आत्मसुख - अभंग २४१ ते २५०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
२४१
निंदा आणि स्तुति तुझीच करणें । परि आणिकांचे न घेणें गुणदोष ॥१॥
वैर अथवा सख्या तुझियेच । परि न पडो ह्रदयीं विसर तुझा ॥२॥
दास्य अथवा सत्ता गोपाळांचे परी । असो तुजवरी सर्वलोभ ॥३॥
जिणें अथवा मरणें तुझियेच द्वारीं । उदास नरहरि करिसी झणें ॥४॥
नामा म्हणे थोर शिणलों पंढरिनाथा । स्वामीचें नेणातां प्रेमसुख ॥५॥
२४२
छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥
यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥
कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥
तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥
तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥
नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥
२४३
अनाथासी साह्म होसी नारायणा । करुणावचना बोलविसी ॥१॥
पांडुरंगा कृपा करीं मजवरी । पामर उद्धरीं पाहतांची ॥२॥
गणिकें सत्वर मोक्षपद देसी । उपमन्यु बाळासी क्षीरसिंधु ॥३॥
नामा म्हणे याति विचारसी । कण्य घरीं खासी विदुराच्या ॥४॥
२४४
अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी । पुराणीं हे थोरी ऐकियली ॥१॥
ऐकोनियां कीर्ति आलों तुजपाशीं । निवारी दुःखासी केशिराजा ॥२॥
त्रितापें तापलें दुःखें आहाळलों । कासाविस जालों दायासिंधू ॥३॥
तुजवीण आतां कोणातें मी सांगूं । तोडि हा उद्वेगु नारारणा ॥४॥
नामा म्हणे आतां नको पाहूं अंत । उद्धरीं त्वरित पांडुरंगा ॥५॥
२४५
कृपा करोनि त्वां मज प्रसना व्हावें । आणि म्यां मागावें बुद्धिज्ञान ॥१॥
ऐसी भुली मज न घालीं पांडुरंगा । बिघड संत्संगा न करीं मज ॥२॥
मोक्षासी साधन एका ते उपाधी । दाखवुनि बुद्धिभ्रंश केलें ॥३॥
एका पुत्र कलत्र राज्यचा संभ्रर्म । दावोनी दुर्गम भ्रम केला ॥४॥
नामा म्हणे तुझ्या प्रेमालागीं भक्ति । घेतली म्यां सुतीं जन्ममरणें ॥५॥
२४६
अनंता जन्मीचें चुकवीं सांकडें । काय मी बापुडें वानुं कैसें ॥१॥
सगुन गुणाची वोललिसे मूर्ति । राहो माझे चित्तीं निरंतर ॥२॥
माझा मीच जालों सकळ व्यापारी । संसारा बाहेरी काढी कोण ॥३॥
नामा म्हणे मज नको गोवूं आशा । पावन परेशा केशिराजा ॥४॥
२४७
जेथें जेथें मन जाईल गा माझें । तेथें तेथें तुझें रूप असो ॥१॥
ऐसी मज संवई लावीं निरंतर । जन्मजन्मांतरीं केशिराजा ॥२॥
आपणांस काम जरूर कायसा । आतां पंढरीशा आटोपावें ॥३॥
नामा म्हणे नको पाहों माझी लाज । संसाराचें बीज मूळ खुडी ॥४॥
२४८
आम्ही काय जाणों तुझा अंतपार । होसी निरंतर निवारिता ॥१॥
बहु अपराधी जाणा यातिहीन । पतितपावना तुम्ही देवा ॥२॥
नामा म्हणे ऐसा पातकी पामर । करिसी उद्धारा साच ब्रीदें ॥३॥
२४९
अग्निमाजिं पडे बाळू । माता धांवे कनवाळू ॥१॥
तैसा धांवे माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ॥२॥
सवेंचि झेपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥
भुकेलें वत्स रावें । धेनु हुंबरत धांवे ॥४॥
वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतित हरिणी ॥५॥
नामा म्हणे मेघा जैसा । विनवितो चातक तैसा ॥६॥
२५०
धेनु विये वनीं तीसि कैचि सुयणी । तरीं ते वत्स स्तनीं लावी कवण ॥१॥
भुजंगाचीं पिलीं उपजतांचि वेगळीं । त्यांसी डेखूं शिकविलें हो कोणी ॥२॥
सहज लक्ष्ण जयाचिये ठायीं । तो आपुलिये सोई धांवतसे ॥३॥
उपजतांचि फूल मोगर्यांच्या माथां । त्यासी परिमळता कोणे लावियेली ॥४॥
कडू दुध्याच्या आळयासी साखर दूध घातलें । ते अधिकचि कडुवाळें कवणें केलें ॥५॥
गाळिला तोडिला खंड विखंडी । ऊंन न संडी सोय गोडीसी ॥६॥
नामा म्हणे तैसें आहे गा श्रीहरी । साईचे व्यपारीं घेईन तूतें ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP