आत्मसुख - अभंग २६१ ते २७३
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
२६१
तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधाण । नेलें माझॆं मन षड्वर्गीं ॥१॥
धांव गा विठ्ठला सोडवीं आपुला दास । थोर कासावीस केलों बापा ॥२॥
कर्म कुळाचार क्रोध हा अनिवार । मदें निरंतर भ्रांत केलें ॥३॥
मछरें तुजसी दुरावलें देवा । लोभें केला गोवा गर्भवासी ॥४॥
दंभ रसातळीं जातसे घेऊनि । विश्वचक्षु होउनि पाहसी कैसा ॥५॥
नामा म्हणे मज तुझाचि भरंवसा । अनाथा कुंवसा होसी देवा ॥६॥
२६२
मनीं जें जें देखें परी दृष्टी नेणें । प्रेमाची ते खूण जाणावया ॥१॥
काय करूं माय बाप गा विठ्ठला । मजसि कां अबोला धरिलासी ॥२॥
मानसीं वसणें प्रत्यक्ष पाहणें । तुझें नाम गाणें तरी साच ॥३॥
नामा म्हणे किती सांगावें गा तुज । केशवा हें गुज पुरची माझें ॥४॥
२६३
पुंडलिक वरद आनंदें अभेद । विठ्ठल विद्गद नाम तुझें ॥१॥
पाव गा वेगीं मजालागीं झडकारी । बुडतों भवसागरीं तारी मज ॥२॥
आकांत अवसरीं स्मरिला गजेंद्र । दिनानाथ ब्रीद साच केलें ॥३॥
स्मरली संकटीं द्रीपदी वनवासी । धांवुनि आलासी लवलाही ॥४॥
प्रल्हादेंज तुजलागीं स्मरिलें निर्वाणीं । संकटापासुनि रक्षियेलें ॥५॥
नामा म्हणे थोर पिडिलों गर्भवासें । अखंड पाहातसें वाट तुझी ॥६॥
२६४
माझ्या बोवडिया बोला । चित्त द्यावें वा विठ्ठला ॥१॥
वारा जाय भलत्या ठायां । तैसी माझी रागछाया ॥२॥
गातां येईल तेणेंचि गावें । येरीं हरि हरि म्हणावें ॥३॥
तान मान नेणें देवा । नामा विनवितो केशवा ॥४॥
२६५
समर्थपणें रंका का गांजितसां स्वामी । हें काये स्वधर्मीं मिळतसे ॥१॥
आपुली करणी न विचारा मनीं । दुसरियास झणीं बोल ठेवा ॥२॥
निर्गुन निराकार होतेंती शून्यपणें । आम्हांसी असणें तेचि ठायां ॥३॥
सुखें एकरूप होतों तुझें पोटीं । कासया हे सूष्टी वाढविली ॥४॥
विकाराचें मूळ दिधलें हें शरीर । तेणें कष्टी थोर जालों आम्ही ॥५॥
पाण पुण्य दोन्हीं लाविली सांगातें । म्हणऊनि सुखातें अंतरलों ॥६॥
यमलोकीं वास रोरव यातणा । तेणें नारायणा धाक थोर ॥७॥
खातों जेवतों तें न लगेचि अंगीं । जालोंसेम उद्वेगीं रात्रंदिवस ॥८॥
ऐसे देह आम्हां कासया दिधले । काय मागितले आम्हीं तुम्हां ॥९॥
सृष्टीपूर्वीं पाप नव्हतें हरी । कासया श्रीहरी कष्टी केलें ॥१०॥
वेदशास्त्रवचन आम्हांसी लाविलें । तें तुम्हीं टाकिलें एकीकडे ॥११॥
वेदशास्त्रवचन चुकल्य अवचिता । गोसावी जी होतां दंडावया ॥१२॥
मागां चुकलेती तें ठेवा एकिकडे । आतां तरी पुढीं सांभाळावें ॥१३॥
एकरूफ तुम्ही होतेती निर्गुणीं । तेथें आमुचे कोण्ही बोलों आलों ॥१४॥
निर्गुउन सांडुनि व्हावें जी सगुणज । ऐसें तुम्हां कोण बोलियेलें ॥१५॥
आपुलिये इच्छे ब्रह्मांडें रचिलीं । कय सांगितलीं जी आम्हीं तुम्हां ॥१६॥
लक्ष्मीचे विलास धरिले नाना वेष । हा काय उपदेश आम्ही केली ॥१७॥
विश्व हें मिर्मुनि जालेती गोसावी । हें काय सांगावी आम्ही केली ॥१८॥
जे तुम्हां पाहिजे तें तुम्ही निर्मिलें । आपणासवें केलें कष्टी आम्हां ॥१९॥
क्ल्पजन्मांतरी युगयुगांतरी । जवळी श्रीहरी होतों आम्हीं ॥२०॥
तुम्ही तेथें आम्ही आम्ही तेथें तुम्ही । विचारावें स्वामी पांडुरंगा ॥२१॥
तुम्हां आम्हां कांहीं वेगळिक नाहीं । बोलोनियां काई दावूं आतां ॥२२॥
आम्हांसि तुम्ही काय सोसिलें अधिक । ठकितसां लोक तैसें नव्हें ॥२३॥
तुम्हांसी अवतार कोरडियें काष्टीं । तुमच्या नामें कष्टीं दैत्यें केलें ॥२४॥
तुम्हांसी मातेनें धाडियेलें वना । आमची विटंवना बहुत जाहली ॥२५॥
वल्कलें वेष्टोनी जालेती तापसी । वेष आम्हां देसी मर्कटाचे ॥२६॥
जवळीच असुनी हरविली कांता । आम्ही शुद्धिकरतां कष्टी जालों ॥२७॥
तियेचे वियोगें शोक करा वनीं । वानरें होऊनि हिंडों आम्हीं ॥२८॥
तुम्ही स्वामीपणें बैसा एके ठायीं । आम्हीं शिळा डोई वाहिलेल्या ॥२९॥
लंकेपुढें आम्हीं वेचियेलें प्रान । तुम्ही ते दुरून बाण टाका ॥३०॥
अयोध्येचे राज्यीं तुम्हां सिंहासन । आमचे कपाळीं हीन चुकेचि ना ॥३१॥
वस्त्रें अलंकार तुम्हां हस्ती घोडे । आम्हीं ते उघडे पायीं चालों ॥३२॥
चाड सरलिया नाहीं आठवण । कांहो लक्षुमण दवडिला ॥३३॥
लोक म्हणों तरी पाठीं सहोदर । जालेति निष्ठूर देवराया ॥३४॥
तुम्हां एकलेनि न करावें गमन । सर्व अवघेजण आलों आम्हीं ॥३५॥
कंसाभेणें तुम्ही राखियेल्या गाई । तेथें आम्ही काई नवहतों देवा ॥३६॥
भोगा स्वामीपन राखितां गोधनें । ठकोनियां खाणें आमच्या रोटया ॥३७॥
सर्पापोटीं आम्हीं घावरलोसें विखें । तुम्ही आपुले सुखें वेगळेची ॥३८॥
खेळतां यमुनेडोहीं टाकियेली उडी । आम्ही थडी थडी रुदन करू ॥३९॥
गोवर्धन गिरी आमुचिये शिरीं । तुम्ही नानापरि वेणु वाहा ॥४०॥
आम्हां चोरुनी नेलें वर्षभरी । तुम्हीं आपुले घरीं सुखी असा ॥४१॥
असो आतां चाड नाहीं येणेंवीण । आमुचें निर्वाण पाहूं नका ॥४२॥
अमुचे दिवस काय वायां गेले । स्वामीया उगले राहा तुम्ही ॥४३॥
कल्पाचे शेवटीं तुम्हां आम्हां भेटी । तेथें पैं ह्या गोष्टी कळों येती ॥४४॥
नामा म्हणे अम्ही पाईक फुकाचे । धारक नामाचे दास तुझे ॥४५॥
२६६
नेणें भक्ति कांहीं करुं कैसी सेवा । हें तों मज देवा समजेना ॥१॥
करूं कैसा जप करूं कैसें ध्यान । नाहीं माझें मन स्थिर देवा ॥२॥
कामक्रोध यांची मोठी हे जाचणी । जालों वेडयावाणी समजेना ॥३॥
नामा म्हणे माझे सांवळे विठाई । येऊनियां राही ह्रदयामाजीं ॥४॥
२६७
तुज दिलें आतां यत्न करी याचा । जीवभाव वाचा काया मनें ॥१॥
भागलों दातारा शीण जाला भारी । आतां मज तारी अनाथासी ॥२॥
नेणताम सोसिली तयांची आटणी । नव्ह्तीं हीं कोणी कांहीं माझीं ॥३॥
वर्स नेणें दिशा हिंडती मोकाट । इंद्रिय सुसाट सर्व पृथ्वी ॥४॥
येरझार फेरा शिणलों सायासीं । आतां ह्रषिकेशी अंगिकारीं ॥५॥
नामा म्हणे मन इंद्रियाचें सोयी । धांव यासी कायी करुं आतां ॥६॥
२६८
तुझे चरणीं चित्त रंगलें अनुरागें । बुह्जन्मीं वियोगें शिणलें होतें ॥१॥
आलाळलें पोळलें तापत्रयीं पीडिलें । तृष्णें विभांडिलें नानापरी ॥२॥
काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । इहीं निरंतर जाजावलें ॥३॥
बुडतिया अवचटें लाभे पैं सांगडी । ते जीवें न सोडी तैसें जालें ॥४॥
नामा म्हणे केशवा तूं कृपेचा सागर । झणीं माझा अव्हेर करिसी देवा ॥५॥
२६९
न विचारितां बळि घातला पाताळीं । सवेंचि कणव उपजली तये वेळीं ।
द्वार न संडिसि कवणेकाळीं । ऐसी तुझी करणी दातारा ॥१॥
अगा केशवा सुजाणा । गार्हाणें सांगू कवणा ।
तुझिये नामें तुटे बंधना । देवकीनंदना वासुदेवा ॥२॥
वसुदेव बांदवडी । आपदा करोन एवढी ।
मग त्या कंसा केवीं धाडी । मोक्ष तया दिधला ॥३॥
सुदामा सांगातें जेवी । धान्य मागे गांवोगांवीं ।
आपदा करोनि बहू ही । मग त्यासी राज्य दिधलें ॥४॥
जोहरीं सुदलें पांडवां । सवेंची उपजली कणवा ।
अग्निपासोनी केशवा । रक्षियेलें तयांसी ॥५॥
सभा पिसुनाची दाटली । द्रौपदी वस्त्रें आसुडली ।
एवढी आपदा करविली । मग वस्त्रें पुरविलीं तियेतें ॥६॥
दैत्यें गांजियला प्रल्हाद । तुझ्या नामाचा घेतला छंद ।
एवढा करुनियां खेद । मग त्या दैत्या वध केला ॥७॥
विभीषना हाणितल्या लाथा । लंका दिली त्या उचिता ।
समर्थें केलें तें बरवें आतां । तूं रघुनाथा ऐकें पैं ॥८॥
आम्ही लाडके डिंगर । माझें बोलणें उद्धट फार ।
तूं तंव कृपेचा सागर । उतरी पार म्हणे नामा ॥९॥
२७०
निरंजनीं वनीं पाषाण पैं व्हाव्वें । परी जन्मा न यावें मागत्याच्या ॥१॥
राजाचें लेकरूं पांघरे वाकळ । तेव्हां तें सकळ लाज कोणा ॥२॥
पोसवेना तरी दवडुनि देई देवा । नामा तुज केशवा विनवितसे ॥३॥
२७१
माझिया मनाचें हिंडणें जे जे ठायीं । तेथें तेथें राही पांडुरंगा ॥१॥
भीमा चंद्रभागा वैकुंठ पंढरी । दावीं दृष्टीभरी निरंतर ॥२॥
पुंडलिकासमोर लक्ष निरंतरीं । तैसाची अंतरीं येऊनि राहे ॥३॥
कटीं कर विटे समचरण गोमटें । पाहतां अति निकट हेंचि ध्यान ॥४॥
पुरवीं माझी आस तूं बाप माउली । करीं मज साउली पद्मकरें ॥५॥
नामा म्हणे झणें करिसी उदास । होती कासावीस प्रान माझे ॥६॥
२७२
आसनीं शयनीं आठवीं अनुदिनीं । नित्य समाधानीं रूप तुझें ॥१॥
काम धाम कांहीं नलगे माझ्या चित्तीं । न देखे विश्रांति तुजविण ॥२॥
तापत्रय ओणवा लागला चहूंकडे । न देखें उघडे तुजविण ॥३॥
तुजविण तें जिवलग दुजें कोण होईल । तें माझें निवारील उद्वेग हे ॥४॥
कृपेचा सागरू त्रिभुवनीं उदारू । न करी अव्हेरू अनाथाचा ॥५॥
नामा म्हणे केशवा आस माझी पुरवी । पाउलें दाखवी एक वेळां ॥६॥
२७३
आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥
द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांव त्वां घेतली गजेंद्रासी ॥२॥
उपमन्या आळी तुवां पुरविली । अढळपदीं दिल्ही वस्ति धरुवा ॥३॥
नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडूरंगा ॥४॥
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP