीं स्थिर राहे ॥४॥

११३
नामयाचें प्रेम केशवची जाणें । केशवासी राहणें नामयापासीं ॥१॥
केशव तोचि नामा तोचि केशव । प्रेमभक्तिभाव मागतसे ॥२॥
विष्णुदास नामा उभा केशवद्वारीं । प्रेमाची शिदोरी मागतसे ॥३॥

११४
प्रेमफांसा घालुनियां गळां । जितें धरिलें गोपाळा ॥१॥
एक्या मनाची करूनि जोडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥२॥
ह्रदय करूनि बंदिखाना । विठ्ठल कोंडुनी ठेविला जाणा ॥३॥
सोहं शब्दें मार केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥
नामा म्हणे विठ्ठलासी । जीवें न सोडी सायासी ॥५॥

११५
विठ्ठल आमुचें  सुखाचेम जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥
विठ्ठलचि ध्यावों विठठलचि गावों । विठ्ठलचि पाहों सर्वांभूतीं ॥२॥
विठ्ठलापरतें न दिसे सर्वथा । कल्प येतां जातां गर्भवास ॥३॥
नामा म्हणे चित्तीं आहे  सुखरूप । संकल्प विकल्प मावळती ॥४॥

११६
व्यापकारीस मन केलें वाड । सांपडलें गोड प्रेममुख ॥१॥
जिकडे पाहें तिकडे विठ्ठल अवघा । भीमा  चंद्रभागा पुंडलिक ॥२॥
सर्व निरंतरीं सबाह्य अंतरीं । हें ब्रह्यांड पंढरी जाली मज ॥३॥
महुरलें तरुवर पुष्पीं फलीं भार । तेंचि निर्विकार सनकादिक ॥४॥
आवडीचा आनंदु तोचि  विष्णुनादु । अनुभव तो गोविंदु गोपवेषें ॥५॥
नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा । मागें पुढें उभा सांभाळित ॥६॥

११७
तूं आकाश मी शामिका । तूं लिंग मी साळूंका ।
तूं समुद्र मी चंद्रिका । स्वयें दोन्ही ॥१॥
तूं वृंदावन मी चिरी । तूं तुळशी मी मंजिरी ।
तूं पांवा मी मोहरी । स्वयें दोन्ही ॥२॥
तूं चांद मी चांदणी । तूं नाग मी पद्मिणी ।
तूं कृष्ण मी रुक्मिणी । स्वयें दोन्ही ॥३॥
तूं नदी मी थडी । तूं तारूं मी सांगडी ।
तूं धनुष्य मी स्तविता । तूं शास्त्र मी गीता ।
तूं गंध मी अक्षता । स्वयें दोन्ही ॥५॥
नामा म्हणे पुरुषोत्तमा । स्वयें जडलों तुझ्या प्रेमा ।
मी कुडि तूं आत्मा । स्वयें दोन्ही ॥६॥

११८
जीवन्मुक्त केलें नामाचे  गजरीं । सेवेसी अधिकारी विठोबाचे ॥१॥
काये उतराई होऊं तुज देवा । उदारा केशवा मायबापा ॥२॥
अंतरीं देऊनि प्रेमाचा जिव्हाळा । मुक्तीचा सोहळा भोगविसी ॥३॥
नामा म्हणे वेदां न येसी अनुमाना । वर्णितां पुराणां पडलें टक ॥४॥

११९
वारंवार काय विनवावें आतां । समजावें चित्ता आपुलिया ॥१॥
तूं काय म्हणसी कंटाळेल हाची । जाईल उगाचि उठोनियां ॥२॥
मजलागीं देव जासी चुकवोनी । आणिन धरूनि तुजलागीं ॥३॥
दृढ भक्तिभाव  प्रेमाचा ह दोरा । बांधीन सत्वर तुझे पायीं ॥४॥
नामा म्हणे विठो बोल काय आतां । भेटावया सर्वथा यावें बरें ॥५॥

१२०
संसारषड‌‍चक्रीं पडिलों महाडोहीं । सोडवणें येई पांडुरंगा ॥१॥
दवडादवडी धांव दवडादवडी धांव । नको भक्तिभाव पाहों माझा ॥२॥
माझी चित्तवृत्ती अज्ञान हे गाई । व्याघ्रें धरिली आहे अहंकारें ॥३॥
पंचाननीं मज घेतलें वेढोनि । नेताति काढोनि प्राण माझा ॥४॥
गजेंद्राकारणें घातली त्वां उडी । तैसा लवडसवडी पावें मज ॥५॥
नामा म्हणे मज तुझाचि आधारा । पोसणा डिंगर जन्मोजन्मीं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP