आत्मसुख - अभंग २३१ ते २४०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२३१
तुझा दास मी तों राहिलों होवोनि । बोल चक्रपाणि पुरे आतां ॥१॥
जावो प्राण आतां न सोडीन संग । नव्हति वाउगे बोल माझे ॥२॥
श्रुति स्मृति वेद काव्यें ही पुराणें । तीं तुज भूषणें सुखें मानूं ॥३॥
काय हानि जाली सांगा मजपाशीं । उद्धारा जगासी नामा म्हणे ॥४॥

२३२
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥
भक्त कैवारिया होसी नारायणा । बोलतां वचना काय लाज ॥२॥
मागें बहुतांचे फेडियेलें ऋण । आम्हांसाठीं कोण आली धाड ॥३॥
वारंवार तुज लाज नाहीं देवा । बोल रे केशवा म्हणे नामा ॥४॥

२३३
देवा तूं प्रथम कर्म भोगिसी । सगरीं जळचरूं मछ जालासी ।
कमठे पाठीं न संडी कैसी । मर्में कावाविसी केलेंज तुज ॥१॥
अपवित्र नाम आधीं वराह । याहुनि थोर कूर्म कांसव ।
अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥
खुजेपणीं बळीसी पाताळीं घातलें । तेणें कर्में तयाचें द्वार रक्षिलें ।
पितयाचेम वचनीं मातेसी वधिलें । तें कर्में भोगविलें अंतरली सीसा ।
भालुका तीर्थीं वधियेलें अवचिता । नाम अच्युता तुज जाहलें ॥४॥
ऐसा कष्टी होउनि बोध्य राहिलासी । तूं कलंकी या लोका भारिसी ।
आपल्या दोषासाठीं आणिका दंडिसी । निष्कलंक होसी नारायणा ॥५॥
ऐसा तूं बहुतां दोषीं बांधलासी । पुढीलाचीं जन्में अवगतोसी ।
विष्णुदास नामा म्हणे ह्रषिकेशी । तुझी भीड कायसी स्वामियाहो ॥६॥

२३४
मरणें पेरणें जन्म उगवणें । मायेची ते खूण सांगितली ॥१॥
संग तुझा पुरे संग तुझा पुरे । संग तुझा पुरे नारायणा ॥२॥
तूं तरी न मरे मी तरी न पुरे । भक्ति हे संचरे हाचि लाभु ॥३॥
नामा म्हणे माझ्या ठायिंचा मी नेणें । संसार भोगणें तुझी जाला ॥४॥

२३५
तुज विकोनी घातली वोर । मज बोलतोसी ॥१॥
उच्छिष्ठ शिदोरी घेऊनिया करीं । भक्तांचा भिकारी तूंचि एक ॥२॥
चोर आणि शिंदळू चाळविलें गोविळें । अनंत मर्दिले दुष्टकाळ ॥३॥
नामा म्हणे केशवा सांगेन वर्म । ऐकतां न राहे संतांचें कर्म ॥४॥

२३६
उदार कृपाळ सांगशील जना । तरी कां रावणा मारियेलें ॥१॥
नित्यानित्य पूजा सिरकमळीं करी । तेणें तुझें हरी काय केलें ॥२॥
किती बडिवार सांगसील वायां । ठावा पंढरिराया आहेसी आम्हां ॥३॥
कर्णा ऐसा वीर झूंझार उदार । त्यासी त्वां जर्जर केलें बाणीं ॥४॥
पाडिलें भूमीसी न येचि करुणा । त्याचे नारायना पाडिले दांत ॥५॥
श्रिययाळ बापुडें सात्विक निर्वाणीं । खादलें कापोनी याचें पोर ॥६॥
ऐसा कठिण कोण होईल दुसरा । कांडियेलें शिरा उखळामाजीं ॥७॥
शिवी चक्रवर्ती करिताम यज्ञयाग । कापिलें त्याचें अंग ठायीं ठायीं ॥८॥
जाचोनियां प्राण घेतला तयाचा । काय सांगसी वाचा बडिवार ॥९॥
हरिश्चंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकले त्याचे जीव डोंबाघरीं ॥१०॥
बहुतचि श्रम दिधलें तयासि । परी तो सत्वासि ढळेचिना ॥११॥
पाडिला विघड नळादमयंतीं । ऐसी कृपामूर्ति बुद्धि तुझी ॥१२॥
आणिक तुझी कीर्ति सांगावी ती किती । केली ते फजिती माउशीची ॥१३॥
मारियेला मामा सखा पुरुषोत्तमा । नामा म्हणे सीमा फार केली ॥१४॥

२३७
उदारांचा राणा म्हणविसी आपणां । सांग त्वां कवणां काय दिल्हें ॥१॥
उचिता उचित भजसी पंढरीनाथा । न बोलों सर्वथा वर्में तुझीं ॥२॥
वर्में तुझीं कांहीं बोलेन मी आतां । क्षमा पंढरीनाथा करी बापा ॥३॥
न घेतां न देसी आपुलेंहि कोण । प्रौढी नारायणा न बोलावी ॥४॥
बाळमित्र सुदामा विपत्तीं पिडला । तो भेटावया आला तुजलागीं ॥५॥
त्याचें मुष्टिपोहेसाठीं मन केलें आसट । मग दिलें उत्कृष्ट भाग्य तया ॥६॥
छळावया पांडव दुर्वास पातला । द्रौपदीनें केला धांवा तुझा ॥७॥
गेली वृंदावना केली प्रदक्षेना । आळविला कान्हा द्वारकेचा ॥८॥
आळवी पांचाळी येर बा वनमाळी । राख ये काळीं सत्व माझें ॥९॥
येवढिया आकांतीं घेऊनि भाजीपान । मग दिलें अन्न ऋषिलागीं ॥१०॥
बिभीषना दिधलि सुवर्णाची नगरी । हे कीर्ति तुझी हरि वाखाणिती ॥११॥
वैरियाचें घर भेदें त्वां घेतलें । त्याचें त्यासी दिधलें नवल काया ॥१२॥
धरुवा आणि प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्चंद्र रुक्मांगद आदि करुनी ॥१३॥
त्याचें सेवाऋण घेऊनि अपार । मग त्या देशी वर अनिर्वाच्या ॥१४॥
एकाचि शरीरसंपत्ति आणि वित्त । एकाचें तें चित्त हिरोनि घेसी ॥१५॥
मग तया देशी आपुलें तूं पद । जगदानी हें ब्रीद मिरविसी ॥१६॥
माझें सर्वस्व घेई तुझें नको कांहीं । मनोरथाची नाहीं चाड मज ॥१७॥
नामा म्हणे केशवा जन्मजन्मांतरीं । ऋणी करिन हरी ऋणें सेवा ॥१८॥

२३८
निर्गुण नामाची अनंत कल्पना । धरुनि नारायणा व्यक्ति येसी ॥१॥
लाज लावियेली त्या निर्गुणपणा । श्रुतींच्या वचना वाखाणितां ॥२॥
तैसें न हो आम्ही करणीचे विलगत । नामाचे निकट दास तुझे ॥३॥
चतुरा शिरोमणी नंदाना खिल्लारी । हें अघटित मुरारी नाम जरी ॥४॥
तुमचे तुम्हां देवा सांगतां तें निकें । समर्थांसी रंकें बोलिजे केवीं ॥५॥
देवा मुगुटमणी हें बोलती पुराणें । आणि बळिचें राखणें द्वार काय ॥६॥
अर्जुना सारथी रथा वागविसी । उच्छिष्टें काढिसी धर्माघरीं ॥७॥
विश्वंभर नाम तुझें कमळापति । जगीं श्रुति स्मृति वाखाणिती ॥८॥
गौळियांचे घरीं दहीं लोणी चोरूनी । खातां चक्रपाणि लाजसीना ॥९॥
आतां दीनानाथ ब्रीद तुझें साचें । तरी भूषन आमुचें जतन करी ॥१०॥
येर ठेवा ठेवी कायसी आम्हां आतां । विनवितो नामा केशिराजा ॥११॥

२३९
अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । भक्तांचा कृपाळ पांडुरंग ॥१॥
ये गा तूं विठ्ठला माझिया माहेरा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥२॥
वर्णिती पुराणें न करीं लाजिरवाणें । बोलती वचनें सनकादिक ॥३॥
कृपेचा सागरू कैवल्यउदारू । रखुमाईचा वरू पांडुरंग ॥४॥
पुंडलिकाचे भेटी अससी वाळवंटीं । हात ठेवुनि कटीं विटेवरी ॥५॥
भक्तिलागीम कैसा उभा असे तिष्ठत । असे वाट पहात भीमातीरीं ॥६॥
येऊनी जन्मासी पाहावी पंढरी । तेणें भवसागरीं तरसील ॥७॥
नामा म्हणे मज हरीचा विश्वास । जालों असे दास जन्मोजन्मीं ॥८॥

२४०
काया कर पैं फुटों नेदी । टाळ विंडी वाहिन खांदीं ॥१॥
तूं बा माझा तूं बा माझा । तूं बा माझा केशिराजा ॥२॥
आळवणीच तूं बा वाचे । तेणें छंदें पेंधा नाचे ॥३॥
तूं बा माझा मी दास तुझा । विनवितो नामा केशिराजा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP