आत्मसुख - अभंग १५१ ते १६०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१५१
पाहूं द्यारे मज विठोबाचें मुख । लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१॥
कस्तुरी कुंकुम भरोनियां ताटीं । अंगीं बरवंट गोपाळाच्या ॥२॥
जाईजुई पुष्पें गुंफोनियां माळां । घालूं घननीळा आवडीनें ॥३॥
नामा म्हणे विठो पंढरीचे राणे । डोळियां पारणें होत असे ॥४॥

१५२
तपें केलीं दाटोदाटीं । थोर पुण्याचिया साठीं ॥१॥
जन्मोजन्मींचा संकटीं । विठो तुझी जाली भेटी ॥२॥
दोन्हीं  चरण लल्लाटीं । नामा म्हणे न सोडीं मिठी ॥३॥

१५३
महिमा अगाध  यात्रा कार्तिकीये । आला पंढरीये नामदेव ॥१॥
भक्त शिरोमणी पंढरीच्या नाथा । कृपाळुवा माता बाळकासी ॥२॥
धन्य नामदेव धन्य नामदेव । जिवीं तुझे  पाव न विसंबे ॥३॥
भक्त सप्रेम मिळाले अपार । करिती गजर हरिनामीं ॥४॥
नटे महाद्वारीं झळके पताका । करिती ब्रह्मादिक पुष्पवृष्टी ॥५॥
नामघोष कानीं समस्त ऐकती । पाषान द्रवती तेणें प्रेमें ॥६॥
नामा म्हणे जीव निवालासे येथें । पाहतां विठोबातें श्रमु नेला ॥७॥

१५४
ऐसी चाल नाहीं कोठें । नमस्कारा आधीं भेटे ॥१॥
मायबापा निर्विकारीं । सखा नांदतो पंढरीं ॥२॥
देव भक्तपण । नाहीं नाहीं त्यासी आण ॥३॥
नामा म्हणे आधीं भेटी । मग चरणां घालीन मिठी ॥४॥

१५५
बहुत जन्माशेवटीं तुजशीं जाली भेटी । बहु मी हिंपुटी जालों थोर ॥१॥
बहु कीर्ति ऐकिली बहुतांचे मुखीं । बहुत केले सुखी शरणागत ॥२॥
बहुतां आसक्त बहुतां ओळगणा । बहुत विटंबना जाली माझी ॥३॥
बहु फेरे पाहिले बहु दुःख साहिलें । बहु चित्त वाहिलें दुर्भरची ॥४॥
बहुत काळ गेले बहु अन्याय केले । बहु नाहीं जोडिलें नाम तुझें ॥५॥
नामा म्हणे केशवा एक उरली वासना । घ्यावी नारायणा चरणसेवा ॥६॥

१५६
तान्हेलिया जाय उदका लागोनी । पारधी देखोनी मुरडे वेगीं ॥१॥
तैसे तुझे चरण विसरलों देवा । संसार केशवा देखोनियां ॥२॥
तैसी परि मज जहाली जाण देवा । नामा उभा केशवा विनवितो ॥३॥

१५७
धरोनि हस्तक बैससी एकांतीं । भक्तासी श्रीपती सर्वकाळ ॥१॥
दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं  चरण धांवे नेटें ॥२॥
सर्व आचरण दाविसी प्रकार । कल्पना अंधार निमित्याचा ॥३॥
नामा म्हणे होसी चतुर आपण । आमुचें निर्वान पाहूं नको ॥४॥

१५८
बुद्धिहीन अति करितों हव्यास । उठती दद्देश नाना मतें ॥१॥
एकापुढें एक नासोनियां जाती । सोशिली विपत्ति जन्ममरण ॥२॥
वासनेचें संगें बुडालों मी वायां । चुकवूं नको पायासवें भेटी ॥३॥
नामा म्हणे ऐसे गेले बहुतेक । वैकुंठनायका तारीं मज ॥४॥

१५९
अठ्ठाविस युगें उभा विटेवरी । मुद्रा अगोचरीं लावूनियां ॥१॥
ध्यान विसर्जन केधवां करिसी । नेणवे कोणासी ब्रह्मादिकां ॥२॥
पहातां तुजकडे माझें मीपण उडे । भेदाचें सांकडें हारपलें ॥३॥
तुजपाशीं असतां मुकिजे जीवित्वा । ठकले तत्त्वतां नेणों किती ॥४॥
नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहें । मन पायीं राहे ऐसें कीजे ॥५॥

१६०
माझी  कोण गति सांग पंढरिनाथा । तारिसी अनाथ कीं बुडविसी ॥१॥
मनापासोनियां सांग मजप्रती । पुसें काकुळती जीवाचिये ॥२॥
न बोलसी कां रे धरिला अबोला । कोणासी विठ्ठला शरण जाऊं ॥३॥
कोणासी सांकडें घालावें हें सांग । नको करूं राग दीनावरी ॥४॥
बाळकासी जैसी एकचि वो माये । तैसे तुझे पाये आम्हांलागीं ॥५॥
नामा म्हणे देवा अनाथाच्या नाथा । कृपाळुवा कांता रखुमाईच्या ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP