आत्मसुख - अभंग २११ ते २२०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२११
काय अपराध पाहसी कोणाचे । धांवे भावकांचे कामकाजीं ॥१॥
काय केशिराजा वाणूंज मी दुबळें । शरणागता लळे पुरविशी ॥२॥
पतितपावन ब्रीद चराचरीं । तेथें मी भिकारी कोणीकडे ॥३॥
नामा म्हणे तूंचि करिशी उद्धार । मज भ्याग्या पार नाहीं देवा ॥४॥

२१२
जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें ॥१॥
आतां माझी चिंता तुज कां पंढरिनाथा । असो दे भलभलता भलतेंच ठायीं ॥२॥
सुखदुःख भोगणें माझें मी जाणें । तुज तंव भोगणें नलगे कांहीं ॥३॥
नामा म्हणे माझे हेचि मनोरथ । होईन शरणागत जन्मूजन्मीं ॥४॥

२१३
आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्‍हवीं अनंता कोण जाणे ॥१॥
वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥
चतुरा शिरोमणी अहो केशिराजा । अंगीकार तुझा केला आम्हीं ॥३॥
सहस्त्र नामें जरी जालासि संपन्न । तरी हेंहि भूषन आमुचेंचि ॥४॥
येर्‍हवीं त्या नामाची कवण जाणे सीमा । पाहें मेघश्यामा विचारोनि ॥५॥
होतासी क्षीरसागरीं अनाथाचे परी । लक्ष्मी तेथें करी चरणसेवा ॥६॥
तेहि तंव जाण आमुची जननी । तूं तियेवांचोनि शोभसी कैसा ॥७॥
तुज नाहींज नाम रूप जाति कूळ । अनादीचें मूळ म्हणती तुज ॥८॥
आम्ही भक्त तरी तूं भक्तवत्सल । ऐसा प्रगट बोल जगामाजीं ॥९॥
ऐसि आमुचेनि भोगिसी थोरीव । अमुचा जीवभाव तुझे पायीं ॥१०॥
नामा म्हणे केशवा  जरि होसी जाणता । या बोला उचिता प्रेम देई ॥११॥

२१४
विष पाजावया पूतना ते आली । ते तुवां तारिली काय म्हणुनि ॥१॥
पुसा या म्हणोनि वेश्या बोभाईलि । ती तुवां तारिली काय म्हणूनि ॥२॥
पिंगळेची आख्या पुराणीं ऐकिली । ते तुवां तारिली काय म्हणुनि ॥३॥
गौतमाचें शापें अहल्या शिळा जाली । ते तुवाम तारिली  काय म्हणुनि ॥४॥
नामा  म्हणे केशवा अकळ तुझी करणी । विसंबसी झणीं  तूंचि मज ॥५॥

२१५
आम्हीं शरणागतीं सांडिली वासना । ते त्वां नारायणा अंगिकारिली ॥१॥
म्हणोनि प्रसन्न  व्हावया आमुतें । वोसारल्या चित्तें चालविसी ॥२॥
अज्ञान बाळकु ठकविला धुरू । तैसा मी अधिरू नव्हे जाण ॥३॥
लंकापति केला तुवां बिभीषण । झालासी उत्तीर्ण वाचाऋणें ॥४॥
उपमन्यें घेतला दुधाचाचि छंद । तैसा बुद्धिभेद नव्हे जाण ॥५॥
नामा म्हणे तैसा नव्हे मी अज्ञा । माग तुज देईन शरीर अवघें ॥६॥

२१६
आम्ही शरणागत परि सर्वस्वें उदार । भक्तीचे सागर सत्वशील ॥१॥
काय वाचा मनें अर्थ संपत्ति धन । दिधलें तुजलागुन पांडुरंगा ॥२॥
आम्हां ऐसें चित्त तुम्हां कैचें देव । हा बडिवा केशवा न बोलावा ॥३॥
सत्वाचा सुभट बळि चक्रवर्तित । पहा केवढी ख्याति केली तेणें ॥४॥
त्रिभुवनीचें बैभव जोडिलें ज्या लागुनि । तें शरीर तुझ्या चरणीं समर्पियेलें ॥५॥
रावणा ऐसा बंधु सांडूनि सधर । ओळंगति परिवारा ब्रह्मादिकां ॥६॥
तें सांडोनि एकसरा आलासे धांवत । जाला शरणागत बिभीषण ॥७॥
हिरण्यकश्यपें तुझ्या वैर संबंधें । पाहे त्या प्रल्हादा गांजियेलें ॥८॥
अजगर कुंजर करितां विषपाना । परि तुझें स्मारण न संडीच ॥९॥
पति पुत्र स्नेह सांडोनि गोपिका । रासक्रीडे देखा भाळलिया ॥१०॥
एकीं तुझें ध्यान करितां त्यजिले प्राण । सांग ऐसें निर्वाण कवणें केलें ॥११॥
ऐसे मागें पुढें जाले असंख्यात । भक्तभागवत सखे माझे ॥१२॥
त्यांचिनि सरता झालासी त्रिभुवनीं । विचारी आपुल्या मनीं पांडुरंगे ॥१३॥
केलें उच्चारणें बोलतां लाजिरवाणें । हांसती पिसुणें संसारींची ॥१४॥
नामा म्हणे केशवा अहो विरोमणी । निकुरा जाला झणीं मायबापा ॥१५॥

२१७
कागदीचें वित्त वेश्येसी दिधलें । तैसें आम्हां केलें नारायणें ॥१॥
जोडोनियां हस्त केलें मढयापाशीं । तैसें तूं मजशीं केलेंज देवा ॥२॥
कडू भोपळयाचा कोणता उपयोग । तैसें पांडुरंगें केलें जाण ॥३॥
नामा म्हणे ऐसें करूं नको देवा । समागम व्हावा पायांसवें ॥४॥

२१८
दास जाल्यावरी करिसी उदास । मनीं तें तुम्हांस आणी देवा ॥१॥
सोशिले प्रवास जन्मजन्मांतर । करिसी अव्हेर आम्हांलागीं ॥२॥
भार खांद्यावरी घेऊनी हिंडवी । होसी मजविशि पाठमोरा ॥३॥
श्रांत सावकाश गाती इतिहास । काय कासाविस होय तुम्हां ॥४॥
नामा म्हणे नको वाउगे उदीम । न सोडीं मी नाम केल्या कांहीं ॥५॥

२१९
तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविशी ॥१॥
बळें बांधोनियां देसी काळा हातीं । ऐसें काय चित्तीं आलें तुझ्या ॥२॥
आम्हीं देवा तुझी केली होती आशा । बरवें ह्रषिकेशा कळों आलें ॥३॥
नामा म्हणे देवा करा माझी कींव । नाहीं तरी जीव घ्यावा माझा ॥४॥

२२०
सकळ वैभव निजकर्म भोग । ते तुज उद्वेग दावी काई ॥१॥
मीतूंपण असे तेथें मग कैचें । निर्माण ठायिंचें तोडीं वेल ॥२॥
आपुला करूनि ठेवीं तुझें पायीं । थोरपण कांहीं नको मज ॥३॥
नामा म्हणे तुझें सोलीन ढोंपर । कासया विचार देखों आतां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP