आत्मसुख - अभंग ६१ ते ७०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


६१
घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥
पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥
जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥
अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी  देवा ॥४॥
विष्णुदास  नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥

६२
ज्याचिया रे मनें देखियेलें  तुज । त्याची लोकलाज मावळली ॥१॥
नाहीं तया क्रिया नाहीं तया कर्म । नाहीं वर्णाश्रम सुखदुःख ॥२॥
नाहीं देह स्फूर्ति जाती कुळ भेद । अखंडा आनंद ऐक्यतेचा ॥३॥
नामा म्हणे त्याचे चरणरज व्हावें । हेंचि भाग्य द्यावें केशिराजा ॥४॥

६३
येतां जाता थोर कष्टलों गर्भवासीं ।  पडिलों गा उपवासी प्रेमेंविण ॥१॥
बहुतांचा सेवका जालोंज काकुळती । न पावें विश्रांती तयाचेनी ॥२॥
ऐसें माझें मन शिणलें नानापरी । घालीन आभारीं संताचिया ॥३॥
वियोगें संतांच्या व्याकुळ चिंतातुर । हिंडें दारोदार दीनरूपें ॥४॥
परि कोणी संतांच्या न घालिती चरणीं । तळमलीं अनुदिनीं अश्रांत सदा ॥५॥
माझें माझें म्हणोनि जया घालीं मिठी । दिसे तेचि दिठीं नाहीं होय ॥६॥
तया शोकानळें संतप्त आंदोळें । गेलें तें न मिळे कदाळाळीं ॥७॥
न देखत ठायीं देखावया धांवें । भ्रांती भुललें भावें नानामार्गीं ॥८॥
तुझा स्वरूपानंदु नाहीं वोळखिला । जाली ते विठ्ठला हानि थोर ॥९॥
लोहाचा कवळु लागला परिसातें । पढिये सर्वांतें होय जेवीं ॥१०॥
नामा म्हणे तैसी भेटी संतचरणीं । करूनि त्रिभुवनीं होईन सरता ॥११॥

६४
धांउनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगे वचनींचे गुज तुम्हां ॥१॥
विठोबाच्या गांवा यारे मनीं येकवेळां । फारा आहाळला जीव माझा ॥२॥
आनंदाचें जीवन पाहिन श्रीमुख । शोकमोहदुःख हरती माझे ॥३॥
विटेसहित चरण देईन आलिंगन । तेणें माझी तनु वोल्हावेल ॥४॥
तुम्ही माझे आवडते अंतरंग । माझे जिवलगा प्राणसखे ॥५॥
नामा म्हणे विठो कृपेची माउली । तेव्हां ते साउली करिल मजा ॥६॥

६५
वाल्मिकादि भीष्म द्रोण कृपाचार्य । द्रुपदतनया दिली भेटी ॥१॥
उद्धव नारदा अंबरिष शुक । बळी धरुवादिक आले भेटी ॥२॥
देवी देवऋषी गोपाळांसहिता । भाष्यकारें नीत शुद्ध केली ॥३॥
नामा म्हणे आतां पाहूं नको देश । पतितास यश तुझे नामीं ॥४॥

६६
भक्तांची आवडी मोठी त्या देवासी । सद्‌भक्तिप्रेमासी लांचावला ॥१॥
काय सांगूं आतां तयांचें तयांचें कौतुक । जेथें ब्रह्यादिक स्तब्धा ठेले ॥२॥
गज आणि गणिका भिल्लिणी कुंटिणी । नेल्या त्या विमानीं बैसोनियां ॥३॥
अजामीळ खळ कोळी तो वाल्मिक । तारिले अनेक एकसरां ॥४॥
धर्माचिये घर्रीं उच्छिष्ट काढी । जाहाला बराडी देवराव ॥५॥
नामा म्हणे कांहीं मागेना तो देव । मुख्य पाहे भाव दृढ त्याचा ॥६॥

६७
जैसा वृक्ष नेणे मान अपमान । तैसे ते सज्ज्न वर्तताती ॥१॥
येऊनियां पूजा प्राणि जे करिती । त्याचें सुख चित्तीं तया नाहीं ॥२॥
अथवा कोणी प्राणि येऊनि तोडिती । तयाअ न म्हणती छेदूं नका ॥३॥
निंदा स्तुति सम मानिती जे संत । पूर्णा धैर्यवन्त सिंधु ऐसे ॥४॥
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी । तरी जीव शिवा मिठी पडुनि जाय ॥५॥

६८
मंत्रयंत्र दीक्षा सांगातील लक्ष । परि रामा प्रत्यक्ष न करी कोण्ही ॥१॥
प्रत्यक्ष दावील रामा धरीन त्याचे पाय । आणिकांचीं काय चाडा मज ॥२॥
सर्व कामीं राम भेटविती मातें । जीवेंभावें त्यांतें ओवाळीन ॥३॥
नामा म्हणे आम्हां थोर लाभ जालाअ । सोईरा भेटला अंतरींचा ॥४॥

६९
कैसा पांडुरंगा करावा विचार । सांग बा विर्धार साक्षरूपा ॥१॥
काय आलें देवा कैचें थोरपण । आकारासि कोणी आणियलें ॥२॥
आणियलें आतां आपणासारिखें । गोपिकांसी रूपें दावी नाना ॥३॥
काय जीवेंभावें सकाळां संमता । सगुण अनंत म्हणे नामा ॥४॥

७०
बाप संतसभा भली । बहुता पुण्यें जोडिली ।
ह्रदयींची गोवी आपुली । संताप्रति निवेदीन ॥१॥
आजि प्रसंग हरिभक्तीचा । हरि स्वभावें उच्चारु वाचा ।
विठोबा ऋणिया रे भक्तांचा । ऋण फेडितो भक्तांचें ॥२॥
अरे हा अनादिचा लागु करी । अरे जन्माची उभरी भरी ।
आमुचा लागिया श्रीहरी । दो उत्तरीं निवडावा ॥३॥
आतां असो हा कर्मविभागु । आम्ही मागूं आपुला लागूं ।
जरि हा म्हणेल निःसंगु । तयासी आम्हांसी संबंध कायसा ॥४॥
जरि हा न लगे आमुचें ऋण । हातीं घेऊनि सुदर्शन ।
आम्ही करूं हरिकीर्तन । तेथें तिष्ठत कां उभा ॥५॥
मागें चाळविलि या रिति । परि आम्हांसि आलिया प्रचीति ।
ज्यासि हरिची सोय संगती । तयासि न मनें अन्य स्थळ ॥६॥
हरि कौसाळ मल्ल म्हण्ती । ते अवघी रे जाणाची भ्रांति ।
सेवा हरिची सांगताती । संत होती हरिकडे ॥७॥
आणिक एकू आम्हांसी आठवलें । आम्ही भांडूकरे एकले ।
आमुचें केलें काय चाले । य हरिभक्तां वांचूनि ॥८॥
जे हरिभक्ति विरहित । त्यांचें हरिचरणीं न बोधो चित्त ।
अवघे मिळूनि हरिचे भक्त । हरि व्हावा म्हणताती ॥९॥
आणिक एक नवल परि । जो याची सेवा करी ।
त्याचें सर्वस्व हरी । आणि श्रिहरि नाम मिरवतु ॥१०॥
हरि आळवितां मागा उभा । आठवितां पुढें उभा ।
हरि ध्यातां ह्रदयीं उभा । हें तंव सभा विचारा ॥११॥
आमुचें हो तेंच तुम्हीं विनवावें । आम्हांसि मानलें आघवें ।
किती येरझारीं शिणवावें । शरण रिघावें श्रीहरी ॥१२॥
विश्व श्रीहरिचें आघवें । म्यां गार्‍हाणें कवणाशीं द्यावें ।
लागे तासिच मागावें । हरिविण ठावो नसे वो ॥१३॥
वीरराया पंढरीनाथा । आतां अपंगावें शरणागता ।
जरी उपेक्षिसी सर्वथा । वाट कोणाची पहावी ॥१४॥
नको नको निंदा स्तुति । हाचि भावो हेचि भक्ति ।
मज नेदी पुनरावृत्ति । विष्णुदास म्हणे नामा ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP